सौ. जयश्री पाटील
मनमंजुषेतून
☆ माझ्या सासूबाई… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
सासुबाई म्हटलं की नकळतच मनावर दडपण येतं. लग्नाच्या वेळी वाटतच आपली सासरची माणसं कशी असतील. त्यातल्या त्यात सासुबाई कशा असतील. मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो. सासरी जाण्याआधी मी साखरपुड्याच्या वेळी सासूबाईंना पाहिलं होतं. आमच्या सासूबाई दिसायला सुंदर, गोऱ्यापान, सरळ नाक, नाजूक ओठ, गोल सुबक अंगकाठी, काठापदराची सूती साडी. आधी पूर्वी नऊवारी नेसायच्या पण नंतर नंतर सहावारी नेसायला लागल्या. मी पाहिलं तेव्हा सहावारीतच होत्या. मोजकेच पण ठसठशीत दागिने. कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करजगी सीमा भागातील माझं सासर. गाव खूप लहान पण आमचं खूप मोठे दुमजली घर. बऱ्याचशा खोल्या भाताच्या मोठमोठ्या कनग्यांनी भरून गेलेल्या असायच्या. मोठं न्हानीघर. मोठा पाणी तापवायचा गोल हंडा. त्यासाठी मोठीच्या मोठी सिमेंटमध्ये बांधलेली चूल. पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. घराच्या मागे विहीर. विहिरी मधून सतत कोणी ना कोणी पाणी आणायचे आणि तो हौद कायम काठोकाठ भरलेला ठेवायचे. एकत्र कुटुंब चार भाऊ दोन बहिणी आणि त्यांची मुलं. घर भरलेलं वाटायचं. मी लग्न होऊन आले तेव्हा फक्त धाकट्या दिरांचा लग्न व्हायचं होतं. मी महाराष्ट्रातली. माझा कधी खेड्याशी फारसा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे खेडवळ बोली मी फारशी ऐकली नव्हती. आता तर कर्नाटकातली सीमा भागातली भाषा. भाषा मराठी असली तरी थोडी वेगळी होती. मला ती फारशी समजायची नाही. सासरचे लोक एकमेकांशी बोलताना भरभर बोलायचे. मला एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्द अडला की माझा विचार करण्यात वेळ जायचा. वाक्याचा अर्थ लावे पर्यंत त्यांचं संभाषण पुढे गेलेलं असायचं. त्यामुळे माझा खूप गोंधळ उडायचा. तिथे सगळा स्वयंपाक चुलीवर केला जायचा. फक्त चहा कॉफीसाठी गॅस तोही गोबर गॅस वापरला जायचा. मला चूल पेटवायला अजिबात जमत नव्हते. लाकडांची रचना करता यायची नाही. फुंकणीने फुंकायला यायचं नाही. तिथल्या तांदळाच्या भाकरी मला तिथे असेपर्यंत कधीच थापायला आल्या नाहीत. मोठे कुटुंब असल्याने मोठ्या पातेल्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा. तिथे सांडशी वापरत नसत कपड्याने भांडी उतरवणे ठेवणे मला जमायचे नाही. तिथे काही चिरायचं असेल तरी विळा वापरला जायचा. मला आपल्या इकडल्या विळीची सवय. तो विळा मला पायात धरून काही चिरायला यायचे नाही. कपडे धुण्यासाठी पाणी काढणं मला त्रासदायक व्हायचं. अशाप्रकारे मी तिथे किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही कामाची किंवा उपयोगाची नव्हते. मला सगळं येतं हा गर्व तिथे गेल्यावर गळून पडला. त्यामुळे मी झाडलोट करणे, तांदूळ निवडणे, कपडे सुकत घालणे, कपड्यांच्या घड्या घलणे भाज्या लसूण निवडणे, अशा प्रकारची वरवरचीच कामे करत होते. माझ्या सासूबाई इतर सूनांच्या बाबतीत थोड्याशा कडक होत्या. गावातही त्यांचा दरारा आमच्या गावातील शेजारच्या स्त्रिया सुद्धा त्यांना दचकून असायच्या. पण मला त्या त्यांच्याबरोबर जेवायला घेऊन बसायच्या. त्या माझ्याशी फारशा कडकपणे वागत नाहीत हे माझ्या जावांना दिसत होतं. न राहून एकदा जावेने मला म्हटले, आम्हाला कधी त्यांनी त्यांच्याबरोबर जेवायला घेतलं नाही, तुला मात्र पहिल्या दिवसापासून स्वतःबरोबर जेवायला घेतात. माझ्या सासुबाई कमी बोलणाऱ्या परंतु अतिशय विचारपूर्वक आणि मार्मिक बोलायच्या. नवीन असताना एक खूप मजेशीर प्रसंग घडला. मी धुतलेली भांडी लावायला लागले होते. मी भांडी घेऊन उठणार एवढ्यात सासूबाईंनी वरच्या जाळीतून ताट काढले आणि ते ताट माझ्या डोक्याला जोरात लागले मी जोरात ओरडले माझा जीव कळवळला आणि त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी माझं डोकं धरलं व चोळायला लागल्या. मी ओरडल्यामुळे सगळे धावत आत आले. काय झाले काय झाले विचारू लागले. माझ्या सासूबाई त्यांना त्यांच्या भाषेत पटपट घडलेलं सांगत होत्या. त्या बोलता बोलता म्हणाल्या ती उठली मी जाळीतून ताट काढत होते आणि तिच्या टकल्याला लागलं. टकल्याला हा शब्द ऐकल्यानंतर त्या अवस्थेतही मला खूप हसायला आलं. कारण आपल्याकडे टकला म्हणजे केस नसलेला माणूस ही संकल्पना होती. तिकडे मात्र डोक्याला टाकलं म्हणायचे. हसल्यामुळे माझ्या वेदना तात्पुरत्या कमी झाल्या. आणि सगळे जणच मग रिलॅक्स झाले. सासूबाईंना खूप वर्षापासून शुगर होती. त्यामुळे त्यांना खूप सांभाळून राहायला लागायचे. माझ्या जाऊ बाईंनी सांगितलं मी घरात आल्याबरोबर त्यांनी घरातलं काम करायचं सोडून दिला आणि त्यामुळे त्यांना शुगर झाली. यांच्या नोकरीमुळे मला सासरी फारसं राहावं लागलं नाही. परंतु आमचे सासू-सासरे वरचेवर दवाखान्यासाठी आमच्याकडे यायचे. ते जरी आमच्याकडे राहायला आले तरी इथलं शहरी वातावरण असल्यामुळे त्यांना इथे करमायचे नाही. मी काही वर्षानंतर सर्विस करायला लागले. आमच्या सासरी माहेरी दोन्हीकडे सुनांनी नोकरी करावी अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. परंतु मी हट्टाने सर्विसला लागले होते. एकदा माझ्या वडिलांनी सासूबाईंना विचारलं. “सुनबाई नोकरी करते तुम्हाला चालतय का. ” त्यावर त्यांनी एक क्षणभर विचार करून वडिलांना सांगितलं. “इथे तर सगळेच नोकरी करत आहेत. ” कारण आमच्या साहेबांना कामानिमित्त भेटायला येणाऱ्या काही स्त्रिया व त्यांचे संभाषण तसेच प्रत्येक शाळेतील शिक्षकांविषयीची चर्चा त्या नेहमीच ऐकायच्या. त्यामुळेच त्यांना माझ्या नोकरीबद्दल आता काही विशेष किंवा वेगळं वाटत नव्हते. माझ्या सासरी बरेचसे पदार्थ तांदळापासून बनवलेले असायचे. भाकरी केली तरी तांदळाची. भात आमटी तर असायचीच. ओल्या खोबऱ्याचा खूप वापर असायचा. त्या सर्वांना मासे खायची खूप आवड. एक दिवसांआड ते मासे खायचे. मला माशाचं वावडे. मला तिथल्या विहिरीच्या पाण्याचा सुद्धा वशाळ वशाळ वास यायचा. त्यामुळे मला तिकडचे जेवण आवडायचे नाही. तिकडे उपवासाला साबुदाणा बिलकुल वापरत नव्हते त्यामुळे माझा खरोखर उपवास घडायचा. परंतु आमच्या घरातील सर्वांनाच सगळीकडे ऍडजेस्ट व्हायची खूप सवय आहे. जेवणाच्या बाबतीत मी सोडून कोणी फारशी तक्रार करत नाही. परंतु हळूहळू सवय झाल्यानंतर मला तिथले जेवण खूप आवडू लागले. आता तंदुरी रोटी आपण मुद्दाम विकत घेऊन खातो. परंतु गावाकडली पाणी लावून हातावर थापलेली आणि चुलीवर भाजलेली तंदुरी रोटीची चव अप्रतिम लागते. मी जेव्हा सर्विसला लागले तेव्हा माझ्या पहिल्या पगारातील काही रक्कम मी सासरी मनी ऑर्डर केली होती. त्यावेळी फोन नव्हते. पत्रानेच कळवले जायचे. त्यानंतर मे महिन्यात सासरी गेल्यानंतर अंगणामध्ये खूप सुंदर तुळशी वृंदावन बनवून घेतलेले दिसले. त्याला मोठा चौकोनी पारही केला होता. घरात गेल्यानंतर जाऊ बाईंनी सांगितले तू दिलेल्या पगाराच्या पैशांमधून सासूबाईंनी हे सुंदर वृंदावन बांधून घेतले आहे. त्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती. माझ्या पैशाचा उपयोग त्यांनी इतका छान केला आहे हे बघून मला खूप आनंद झाला. अजूनही मला वृंदावन बघितली की त्यांची आठवण होते. माझ्या लग्नापूर्वी सासू सासरे आमच्या यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी हौसेने या दोघांना चारधाम यात्रेला पाठवले होते. काशीला जाऊन आल्याचे समाधान त्यांना मिळाले होते. माझे लग्न झाल्यानंतर त्या दोघांचेही दात बसवायचे होते. त्यानंतर दोघांचेही डोळ्यांचे ऑपरेशन करायचे होते. एकदा मात्र खूप परीक्षा पाहणारा प्रसंग घडला. सासुबाईंचे डोळ्याचे ऑपरेशन करताना त्यांना येऊन तीन चार महिने झाले तरीपण त्यांची शुगर नॉर्मल येत नव्हती. शुगर नॉर्मल येण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांसाठी औषध दिले होते. मी त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन रोज द्यायचे. आम्ही फ्लॅटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होतो. त्यामुळे रोज नर्सला एवढ्या वरती येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यासाठी ते शिकून घेतले. त्यांना चहा नाश्ता जेवण वेळेवर देणे आणि गोळ्या देणे हे काम मी जबाबदारीने करत होते. त्यावेळी माझा मुलगा दोन वर्षाचा होता. साहेबांची बदली दुसऱ्या गावाला होती. त्यामुळे ते जाऊन येऊन करायचे. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे. सासूबाईंच्या डोळ्याच्या ऑपरेशनची तारीख जवळ आली म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना ऍडमिट करायचे होते. म्हणून मी त्यादिवशी दुपारी त्यांना जेवणाचे ताट ठेवले पाण्याचा तांब्या व फुलपात्र ठेवले आणि आई तुम्ही जेवून घ्या असे सांगितले. तसेच नातवाकडे म्हणजे माझ्या मुलाकडे लक्ष द्या मी बाजारात जाऊन येते असे सांगितले. बरेचसे सामान व भाजी आणायची असल्यामुळे मला यायला जवळ जवळ दीड दोन तास लागले. मी जेव्हा घरी आले तेव्हा गेट उघड होतं आणि मुलगा तिथं खेळत होता. माझ्या हृदयात धस्सं झालं. एवढ्या उंचावरून तो गेटवरती चढून पडला बिडला असता तर अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. आईचं कसं काय लक्ष नाही. असं क्षणभर वाटलं आणि आत जाऊन बघते तर काय आई तशाच झोपलेल्या होत्या. टीव्ही तसाच चालू होता. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. जेवणाचे ताट तसेच उघडे होते. पाण्याचा तांब्या तसाच होता. हे भीतीदायक भयानक दृश्य बघून मला काहीच सुचेना. मी हाका मारायला सुरुवात केली. त्यांचा काहीच रिस्पॉन्स येईना. मी खूप घाबरले पिशव्या तिथल्या तिथे टाकून शेजारी गेले. भाभींना सांगितलं दुलेश कडे लक्ष द्या. मी दवाखान्यात जातेय. मी तसच चप्पल न घालता चौथ्या मजल्यावरून पळत आमच्या थोड्याशा जवळ असलेल्या पाठक हॉस्पिटल मध्ये गेले आणि सरळ डॉक्टरांच्या समोर जाऊन उभी राहिले त्यांना सगळी परिस्थिती भडाभडा सांगितली. त्यांनी लगेच स्ट्रेचर आणि दोन माणसं दिली. ते माझ्या आधी आमच्या अपार्टमेंट वरच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. मी पाठीमागून आले त्यांना स्ट्रेचर वर पाठवून मी घराला कुलूप लावले. मुलाला शेजारी भाभींना बघायला सांगितले. काय माहित त्यावेळी माझ्या मनात आले आणि मी रुमाला मध्ये थोडीशी साखर घेतली. मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळी त्यांना बाहेर झोपवले होते. मी त्यांच्या तोंडात सहजच साखर टाकली आणि काय आश्चर्य त्यांचा फेस कुठल्या कुठे गायब झाला आणि त्या एकदम जाग्या झाल्या “काय झालं ग जया मला ” म्हणून माझ्या गळ्यात पडल्या. मी त्यांची समजूत घातली. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. संध्याकाळपर्यंत तीन सलाईन झाले होते. डॉक्टरांना पुन्हा एकदा मी सगळी कल्पना दिली. जास्ती सलाईनमुळे शुगर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे का हे विचारले. त्यांनी रात्रीचे सलाईन थांबवले. तेव्हा आमच्या साहेबांना यायला रात्रीचे नऊ वाजले होते. परंतु तोपर्यंत त्यावेळी डॉक्टरांनी, शेजाऱ्यांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी खूप धीर दिला. रोज इन्शुलिन आणि गोळ्यांमुळे त्यांची शुगर कमी झाली होती. तसेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन म्हणूनही त्यांनी थोडं टेन्शनही घेतलं असावं. परंतु मी खूप घाबरले होते एवढं सगळं करून काही झालं असतं तर माझ्यावर आलं असतं असं वाटलं. शुगर पेशंट जवळून हाताळण्याची माझी पहिलीच वेळ होती. तरी परमेश्वर कृपेने त्यांचे ऑपरेशन वेळेवर पार पडले. त्यानंतर अनेक वर्ष त्या व्यवस्थित राहिल्या. अधून मधून सासू-सासरे यायचे. काही वर्षानंतर सासरे गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या तब्येतीकडे फारसे लक्ष दिले नाही. शुगर खूप झाली आणि पायाला जखम झाली. हे त्यांच्यावर खूप रागावले. काही दिवसानंतर त्या इकडे आल्या. दवाखान्यात ऍडमिट केले. बरेच दिवस उपचार चालू होते. परंतु शुगर जास्त झाल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. याचे त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांनी जरी बोलून दाखवले नाही तरी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे त्यांना कदाचित मान्य नव्हते. कदाचित आता त्यांना जगणे नकोसे वाटत होते त्या अवस्थेतच दवाखान्यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. मी आणि ह्यांनी नोकरी सांभाळून त्यांची सर्व सेवा केली. मी घरातून नाश्ता व दोन वेळचा स्वयंपाक करून देत होते. त्यांच्याजवळ दवाखान्यात माझ्या मोठ्या जाऊ बाई राहिल्या होत्या. सासुबाई आता खूप शांत आणि समाधानी होत्या. त्यांचे सर्व कुटुंब सुखा समाधानात होते. त्यामुळे त्या समाधानाने गेल्या. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत हे जाणवते. त्यांची नेहमीच आठवण येते आणि त्या आठवणींमध्ये त्यांच्याविषयीचा आदर नेहमीच वाढत राहतो.
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






अप्रतिम
वाचन करत असताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले इतकी ताकद आपल्या लेखणीत आहे. मराठी भाषेची सेवा आपल्या चौफेर लिखाणातून घडत आहे. अभिनंदन ताईसाहेब(जाऊबाई) आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
👌👌💐💐👍👍