सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ अस्मिता… लेख क्र. १५ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
“अस्मिता” संस्थेचे दादा पटवर्धन स्वतः आमंत्रण द्यायला आले होते त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी जोगेश्वरीला गेले होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या संस्थेतील अपंग मुलांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम होता, डोळे, हात, पाय अशा अवयवांचे अपंगत्व असलेले मुलं यात गाणार होती.
सुरुवातीला, अस्मिता शाळेच्या बँडपथकाचे संचलन झाले. डोळे दिपवणारे व अंगावर रोमांच उभे करणारे असे संचलन होते ते. सर्वात पुढे असलेला मुलगा हातात असलेल्या ध्वजदंडाचे विविध प्रकार लीलया करत होता. बँड पथकाने वातावरण निर्मिती खूपच छान केली.
प्रथम गाणे सादर केले त्या व्यक्तीच्या घरातील चारही जण अंध होते (बायको, भाऊ, मुलगी व ते स्वतः). तरीही ते सर्वजण कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते. दुसऱ्या अंध बाई एम ए झालेल्या होत्या, शिवाय संगीतविशारद होत्या. कमरेपासून खाली पायात अजिबात संवेदना नसलेली मुलगी चार्टर्ड अकाउंटंट झाली होती तसेच संगीत विशारदही होती.
अशा विविध प्रकारे अपंगत्व असलेल्या विविध वयोगटातील व्यक्तींचे गीत नृत्य आधी विविध कार्यक्रम पाहिल्यावर त्यांच्या दिला सलाम करावा असेच वाटतं.
आपण धडधाकट असूनही सतत रडगाणे गातो, याचा मला नेहमीच राग येतो. आहे त्या परिस्थितीला हसतमुखाने तोंड दिले तर दुःख सुसह्य होते. संकटांना म्हणावं, “या, तुमचं स्वागत असो, ” आणि देवाला म्हणावं, “संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य मला दे. “
आजच्या “अस्मिता” संस्थेतील कार्यक्रमाने जगण्याची एक नवी उभारी मिळाली.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





