श्री सुधीर करंदीकर
☆ “कुत्र्याचे शेपूट…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
कालचीच गोष्ट आहे, नेहेमीप्रमाणे सकाळी उठ्ल्यावर घराभोवती बागेत चक्कर मारायला बाहेर आलो. बऱ्याच दिवसांनी बागेत भारव्दाज पक्षाला बघून मन प्रसन्न झाले. आजचा दिवस जरा जास्तच चांगला जाणार आणि कोणीतरी खास भेटणार हे नक्की. बायको मुलीकडे रहायला गेली असल्यामुळे चहाशिवायच फ़िरायला बाहेर पडलो. तेवढाच एक चहाचा कप पोटात कमी, म्हणून खुश झालो.
मारुती मंदिराशी आलो आणि ‘काका’, ‘काका’ असे मंजुळ स्वर कानावर आले. आसपास अजून कोणी काका नाहीत हे बघून मागे वळून पाहिले तर समोर मेघना आणि मनवा.
मनवा : काका, चालतांना थोडे आजूबाजूला पण बघत जा. आमचं लक्ष नसतं तर तुम्ही सरळ पुढे गेला असता!
मी : सॉरी, सॉरी. (मनामधे – अहो, सवयीचा परिणाम. बायको असली की नाही बघता येत, इकडे तिकडे)
मेघनानी बाजूच्या चहाच्या टपरीच्या दुकानदारांना खूण करून 3 चहा सांगितले.
मेघना : काका, इतक्यात कुठली ट्रीप वगैरे ?
मी : नुकतच एका लग्ना करता नागपूरला गेलो होतो. बायकोच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं.
मनवा : मग, आता आम्हाला व्हाट्सअप वर नागपूरचं टूर वर्णन कां?
मी : नाही, लग्न असल्यामुळे फार फ़िरणं झालं नाही. पण एक वेगळेपण नक्कीच सांगतो. आणि त्यावर मला तुम्हाला एक शंका पण विचारायची आहे.
मी : लग्नाच्या आदल्या दिवशी तिथला मित्र शर्मा याच्याबरोबर त्याच्या बाईकवर नागपूर मध्ये भरपूर भटकंती केली. पण कंबर आणि पाठ यांना जाणवेल असा एकहि दणका तिथे बसला नाही. तिथे रस्त्यावर खड्डे खूप कमी दिसले आणि ते छोटे होते. काही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, पण सगळे एकाच जातीचे.
मेघना : ग्रेट. आता स्पीड ब्रेकर मधे जाती कुठून आल्या ?
मी : जाती म्हणजे प्रकार. तिथले सगळे स्पीड ब्रेकर प्लॅस्टीक सारख्या मटेरियलचे, पिवळ्या रंगाचे आहेत.
मनवा : वा:, आपल्याकडे अनगिनत स्पीड ब्रेकर तर आहेतच आणि प्रत्येकाची उंची वेगळी असते, रूंदी वेगळी असते. रस्त्यावरचे खड्डे काही ठिकाणी भयानकच आहेत. त्यामुळे प्रत्येक हाडाला दणका आणि खुब्याला हादरा बसलाच पाहिजे. चौकामध्ये खड्डा बघू, का सिग्नल बघू, का वेडेवाकडे चालणारे लोक बघू, का वाजणारा मोबाईल बघू, अशी गाडी चालवणाऱ्याची हालत होते.
मी : ह्यावरच माझी शंका आहे. एकाच राज्यात दोन्ही गावे आहेत. मग असा फ़रक का?
मेघना : काका, प्रश्न छानच आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हीच म्हणता की पुण्याचा ट्रॅफ़िक सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखे आहे.
मी : बरोबरच आहे, लोक आणि आजकाल लेडीज पण – सिग्नल पाळत नाहीत, स्पीड लिमीट पाळत नाहीत, नो एन्ट्री पाळत नाहीत. गाड्या उलटीकडून आणणे, फ़ूट्पाथवर नेणे, हे सगळीकडे दिसते. चालणारे कुठुनही चालतात. पार्कींग, साईड इंडिकेटर, हेडलाईट, हॉर्न, हे वेगळेच. हे सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखेच आहे.
मेघना : खरतरं आपल्याकडे कुठ्ल्याहि गावाचा ट्रॅफ़िक सुधारणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासारखे आहे.
कुत्र्यांमधे बऱ्याच जाती असतात. जाती म्हणजे ब्रीड. जसे पामेरियन, डॉबरमन, अल्सेशियन वगैरे.
ब्रीड प्रमाणे शेपटाचा कडकपणा कमी जास्त असतो, गोलाई कमी जास्त असते. म्हणूनच, जसं ब्रीड, तशी त्याची कमी-जास्त कडक शेपूट आणि त्याप्रमाणे शेपूट सरळ करण्याचे वेगवेगळे तंत्र किंवा टेक्निक. म्हणून नागपूर वेगळे, पुणे वेगळे, मुंबई वेगळे, वगैरे.
मी : म्हणजे रस्त्यावरचे खड्डे, स्पीड ब्रेकरचे प्रकार, हीच ती शेपूट सरळ करण्याची टेक्निकस् आहेत असं आपण समजायचं का ?
हो, आणी नागपूरमध्ये इथल्यासारखे रम्बरलस् पण दिसले नाहीत. पुण्यात काही रस्त्यांवर तर थोड्या थोड्या अंतरावर रम्बरलस् ची माळ असते. गाडीचा वेग कमी केला, तर कंबरेला ‘दण–, दण–, दण–, दण–, ——–’ असे धक्के बसतात आणि वेग कमी नाही केला, तर कंबरेला ‘दण, दण, दण, दण, ——–’ असे दणके बसतात. काय करावे समजतच नाही.
मनवा : रम्बरलस् चा शोध लावणारा नक्की इथलाच असणार ! हा प्रकार आम्ही पण इतर कुठेहि बघितला नाही.
मेघना : तुम्ही म्हणता भूतान मधे स्पीड ब्रेकर नसतात आणि बऱ्याच ठिकाणी सिग्नल पण नसतात. तरीही वाहतूक सुरळीत असते. याला म्हणतात ‘समझ की क्रांति’. परदेशात स्पीड ब्रेकर नसतात, पण कायदे – कानून खूप कडक असतात, तिथे पण सगळे सुरळीत चालते. जिथे या दोन्हींचा अभाव असतो तिथेच शेपूट सरळ करण्याची टेक्नीक वापरावी लागतात !
इथे मोठे मोठे फ़्लाय ओव्हर बांधतात, भुयारी रस्ते बांधतात, तिथे खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बनवणे अशक्य आहे कां ? रस्त्यावरच्या ड्रेनेज चेंबरचे झाकण रस्त्याच्या लेव्हलला आहे, असे इथे कुठेही बघितले आहे कां? चेंबरवरून गाडी गेली की दणका बसतोच. ही लेव्हल ठेवणे अशक्य आहे कां ?
मी : नक्कीच नाही. मग असे करत का नाहीत !
मनवा : काका, सगळ्याचा कर्ता – करविता ‘तो’ आहे. त्याची लीला तोच जाणे.
मेघना : काका, कुत्र्यानी मनात आणले तर तो आपली शेपूट स्वत: सरळ करू शकतो. कुत्र्यासमोर त्याच्यापेक्षा वरचढ कुत्रं आलं की तो आपली शेपूट सरळ करून पायामधे घेतो.
जोपर्यंत आपल्यामधे ‘समझ की क्रांती’ येत नाही किंवा समोर कडक कायदे येत नाहीत तोपर्यंत, तो आपली लीला करतच राहणार ! आणि तोपर्यंत —–आपण आहोत – आपले गाव आहे – ब्रीड प्रमाणे कुत्र्याचे शेपूट आहे – आणि कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याची टेक्निकस् आहेत – आपली पाठ आहे – आपली कंबर आहे. वर्षे गेलीत, तशीच अजूनही वर्षे जातील.
मी : वाह:, छानच माहिती मिळाली ! ‘समझ की क्रांती’ ला पर्याय नाही हे उघड आहे.
इस बात पर आज की चाय मेरी तरफ़से हो जाये!
मनवा : जरूर, बशर्ते की ——
आम्ही तिघेही एकदम : पेमेंट कैश नही, पेटीएम से होना चाहिये.
तेवढ्यात चहावाले म्हणाले : मैड्म, बाजूला बघा, तुमच्या गोष्टी ऐकायला सगळे चहा पिणारे मोबाईल बंद करून भोवती जमा झाले आहेत. त्यांचे २-२ चहा झालेत. मला पण छानच् माहिती मिळाली. ‘समझ की क्रांती’ लानी ही पडेगी. आप तिनोकी चाय आज मेरी तरफ़से – ‘फ़्री’.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





