सुश्री नीता कुलकर्णी
☆ “ भोंडला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमच्या लहानपणी देवीचं नवरात्र बसायच्या आधी आई, आजीची पूर्ण घराची स्वच्छता सुरू व्हायची. डबे घासले जायचे.. एकूण एक अंथरूणं, पांघरूणं, धुवायची. वडील, भाऊ मदतीला यायचे. श्रमाचे संस्कार आपोआप व्हायचे. आम्हाला आईच्या हाताखाली कामं करायला लागायची. त्याचे काही वाटायचे नाही…
कारण देवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा. मी आणि सुधा आमच्या दोघींच्या घरी हे नवरात्र बसायचे. त्यामुळे इतर मैत्रिणी भोंडल्याची वाट बघत असायच्या.
शाळा साडेपाचला सुटायची. आई आजीने तयारी केलेली असायची. पाटावर आजी रांगोळीने हत्ती काढायची. त्यावर हळदीकुंकू वाहून, फुलांनी सजवायची. तजेलदार अशी केशरी पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं फार सुरेख दिसायची.
मैत्रिणी दप्तर ठेवून पळत यायच्या. कपड्यांची फारशी फिकीर नसायची. जरा बऱ्यापैकी फ्रॉक असेल तो घालायचा. वाड्यातल्या काकु, त्यांच्या मुली, सुना फेर धरायच्या. मध्यभागी पाट ठेवायचा आणि हातात हात गुंफून गोल फिरत गाणी सुरू व्हायची. वर्षानुवर्ष या गाण्यांचा क्रम ठरलेला असायचा. आम्ही सर्व गाणी रोज म्हणत होतो… हा वारसा परंपरेने आपोआप पुढे जायचा. आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. गंमत म्हणजे तेव्हा त्या गाण्याचा अर्थ माहित नव्हता. तो नंतर समजला….
.. ऐलोमा पैलोमा गणेश देवा… असं देवाचं नाव घेऊन भोंडला सुरू व्हायचा.
.. अक्कण माती चिक्कणमाती… या गाण्यात अस्स सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं… म्हणताना आई.. काकू खुसुखुसु हसत असायच्या. त्या का हसायच्या हे खूप वर्षानंतर कळलं.
.. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली… आणि श्री कांता कमल कांता…. हे वेड्याच्या बायकोचं गंमतशीर गाणं म्हणताना आम्हाला फार मज्जा वाटायची.
पूर्वी लहान असताना लग्न व्हायची. म्हणूनच ‘ कारल्याचा वेल लाव ग सुने.. ’ या गाण्यातून सासूबाईंचं ऐकायचं हा छानसा संदेश दिलेला आहे. तसंच पुढे सासुरवास होणार आहे.. हेही कदाचित सुचित करायचं असेल…
सुनबाईंच्या समाधानासाठी पुढचे गाणे आहे…..
‘सासुरवाशी सून रुसून बसायची…. ‘ सगळे समजवायला जायचे पण ती कोणाचचं ऐकायची नाही. नवरा जेव्हा समजवायला जायचा तेव्हा बाईसाहेब यायला तयार व्हायच्या….. सासरी गेल्यावर फक्त त्रास नाही तर प्रेम करणारा नवरा आहे… हे तिला माहित करून दिलं जायचं.
… नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
या गाण्यात शेवटी…
… घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
अशा ओळी आहेत. घरातील लक्ष्मीचा आदर झाला पाहिजे… असं सांगितलेलं आहे. खरं तर सुखी जीवनाचं सार या गाण्यात आहे. अतिशय लडिवाळ गोड भावना व्यक्त करणार गाणं आहे.
आज ही गाणी लिहितानाही त्यांचा ताल, लय तो ठेका माझ्या मनात वाजतो आहे….
आता लक्षात येतं की खेळता खेळता शारीरिक व्यायाम होत होता. त्याबरोबर थोडसं शहाणपण शिकवणारी, मनाला आधार देणारी.. हसवणारी अशी ही गाणी होती. भोंडल्यानी आनंददायी वातावरण निर्माण व्हायचं. वाड्यातल्या लोकांचा एकोपा वाढायचा. संस्कृती परंपरा जपली जायची.
” आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला “
… इतकं साधं गाणं पण अगदी झोकात आणि जोरात म्हटलं जायचं.
नंतर खिरापतीची गंमत सुरू व्हायची.. ती ओळखता येणार नाही अशी करायची. कोणी ओळखली की जोरजोरात हसू यायचं… खिरापत खाऊन झाली की आमचा घोळका सुधाच्या घरी निघायचा.. तिथे हीच गाणी…. तेवढीच गंमत यायची…
किती सुखाचे दिवस होते…. सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता.
आज वाड्यातल्या काकू, ताई आठवल्या… न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली….. पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली… आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडेसुद्धा ती उचलून टाकायची…
… आम्हाला असं अथांग, निरपेक्ष प्रेम मिळालं…. हे आपल्या पिढीचे खूप भाग्य आहे….
देवी आईचं नवरात्र बसलं आणि आठवणीतून हे सगळं सुख मनात दाटून आलं… मन हळवं झालं…
आज त्या सगळ्यांच्या आठवणीसाठी हे चार शब्द….
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





