श्री मकरंद पिंपुटकर
☆ कर्माचा सिद्धांत… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
जर तुमच्या कृतीने इतरांचे भले झाले, त्यांना आनंद झाला, तर ते चांगले कर्म समजले जाते. आणि तुम्ही असे चांगले कर्म केलेत, तर त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळतेच मिळते.
…. याउलट, तुमच्या एखाद्या कृतीने दुसऱ्या कोणाला वेदना अथवा त्रास झाला, तर ते वाईट कर्म समजले जाते, आणि त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळते.
– – आणि हाच कर्माचा साधासोप्पा सिद्धांत आहे.
सोमवार सकाळ, चिंचवड स्टेशन, सकाळी ६:३५ ची वेळ. तमाम चाकरमान्यांना मुंबईला घेऊन जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसची वेळ झाली होती. वीकेंड संपवून आठवडाभर कामाच्या गाड्याला पुन्हा जुंपले जाण्यासाठी, नाईलाजाने व दुःखीकष्टी चेहऱ्याने लोकं “आलीया भोगासी असावे सादर” म्हणत फलाटावर उभे होते.
तोबा गर्दी होती. गाडीचा भोंगा वाजला, इंजिन दिसू लागलं, आणि रेटारेटी सुरू झाली.
मी आठव्या डब्याशी उभा होतो, सिंहगड एक्सप्रेसचा आठवा डबा चिंचवड स्टेशनला उघडतो, त्यामुळे या डब्यात, पटकन चढता आलं, तर थोडं नीट उभं राहता येतं, आणि नशीब चांगलं असलं, तर चक्क बसायलाही जागा मिळते.
अन्यथा बाकी सर्व विनाआरक्षित, सामान्य (जनरल) डबे मुंबईच्या लोकलच्या गर्दीच्या तोंडात मारेल असे तुडुंब, खचाखच आणि ठासून भरलेले असतात, आणि निदान कल्याण स्टेशन येईपर्यंत दोन तासतरी एका पायावर उभं राहण्याची तपश्चर्या करण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते.
मी काही मुंबईला नोकरीला जात नाही, अचानक एका कामानिमित्त जायचं ठरलं म्हणून आरक्षणाशिवाय आज हा असा फलाटावर उभा होतो.
गाडी तशी थोडी धीम्या गतीनेच येत होती आणि नजरेसमोरून जाताना, निम्मा सहावा डबा (विना आरक्षित) चक्क रिकामा दिसला. मी ललचावलो. आणि गाडी थांबण्यापूर्वीच, चालत्या गाडीचा सहावा डबा पकडण्यासाठी मी धाव घेतली.
मी आता अगदी दरवाजा पकडणार, तेवढ्यात एका माजोरी, उर्मट, उडाणटप्पू तरुणाने मला धक्का दिला, माझ्याआधी दरवाजा पकडला, आणि मान मागे वळवून, माझ्याकडे बघत, छद्मी हसत, “जितं मया” आविर्भावात, मला उद्देशून “हट बे बुढाऊ” म्हणत, ढांगा टाकत त्या रिकाम्या डब्यात घुसला, खिडकीची जागा पकडायला धावला आणि…
… एका दारुड्या माणसाने केलेल्या गलिच्छ उलटीमध्ये पाय पडून तो घसरला. त्या डबाभर पसरलेल्या त्या उलटीत तो लडबडला, पार उलटापालटा झाला, आपादमस्तक माखला.
बाकीची गाडी खच्चून भरलेली असूनही डब्याचा हा भाग रिकामा असण्याचं कारण आता कुठे ध्यानात येत होतं. उलटीपासून सुरक्षित अंतर ठेवून अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू फुटलं, पण त्या ढवळल्या गेलेल्या उलटीच्या नव्याने पसरलेल्या उग्र वासाने त्यांनी पटकन आपले चेहरे आणि नाकं रुमालाने झाकली.
मी त्या डब्याचा नाद सोडला, गाडी थांबत होती, चिंचवडला उघडला जाणाऱ्या डब्यात already खूप गर्दी झाली होती, मी त्यात शिरलो, त्या अमाप गर्दीत सँडविचमधल्या काकडी – टोमॅटोसारखा चेपलो गेलो, अगदी एका पायावर जेमतेम उभा होतो म्हणा ना.
पण त्या घाणीत लडबडलेल्या त्या टपोरीपेक्षा मी खूपच सुखात होतो.
Karma returns, जैसी करणी वैसी भरणी हा “कर्माचा सिद्धांत” पुन्हा एकदा सार्थ ठरला होता.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





