श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
मागच्या दोन वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे. मी लिहिलेली ओवाळणीची कविता सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ती कविता लातूरला एका व्यक्तीने वाचली. आणि त्याने मला थेट कॉल लावला. आणि जवळपास तो माणूस दहा मिनिट फक्त हुंदके देत राहिला. हुंदका आवरत तो इतकंच म्हणाला.. ‘ सध्या बोलता येत नाही. संध्याकाळी पुन्हा कॉल करतो. फक्त उचला. ’ …. एवढंच बोलून फोन कट झाला.
…… तर गंमत अशी होती की जमिनीच्या झालेल्या वादातून बहीण आणि भाऊ यांच्यात जवळपास चार वर्षे बोलणं बंद झालेलं होतं. ही कविता त्या भावाने वाचली आणि थेट बहिणीच्या घरी सगळी कागदपत्रे घेऊन गेला. सगळी संपत्ती तिच्या नावावर करायला तयार आहे म्हणाला.. ‘ पण हा रुसवा नको ताई ‘ म्हणून मनमोकळेपणाने रडला. दोघेही भाऊ बहीण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. आणि संध्याकाळी या दोघांनीही मला फोन करून धन्यवाद दिले होते.
…. माझ्या कवितेला मिळालेलं हे फार मोठं बक्षीस होतं.
तीच कविता पुन्हा एकदा आपल्या हवाली करतोय.
☆ ओवाळणी… ☆
ओवाळणीच्या ताटात नोटा
टाकून झाल्यावर…
त्याने तो कागद पुढे केला
आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…
ताई इथं तुझी सही हवीय फक्त…
तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला
पदराने डोळे पुसत हसत म्हणाली,
आण तो कागद
दादा सही करते
फक्त एक वचन देऊन जा
वर्षभर आला नाहीस तरी चालेल
दर भाऊबिजेला न चुकता येत जा..
माय बाप गेलं
आत्ता माहेरही रुसलं आहे..
मातीतल्या नात्याचं नावही
पुसलं आहे..
मुलांना चांदोमामाची ती
रोज गोष्ट सांगते..
मुलं झोपी जातात तेव्हा..
तिच्या डोळ्यात जत्रा
माहेरची पांगते..
सुखी ठेव देवा भाऊराया माझा
नवस रोज मागते..
किती किती आणि कितीतरी
भावाचं कौतुक सांगते सासरी..
अन तिच्या माहेरात फक्त तिची
वाट पाहते ओसरी…
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
लेखक / कवी
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




