सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “जगणे सुंदर करा– –” ☆ सुश्री शीला पतकी ☆
जीवनाला आपण अर्थ द्यायचा असतो पु ल देशपांडेनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात हे लिहिले आहे निराश होऊन चालणार नाही जीवनाला आपण अर्थ द्यायचा असतो…जीवन आणि जगणे फरक आहे जगावं कसं ते आपण ठरवायचं आणि आपलं जीवन कसं असणार आहे ते परमेश्वर ठरवतो.आपल्या वाट्याला आलेलं जगणं आपण किती सुंदर करू शकतो याचा नेहमी विचार करावा हे सांगताना पुलंनी एक इतक सुंदर उदाहरण दिलेलं आहे….
पुष्प किंवा फुल म्हणजे काय तर स्त्रीकेसर आणि पुंकेसर आणि काही मुलायम पाकळ्या यांचा एक सुंदर पुंजका…. पण आपण त्याला अर्थ दिला… आपण त्याला पुष्प हे नाव दिल… फुल हे नाव दिलं आणि त्याच्याही जगण्याला अर्थ दिला..
प्रेयसीला दिलं की प्रेम प्रगट होतं… देवाला वाहिले की भक्ती प्रकट होते… कोटा ला लावले की रसिकता दिसते… आईच्या अंबाड्यात खोचलं की माया दिसते प्रेम दिसतं….!एका फुलाला आपण किती अर्थ दिले… तसेच जगण्यालाही द्यायचे जगण्याचे सार्थक करायचे…..!
अनेक महान लोकांनी आपल्या जगण्याला असेच अर्थ दिले आहेत बाबा आमटे यांनी महारोग्यांची सेवा करून आपल्या आणि त्यांच्या जीवनाला एक अर्थ दिला एक मोठं काम उभं केलं… सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना जवळ केलं अनाथांची माय झाल्या त्या आणि त्यांच्या आणि त्या मुलांच्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला…. अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी वेगळं काम उभं करून आपल्या जगण्याला अर्थ दिला…..ही खूप मोठी उदाहरण झाली…हे आदर्श आहेत….पण छोट्या छोट्या माणसांनी सुद्धा आपलं जगणं सुंदर केलं आहे ते आपल्या छोट्या छोट्या कामानी आपल्या निराशा झालेल्या जगण्याला काहींनी अशा वेगळ्या कामाने खूप चांगले अर्थ दिले आहेत….!
मालतीबाईंच्या नव्या सुनबाई आल्या घराच्या बाजूला थोडं अंगण होतं पण निरोपयोगी वस्तू टाकण्या पलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही सासू-सासरे सदैव घरात बसलेले आणि मग तक्रारीचे सूर लागलेले आनंद घेणं नाही आणि आनंद देणंही नाही…. सुनेने हळूहळू ती अंगणाची बाजू स्वच्छ केली.. कुजलेल्या कचऱ्याने पाल्या पाचोळ्याने ती जमीन सुपीक झालीच होती तिने काही छान झाडे लावली काही फुलांच्या वेली लावल्या.. घोसावळ्याचा वेल लावला…. भोपळ्याचा वेल लावला…खालच्या बाजूला भाजीपाला त्यांचे बी बियाणे टोचले… थोड्याशा पावसाने जमिनीतले सारे उगवून आले…वेल खिडकीवर चढले….काहीना मांडव घातले….सासू-सासरे कामात मदत करू लागले.. वेलींना फुल लागली भाज्या फुल यानी अंगणाची शोभाच वाढली…. सासुबाई फुल गोळा करून तिथल्याच कट्ट्यावर बसून हार करीत असत सासरे बुवा त्या कामात मदत करीत…घरात लक्ष घालणं कमी झालं तिथेच त्यांचा चहा पण व्हायचा आणि त्यांना वेगळा आनंद मिळायचा. हळूहळू त्या दोघांनी या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली घरचा भाजीपाला फुलं यांनी परड्या गच्च भरू लागल्या. शेजारपाजारी चार भाज्या जायच्या त्यांच्या जगण्याला अर्थ आला घरात विनाकारण किटकिट करत बसणारे सासू-सासरे आता पूर्णपणे बागेत रमले होते त्याना जगण्याचा सूर गवसला होता.
शालिनी काकूचे मिस्टर वारले एक मुलगी लग्न झालेली…. जावई म्हणाले चला सासुबाई…. पण बाई म्हणाल्या,”नको माझं घर मला बर आहे “…..1000 स्क्वेअर फुट जागेवरच टुमदार घर होते त्यांच्या आसपास एकेकटे राहणारी मुलं होती नोकरी करणारी शिकणारी…!शेजारी राहत असलेल्या मानसीने सांगितलं काकू तुम्ही सुगरण आहात कॉलनीत राहणाऱ्या मुलांना नाष्टाकरून द्याल का? त्यांनी विचार केला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होतोय त्या मुलाना चांगलं खायला मिळेल… सकाळी रोज 25 /30 डिश नाश्ता होऊ लागला त्याची तयारी करणं सामान आणणं यामध्ये काकूंचा वेळ सुंदर चालला पैसे मिळायला लागले आपण काहीतरी छान करू शकतो याची जाणीव झाली काकूंच्या हाताला चव होतीच लोकांचे पोरं इथे राहतात म्हणून मायेने करायच्या मुल ही खुश होतीकाकूंची सकाळ सुंदर झाली माणसांची वरदळी वाढली पोरं अधून मधून काकूंना भेटायला येत असत संवाद वाढला ओळखी वाढल्या मुलांचे पालक आले की आवर्जून त्यांना भेटून जात… आत्मविश्वास वाढला… एकटे पण संपलं जीवनाला अर्थ आला… तो त्याने स्वतःच्या स्वतःच त्याला दिला!
याबाबत दोन पंख्याचा संवाद मला आठवला दोन पंखे एकमेकांना भेटले एक हिमाचल प्रदेशातला होता तो बंद पडला होता आणि दुसरा सोलापुरी सोलापुरी ने विचारले,” अरे तू बंद का पडलास?” तो म्हणाला,” अरे तिथे इतकी थंडी आहे, लागत नाही गरज नाही माझी आणि मला कोणी वापरत नाही”… सोलापुरी म्हणाला “माझं तसं नाही बाबा मी 24 तास चालतो कारण इथे सतत उन्हाळाच असतो माझे मालकाने फक्त तेल पाणी करायला येथे आणले आहे.गड्या तू काहीच काम न केल्यामुळे बंद पडलास आणि मी सतत काम करतोय म्हणून मी चालू आहे लक्षात ठेव* थांबला तो संपला *कामात रहा रे म्हणजे आपोआप चालत राहशील”. मला त्या पंख्यांचा संवाद आवडला खरंच थांबला तो संपला सोलापुरी पंखा जास्त चालतो हेच खरे….गमतीचा भाग सोडा पण आपल्या आयुष्याला आपणच अर्थ आणायचा आहे आणि जगणे सुंदर करायचे जीवन देणारा तो आहे पण जगणे कसं हे ठरवणारे आपण आहोत हे लक्षात ठेवा… मग काय करा आजपासून एखादी नवीन सुरुवात जगायला बळ देणारी जगणं सुंदर करणारी…!
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




