सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ माऊली… लेख क्र. १८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
खादी शिक्षिका गैरहजर असेल, तर तात्पुरता वर्ग सांभाळण्यासाठी पालक-प्रतिनिधी बोलावले जातात. यावर्षी पहिलीच्या नवीन पालक प्रतिनिधी वर्गावर आल्या. त्यांची ओळख करून घेतली. वर्ग छान सांभाळल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले, त्यांचे अभिनंदन केलं. पहिलीत असलेल्या त्यांच्या मुलाबद्दल चौकशी केली.
त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून आश्चर्यचकित झाले, अवाक झाले. त्यांना चक्क नमस्कार केला.
वयाची नुकतीच पंचविशी ओलांडली असेल तिने. परंतु तिचे विचार आणि आचरण दोन्ही अतिशय वंदनीय होते.
मुळात पहिलीत असलेला मुलगा हा तिचा मुलगा नव्हताच मुळी.
तिच्या यजमानांचे पहिले लग्न त्यांच्या मामाच्या मुलीबरोबर झालेलं. तिचं आधीपासून कोणा दुसऱ्यावर प्रेम होतं. या मुलाच्या जन्मानंतर, त्या बाळाला सोडून ती चक्क तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली.
या बाळाला आई हवी, म्हणून तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. आणि या माऊलीनं पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आणि त्याला वाढवलं. दिराचा मुलगा लहान असतानाच, त्याचे आईवडील – हिचे दीर आणि जाऊ – अचानक वारले. हिनेच त्याचंही पालन पोषण केलं, तो आता आठवी इयत्तेत आहे.
खूप कौतुक वाटलं मला तिचं…
स्वतःच्या मुलाचं सर्वच प्रेमाने करतात. परंतु, एक सवतीचं आणि एक दिराचं, अशा दोन मुलांचे, आपलेपणाने, हसतमुखाने करणे वाटतं तितकं सोप्पं नाही. पण या छोट्या वयात ही माऊली प्रौढपणे ही जबाबदारी पार पाडत होती.
खरोखरच नमस्कार करण्यासारखी ही गोष्ट नाही का?
– लेख क्र. १८.
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






