डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ आनंदरंग… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
पुन्हा कोविदनी झटका दिला.जरा कमी त्रास दिला यावेळी….जरा चेंज म्हणून मागच्या वेळेच्या विकनेसची जागा सर्दी खोकल्यानं घेतली…छळंत राहिला…आता तोही दमून कमी झालाय.काल ८/१० दिवसांनी जरा कमी खोकून,न जागता,न बसून राहता शांत झोपू शकले.नेहमीच्या सवयीनं पहाटे जागही आली.न्युझीलंडमधे या घरांना भिंतीऐवजी भल्यामोठ्या काचांचे दरवाजे आहेत आणि तसेच मोठाले ग्रे कलरचे पडदे.रोज रात्री ते सरकवून ठेवले जातात.कितीही सरकवले तरी एखादी बारीकशी फट असू शकते….
आज पहाटे उठले आणि दिसला हॉलभर गुलाबी रंग…. सुंदर अलगद पसरलेला…हे काय आहे?स्वप्न पडतंय की काय? पडद्यातूनही तीच छटा गुलबट… आणि पडद्याच्या फटीतून तर गडद गुलाबी प्रकाश….हे जरा फारंच झालं….ताडकन उठले.खिडकीशी गेले.पहाटेची प्रसन्न वेळ…गारठा खूप दाट….पडदा सरकवला आणि मन आनंदानी न्हाऊन निघालं….तो पहाटेचा उगवतीचा गुलाल उधळला होता सर्वत्र….बाहेरची लॉन,झाडं,ते मला आवडणारे गवतावरचे ऊंच रेशमी झिरमिळ्यांचे तुरे.अगदी दादूची व्हाईट कारही….
सगळं सगळं त्या आगळ्या रंगाची हलकी शिंपण घेऊन सजलं होतं….भिजलं होतं माझ्या मनासारखं…..हे सगळं कमाल देखणं होतं…सारं आकाश गुलाबी,सोनेरी,अबोली रंगछटात न्हायलेलं….. मोबाईलनं भराभर फोटो काढले…. मनात कायमचं राहणार होते खरंतर माझ्या तरी पण….
दिवसभर कॉलमधे दमत असणारे मुलगा सून अजून उठायचे होते.नाती उठण्याचं टाळंत गारठ्यामुळे परतपरत ब्लॅंकेटमधे घुसत होत्या .म्हणजे आत्ता मी एकटीच श्रीमंत,आनंदी,वेडी झालेली त्या उधळणीमुळे….. काहीसा वेळ गेला .जरा पांघरूण बिंघरूण आवरून ,तोंड धुवून चहा करायला ओट्याशी गेले.तिथेही मोठी खिडकी….म्हणजे चहा करतांना अजून थोडा वेळ रंग भेटणार तर….
पण वातावरण वेगानं बदललं होतं.गुलाबीवर राखाडीचं राज्य पसरलं होतं. मगाचच्या गुलाबीचा मागमूसही नव्हता.अरे…इतकं…इतकं कसं बदललं…१०/१५ मिनीटांपूर्वी तर सगळं घर,अंगण,आकाश असं रंगलं ?होतं त्या गुलालात….आता सगळ्यांवर दाट ग्रे पडदा कसा पसरला होता?….देखण्या आकाशाचं आभाळ झालं होतं अन् त्या मलूल आभाळात सूर्यही चंद्रासारखा अंधुक दिसत होता….अंधुकसा,शांत,तरी “सूर्यंच” होता ना तो…भरल्या आभाळातून देखिल प्रखरता जाणवतं होती.मी जरा हिरमुसले….पण ती पहाट मनात कोंदली होती.न संपणाऱ्या आनंदाचं दान देऊन….
मी कामात गुंतले.घड्याळ सरकत राहिलं.ते दुपारकडे झुकलं तरी ढगाळ उजेड अंधारलेलाच होता जरासा ….जेवणं,मागचं आवरणं झालं…जरा पडावं म्हणून हॉलमध्ये आले…. कार्पेट देखिल गारठलं होतं….इतका गारवा….काचांवरचे पडदे सरकवायला गेले आणि निसर्गाच्या लहरीनं थक्क झाले.चक्क पावसाची रिमझिम चालू होती.हिरवळ,झाडं,पक्षी …सारे गारठून मिटले होते.आता संध्याकाळ होणार तरी “रिमझिम झरती ” हेच गाणं सुरू आहे.माझं मन मात्र त्या पहाटेच्या गुलालानीच माखलंय अजून …हा रंग कधीच डिलीट होणार नाही….तो ऑप्शनच नाही माझ्या मनाच्या कॅमेऱ्यात…..
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





