सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘शिंपलेलं चांदणं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बागेतल्या बाकावर उदास मनाने बसलेल्या त्या बाबांना मी रोज बघते. कुणाशी बोलणं नाही, हंसणं नाही की, घरी लवकर जाणं नाही. खिन्न मनाने, उदास चेहऱ्याने त्या ठराविक, ठरलेल्या जागेवर बसणाऱ्या त्या गृहस्थांजवळ मी एक दिवस जाऊनच बसले.
“एक विचारू का बाबा? एकटं बसायचा कंटाळा नाही कां हो येतं तुम्हाला? “
“काय करणार पोरी घरीदारी या दुनियेत मी एकटाच आहे. अर्धांगिनी अर्ध्या वाटेवरून सोडून गेली. ती होती तेव्हा तिची किंमत कळली नाही, तिच्याअसण्याचं महत्त्व मला जाणवलचं नाही आणि तिच्या उशिरा उमजलेल्या किमतीचं मोजमाप ऐकायला ती आता या जगातच नाही. कुणाची बोलू मी? काय करू? कसा वेळ घालउ? कळेनास झालंय मला”.
त्या दिवसापासून आमच्यात संवाद सुरू झाले, ओळख वाढली आणि बाबा भरभरून माझ्याशी बोलू लागले. एकत्र बसून डबा पार्टीपर्यंत आमची मैत्री वाढली…
आणि एक दिवस मी त्यांना खुलवण्यासाठी प्रश्न विचारला, ” काय हो बाबा गायला आवडतं का तुम्हाला? माझ्या प्रश्नावर ते गडगडाटी हसत उत्तरले, “मी? आणि गाणं? अगं हा तानसेन गायला लागला ना तर प्रेक्षक सैरावैरा धावत सुटतील. ” बाबांची विनोद बुद्धी हळूहळू जागृत होत होती. माझंच घोडं मी पुढे दामटतच राह्यले. ” बरं राह्यलं! पण बाबा गाणं ऐकायला तर आवडेल ना तुम्हाला? एकटेपणावर मात करण्यासाठी कुठलातरी छंद हा हवाच. छंद माणसाच्या भरकटलेल्या मनाला एके ठिकाणी बांधून ठेवतो. गोंधळलेलं अंतर्मुख झालेलं मन छंदात गुंतवलं ना की सैरभैर होत नाही. असं मला तरी वाटतं हं बाबा “
“ते सगळं ठीक आहे गं, पण माझ्या आयुष्यातले रंगच उडालेत. “
“बाबा दिवाळीत रांगोळीत आम्ही बायका रंग भरतोचं ना! अगदी रांगोळी पुसली जाणार आहे हे माहित असून सुद्धा रांगोळी रंगवतो. प्रसन्न वातावरणात जाऊन, मन आनंदी ठेवून, शुद्ध वातावरणात वावरून, तुमच्याही आयुष्यात तुम्हाला पुन्हा रंग भरता येतील. “
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं नाही का! बाबांच्या निरागस चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. कालचा ताजा अनुभव होताच माझ्याजवळ. तो धागा पकडून मी म्हणाले, ” बाबा नका म्हणू गाणं! पण सुरेल, सुंदर गाणं ऐकायला तर आवडेल नां तुम्हाला? ”.
“हो तर! तान नाही पण मान डोलवायला नक्कीच जमेल मला. अग पण हल्ली धांगडधिंग्या शिवाय कार्यक्रम होतातच कुठे? आम्ही जुन्या काळातले, जुन्या गाण्यात रमणारी माणसं, आर्केस्ट्राच्या कानठळ्या कोण ऐकेल? “.
“नाही बरं का बाबा! काल मी ऐकलेला कार्यक्रम साधा, सुंदर मनाला भुरळ घालणारा असाच होता. थांबा, ऐका ना! , सविस्तरच सांगते तुम्हाला.. श्रीकांत साने-मृणालिनीताई साने या जोडगोळीने, गायक श्री प्रभाकर कुलकर्णी, वृषाली क्षीरसागर, सौ. साने, हार्मोनियम साथ श्रीकांत साने, व्हायोलियन साथ विवेक बनगे आणि तबला संगत प्रकाश पंडित ह्या समस्त कलाकार मंडळींच्या साथीने एक उत्तम टीम तयार झाली आहे. कोजागिरीचं औचित्य साधून हा बहारदार कार्यक्रम माणिकबाग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुंदर गार्डन गणेश मंडपात खूपच रंगला. सूर्यास्त होऊन चंद्रोदय होण्याच्या मार्गावर चंद्राची गाणी या मंडळींनी सादर केली. जय शारदे प्रार्थनेपासून सुरू झालेला हा सगळ्याच कलाकारांनी सादर केलेला, अतिशय सुंदर, आखीव कार्यक्रम कैवल्याच्या भैरवीपर्यंत येऊन अगदी वेळेत साजरा झाला. आणि तो कधी संपला कळलच नाही. त्यात ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, चंद्र आहे साक्षीला इत्यादी शांत, प्रसन्न गाण्यांचा समावेश होता. तर ‘कशी झोकात चालली’, अरे जा रे नटखट इत्यादी ठेक्यातल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध होऊन प्रेक्षकांनीही ठेका धरला होता. श्री साने हयांचं हार्मोनियम आणि खुसखुशीत निवेदन, सौ मृणालिनीताईंची माणिक वर्माची सुंदर गाणी, वृषालीताईंची गवळण, श्री प्रभाकर कुलकर्णी ह्यांची सुरेल गाणी, जोडीला श्री. विवेक वनगे ह्यांची व्हायोलिन संगत, श्री प्रकाश पंडितांचा तबल्याचा ठेका, सगळ्यांच्याच साथीमुळे कार्यक्रम बहारदार झाला. प्रत्येकाच्या बोलण्यात विनम्रता होती बालगंधर्वांच्या काळातही हे हौशी कलाकार आम्हाला घेऊन गेले. ‘प्रेक्षक आमचे मायबाप’.. ह्या वाक्याला स्मरून त्यांनी लांबून आल्याबद्दल आमचे आभार मानले तेव्हां त्यांना, धन्यवाद देऊन मी म्हणाले, ” तुमच्या सगळ्यांच्या आवाजातचं इतकी जादू आहे की तो आवाजच आम्हाला इथपर्यंत घेऊन आला आहे”
– माणिकबाग ज्येष्ठ मंडळींनी अगत्याने दिलेलं दुग्धपान करून पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊनच, मी त्या श्रीगणेश मंडपातून बाहेर पडले..
बाबांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर दुःखाच्या काळोखाआडून त्यांच्या चेहऱ्यावर चांदणं पसरल्याचा मला भास झाला. उस्फूर्तपणे ते म्हणाले, “अगं मग मला का नाही नेलंस त्या कार्यक्रमाला? मी पण आलो असतो की, “
“अगं बाई खरंच लक्षातच आलं नाही हो माझ्या. चुकलंच माझं ” ही खंत माझ्या चेहऱ्यावर उमटली.
तेव्हा ते दुःखाच्या पडद्याआडून बाहेर आलेले सद्गृहस्थ म्हणाले, “असू दे! असू दे! पुढच्या वेळेला मला नक्की घेऊन जायचं. तुझ्या रसभरीत वर्णनाने हा रंगभरीत कार्यक्रम ऐकायला मी अगदी उतावळा झालोय बघ. “
“ हो बाबा अगदी नक्की जाऊ आपण” आश्वासन देता देता थर्मासमधलं आटीव केशरी दूध मी पेल्यात भरून बाबांच्या पुढे केलं.
… दुधात चंद्राचं चांदणं मिसळलं होतं तर नवीन छंद गवसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावरही चंद्र प्रकाश पसरला होता. बाबा निराशेतून बरेचसे बाहेर आले होते, त्या गायक वादक छंद जोपासलेल्या कलाकारांना माझा मनःपूर्वक सलाम..
ह्या मंडळींचा हा, उत्साही वयातला मनाला आल्हाद देणारा पंचाहत्तरीकडे वाटचाल करणारा छंद तुमच्यापुढे यावा म्हणून हा मनापासूनचा लेखन प्रपंच..
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





