श्री सुधीर करंदीकर
☆ “रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
उत्तम तब्येतीकरता भरपूर फिरा असे सगळेच तज्ञ सांगतात, आता घराच्या बाहेर पडलो, की छोटे – मोठे रस्ते क्रॉस करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे कुठलाही मोठा आणि खूप रहदारीचा रस्ता क्रॉस करायचा म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा रहातो. आणि याला कारण म्हणजे आपल्या इथली बेशिस्तितीत वावरणारी, आपणच तयार केलेली, आपलीच रहदारी.
रस्ता क्रॉस करतांना पण काही मज्जा येऊ शकते, यावर खरंतर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात, हे सांगणारा माझा अनुभव आता सांगणार आहे. तो ऐकून आपल्याला पण असा अनुभव एकदातरी यावाच, असे सगळ्यांना नक्कीच वाटेल…..
—–
नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलीकडे बावधनला गेलो होतो. दुपारी ऋता (बायको) स्कूटर घेऊन तिच्या क्लासला गेल्यामुळे संध्याकाळी मला बसने कर्वेनगरला घरी जायचे होते. म्हणजे घरापासून चालत मेनरोडपर्यंत जायचं, आणि तिथून बसनी गुजराथ कॉलनी पर्यंत जायचं, तिथून चालत मार्केट क्रॉस करायचं, ऑटो पकडायची आणि घरी पोहोचायचं. संध्याकाळी पाच वाजताच इथून निघालो. आज बर्याच दिवसांनी म्हशी बरोबर बावधनचा रस्ता क्रॉस करायला मिळणार, म्हणून मनातून खुश होतो. चालत चालत मेन रोड पर्यंत पोहोचलो. आणि नेमकी आज म्हशीनी सुट्टी घेतलेली दिसत होती. म्हणजे आज जीव मुठीत धरूनच रस्ता क्रॉस करावा लागणार होता. तेवढ्यात मला, गेल्या भेटीत गणेशने (म्हशीबरोबरच्या मुलानी) दिलेला सल्ला आठवला. आणि मी भूतकाळात गेलो….
गणेश : काका, कधी मी नसलो तर रस्ता एकट्याने क्रॉस करू नका. रस्ता क्रॉस करणारे बरेच जण असतात. जेव्हा कुणी क्रॉस करत असेल, तेव्हा त्याच्या बाजूनी चालत रस्ता क्रॉस करायचा. आणि बाजूनी चालणारी व्यक्ती ही तरुणीचं पाहिजे, हे लक्षात ठेवायचे.
मी : तरुणीच कां ?
गणेश : काका, इथला ट्रॅफिक किती बेशिस्त आहे / जीवघेणा आहे, हे तुम्हाला सांगायला नकोच. माझा इथला रोजचा अनुभव सांगतो – आपल्या इथले गाड्या चालवणारे, अजूनतरी, समोर तरुणी दिसली तर गाडी थोडी स्लो करतात. आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे.
मला गणेशचे हे म्हणणे पटले.
मी वर्तमानकाळात आलो.
झेब्रा क्रॉसिंग जवळ जाऊन उभा राहिलो. ट्रॅफिक नेहेमीप्रमाणेच सुसाट होता. कुणी तरुणी रास्ता क्रॉस करायला आली, की तिच्याबरोबर रस्ता क्रॉस करायचे असे मनात ठरवले. तेवढ्यात डावीकडून घाईघाईत येणारी एक तरुणी दिसली. माझ्या बाजूला येऊन ती थांबली. यालाच मी रस्ता क्रॉस करण्याचा ग्रीन सिग्नल समजलो. रहदारीत थोडी गॅप दिसली आणि आम्ही रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, ती माझ्या बाजूबाजूनी रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत होती आणि माझ्या स्पीड प्रमाणे पावले टाकत होती आणि मी तिच्या आडोशाने राहण्याचा प्रयत्न करत होतो. “मेड फॉर इच आदर” प्रमाणे एकमेकांकडे बघत बघत आम्ही व्यवस्थित पलीकडे पोहोचलो. मी मनात गणेशला आणि तरुणीला धन्यवाद दिले.
मी जाऊन बस स्टॉप च्या बाकावर बसची वाट बघत बसलो आणि थोड्याच वेळात माझी बस आली. माझ्याबरोबरची तरुणी पण याच बसमध्ये पुढच्या दारातून चढली असे मला वाटले. बसमधे बरीच गर्दी होती. माझा पौड रोडकडे जाण्याचा बसचा प्रवास सुरु झाला. आता किनारा हॉटेलला उतरायचे आणि रस्ता क्रॉस करून गुजराथ कॉलनीतून पुढे जायचे, असा माझा पुढचा प्रवास होता.
स्टॉप ला उतरलो. चालत थोडा मागे रस्ता क्रॉस करण्याच्या स्पॉट ला आलो. इथे मेट्रोचे काम सुरु होते, त्यामुळे ट्रॅफिक विस्कळीत होता आणि गाड्या पण स्पीडनी जात – येत होत्या. इथे रस्ता क्रॉस करायला म्हैस कधीच नसते. म्हणजे आता जीव मुठीत धरणे आणि रस्ता क्रॉस करणे, हे ओघाने आलेच. आणि एकदम लक्षात आले, अरे, गणेशचा सल्ला इथे पण अमलात आणायलाच पाहिजे. सुरक्षिततेला पर्याय नसतो. मनाला एकदम पटले.
आता इथे रस्ता क्रॉस करायला कोण तरुणी भेटतेय याची वाट बघत, आजूबाजूला बघत उभा होतो. इथे पण पब्लिक आपापल्या सवयीप्रमाणे धावत – पळत रस्ता क्रॉस करत होती. मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो, आणि तरुणीची वाट बघत होतो. काही वेळा आपल्याला आश्चर्याचा धक्का कसा बसतो, तो असा – बावधनला जी तरुणी माझ्याबरोबर रस्ता क्रॉस करायला होती, तीच घाईघाईने आली आणि माझ्या बाजूला उभी राहिली. रस्ता क्रॉस करायला ग्रीन सिग्नल मिळाला असे समजून, रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. मी त्या तरुणीला गाईड समजत होतो, आणि ती बहुदा मला गाईड समजत होती. कारण आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि चालण्याचा स्पीड ऍडजेस्ट करत होतो. पलीकडे आरामात पोहोचलो
पलीकडे पोहोचलो आणि —
बरोबरची तरुणी : काका, थँक्स
मी : कशाबद्दल ?
तरुणी : दोन्ही ठिकाणी रस्ता क्रॉस करायला मदत केल्याबद्दल.
मी (मनात): खरंतर हे वाक्य मी तिला म्हणायला पाहिजे.
मी तिला थँक्स म्हणणार एवढ्यात —
तरुणी : काका, गावात बसनी येण्याची आणि रस्ता क्रॉस करण्याची पाळी फारच कमी वेळा येते. मी राहते बावधनला. तिथे मात्र बऱ्याच वेळा रस्ता क्रॉस करावा लागतो. पण तिथे म्हैस घेऊन एक मुलगा उभा असतो. म्हशीच्या आडोशानी रस्ता क्रॉस करण्याचे टेन्शन नसते. आधी तिथे म्हैस नसायची, तेव्हा मात्र रस्ता क्रॉस करतांना भितीच वाटायची.
काका, इथल्या ट्रॅफिक मधे म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, यासारखं सुख नाही. तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा. मला ही कल्पनाच भन्नाट वाटते.
आज निघतांना आईनी बजावलं होतं, तुला पौडरोडला रस्ता क्रॉस करावा लागेल. तिथे म्हैस नसणार आहे. एकटीनी रस्ता क्रॉस करायचा नाही. एखादा तरुण दिसणारा सिनियर सिटीझन बघून त्याच्या बाजूबाजूने रस्ता क्रॉस करायचा. आपल्या इथले गाड्या चालवणारे, अजूनतरी, समोर तरुण सिनियर सिटीझन असेल, तर गाडी थोडी स्लो करतात. आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे. थोडा वेळ वाट बघावी लागली, तरी हरकत नाही.
बावधनला आज नेमकी म्हैस नव्हती. म्हणजे इथे पण आईची सूचना पाळायलाच पाहिजे. रस्ता क्रॉस करणारे तिथे दिसत होते, क्रॉस करणारे सिनियर सिटीझन पण दिसत होते, पण आईनी दिलेल्या स्पेसिफिकेशन मधे बसेल असे कुणीच रस्ता क्रॉस करायला येत नव्हते. म्हणून मी बाजूच्या झाडाखाली वाट बघत उभी होते. तुम्हाला येतांना बघितलं आणि क्लिक झालं, “यस, धिस इज ‘द’ पर्सन”. आणि मी लगेच पुढे आले.
आणि माझं लक असं, की इथे पौड रोडला पण मला तुमची साथ मिळाली. म्हणून डबल थँक्स.
मी : माय प्लेझर, तुम्हाला पण थँक्स
एकमेकांना बाय बाय झाले, पुन्हा भेटू झाले आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.
छान आणि जरा रोमँटिक सल्ला दिल्याबद्दल मी मनातून गणेशचे आभार मानले. तरुणीच्या आईचे पण मी मनातून आभार मानले, कारण मी ज्या स्पेसिफिकेशन्स मधे बसतो, अशी क्रॉस करणाऱ्या माणसाची स्पेसिफिकेशन्स, त्यांनी मुलीला दिल्याबद्दल.
दुसऱ्याचे ऐकल्यामुळे ‘रस्ता क्रॉस करणे’ अशा रुक्ष वाटणाऱ्या बाबतीत पण अशी मज्जा येऊ शकते, हा आजचा नवीन अनुभव.
आणि या अनुभवामुळे माझ्या ज्ञानात पडलेली महत्वाची भर म्हणजे, आपल्या हितचिंतकांचे नेहेमी ऐकावे, आपण स्वतःला कितीही हुशार समजत असलो तरीही.
हितचिंतक आपला नवरा असू शकतो, बायको असू शकते, नातेवाईक असू शकतात, ओळखीचे असू शकतात, अनोळखी पण असू शकतात.
आता म्हैस नसतांना बावधनचा रस्ता क्रॉस करण्याची संधि पुन्हा कधी मिळते, आणि ती पण ह्याच बावधानच्या तरुणी बरोबर, याच्या प्रतीक्षेत मी आहे ….
तुम्ही पण एकदा बावधन ला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचा सुखद अनुभव जरूर घ्या. आणि इतर ठिकाणी रस्ता क्रॉस करताना मात्र गणेशने सांगितलेल्या सूचना, आणि नवीन झालेल्या मैत्रिणीच्या आईने सांगितलेल्या सूचना, जरूर जरूर लक्षात ठेवा आणि फिरणे मस्त एन्जॉय करा….
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





