डॉ. माधुरी जोशी
मनमंजुषेतून
☆ त्या – –!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
“त्या”… त्यांनी कधी नोकरी केली नाही. “त्या “रोज कामाला बाहेर गेल्या नाहीत. “त्यांनी” पैसे मिळवले नाहीत. पण “त्या” गृहीत होत्या. जरा काही कमी पडलं, चुकलं तर आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या. जे जे हवंय ते ते व्हायलाच पाहिजे असा त्यांच्यासाठी कडक नियम होता. जणू कायदे होते घराचे… काही चुकलं तर टोमणे, कुजके बोल होते. “त्यांच्या” कामांना “सीमा” नव्हती पण खर्चाला “बंधनं” होती. पैसे कशाला? किती?कधी?अशा अनेक प्रश्नांना ” हिशेबाचं” उत्तर हवं होतं. सणवार, रितीभाती, देवकार्य, स्वच्छ नेटकं घर, येणाऱ्यांचं आगत स्वागत, नवे मेन्यू सगळं “हासतमुखानीच” व्हायची अट होती. नो नाराजी… नो तक्रार…
भूतकाळ एवढ्याचसाठी म्हणते..
कारण आता थोडं दृश्य बदललंय… बऱ्यापैकी “त्या” बाहेर पडतात… घरून काम करतात.. पण अजूनही बऱ्याच त्याच, तशाच जगण्यात रमल्या आहेत. अडकल्या आहेत.
अगदी रोज… रोज तेच तेच…
दाराशी तुंबलेले बूट मोजे चपला जागेवर ठेवणं, सोफा खुर्चीवरचे कपडे, त्यातली बिलं, पावत्या, पैसे पाहून मग धुवायला घेणं, ऑफिसबॅग्ज, ऑफिसमधून आलेले खरकटे डबे, पाण्याच्या बाटल्या हे सगळं जागेवर जाणं यांनी पहायचंच असतं आणि मग ऑफिस शाळेतल्या तक्रारी, दमणूक, त्रास, अडचणी ऐकून घ्यायच्या.. कंपलसरी… कारण “ती “बाहेर जात नाही… घरात तर असते…
किती काळ असंच चालू असतं… आता हे प्रमाण सगळ्या घरात, सगळ्या बायकांच्या वाट्याला नसेलही… पण बऱ्याच अंशी असंच आहे…
काही दिवसांपासून सतत घरात, घरांसाठी, घरातल्यांसाठी तरूण वयापासून साठी सत्तरी पर्यंत गुंतलेल्या अशा”त्या”मनात डोकावत होत्या. कुणी नात्यांच्या, कुणी ओळखीच्या, कुणी मैत्रीच्या, कुणी शेजारच्या… त्या अशिक्षित होत्या का?फारसं शिकल्या नव्हत्या का?… छे छे… अजिबात नाही असं… अनेक जणी ऊत्तम शिकलेल्या, नोकरीची संधी येऊनही सोडायला लागलेल्या, क्वचित काहींमध्ये आत्मविश्वास नसलेल्या, तर काहींना घरातूनच कमी लेखून घरानंच घरगुती शिक्का ठाम केलेल्या… घरकामातंच गृहीत धरलेल्या… त्या तशाच कायम राहिल्या, खपल्या, जगल्या.. आजही अशा भेटतातंच…
अशा गृहिणींनो, घर सांभाळणं किती तारेवरची कसरत आहे हे मी तुमच्या इतकंच जाणते. खरंतर मी ३१वर्ष नोकरी केली पण कुठलंही कर्तव्य जबाबदारी टाळली नाही. घर छान ठेवणं, चहापाणी, खाणीपिणी, डबेडुबे, येणार जाणार, धुणीभांडी, दुखणीबाणी,
सगळं सगळं… वाण्याच्या याद्या, सामान भरणं, उरलंसुरलं, मुलांचे अभ्यास, सोडणं आणणं, बिलं भरायला रांगेत उभं राहणं… अगदी घरातल्या तुमच्यासारखीच स ग ळी धावपळ… आणि रोज घड्याळाला बांधलेलं वेळाचं गणित… त्यातूनच सणवार, सवाष्णी, सत्यनारायण, गणपती दिवाळी सगळं पार पाडलंही… हे काही कौतुक म्हणून नाही सांगत. नोकरी हा माझा जगण्याचा भाग होता. मग निभावणं आलंच… पण नोकरी करणारी म्हणून कशातून सुटका नसते हे ही खरं… हो!!एक मात्र खरं नोकरीवालीचं कुठे काही कमी पडलं तर “नोकरीच्या”पांघरूणात ते क्षम्य होतं. खूप excuses असतात… पण जी घरात असते तिला हे माफ नाही.. ती 24×7 सतत available असते हेच गृहीत आहे. ती पण खूप धावंत असते. कष्टंत असते. ऊत्तम करते सगळं… पण हे गृहीतंच असतं कारण ती काम करत नाही ना बाहेर… खरंतर तिचा गौरव वाटायला हवा… तिला शाब्बासकी हवी.. दोन गोड शब्द हवे… या बाईमुळे घरात सगळं सुरळीत चालू आहे याची जाण, जाणीव हवी.. सगळ्यात महत्वाचं ती भावना व्यक्त व्हायला हवी… न कमावताही घरात आर्थिक घडीतला तिचा वाटा ती काटकसरीनं, पैसे न उधळता सार्थ करते. सुंदर साजरे होणारे सणवार, कार्यक्रम ती कसे मॅनेज करते यांचं कुणी कौतुक करतं?याही पलिकडे जाऊन तिची विश्रांती, तिचा क्वचित कंटाळा, तिनं वेळोवेळी मारलेलं मन, तिच्या आवडीनिवडी, तिला हवा असा तिचा स्वतःचा वेळ याही बाबतीत फारशी आस्था दिसतं नाही. आपलं नीट होतंय यातंच रमलेले सगळे.. सगळी घरं अशी नसतात. पण बरेचदा तिला वेगळं “मानायला” हवं याची फारशी गरजंच वाटंत नाही कुणाला… असंही खूप घरात असंच दृश्य…
ती करते.. करतंच राहते जीवापाड… खपून… पण ती पण दमते… थकते… कंटाळते… क्वचित कणकण असली तरी आधी काम करते मग आडवी होते… ते पण पुढच्या कामाचा गजर लावून… एखादे दिवशी ती खरंच काही न करण्यासारखी होते. सारं घर खडबडून जागं होतं. बापरे!!म्हणजे आता डबे, कपडे, इस्त्र्या, केरवारे, बाजार,
हांथरूणं पांघरुणं, रद्दी, उरलंसुरलं सगळं ठप्पंच की… काही घरं खरंच तिचं मोल जाणतात… सोयीनं वेळा जुळवतात, सांभाळतात… बूज राखतात. पण काही घरात तिनं आजारी पडणं हे संकट होतं.. त्रागा सुरू होतो… ती आजारी आणिकंच दबते, संकोच ते.. त्याही स्थितीत कुकर लावते, चहा करते, डबे भरते… कण्हत कुथंत… पण आत मनात खूप खोलवर दुखावते… आजवर जे करत राहिलो त्याची किंमत नाही याची भयाण जाणीव होते तिला. खंतावते ती… मन अशांत… अस्वस्थ.. ती व्याकूळ मायेच्या दोन शब्दांसाठी, डोक्यावरून पाठीवरून फिरणाऱ्या हातासाठी… तिला वस्तू नकोत, साडी दागिना नको.. तिला मायेचा काळजीचा शब्द हवाय फक्त… सारे श्रम विसरायला लावणारा प्रेमळ शब्द… तिचा गौरव!!
काय झालं… कालंच एक मैत्रीण गेली… अगदी दोन दिवस साधा ताप आला अन् गेलीच… आठवड्यापूर्वी भेटली तेव्हा म्हणाली होती, ” मी खूप करते सगळ्यांचं.. पण घरात कधी कौतुकाचा शब्द नाही… नवरा, मुलं कधीच.. कुणीच काही म्हणत नाही गं… कान आसुसतात गं, “घर छान ठेवतेस किती, आमच्या वस्तू तुझ्यामुळे जागेवर मिळतात, पदार्थ मस्त झालाय… असलं काही तरी ऐकायला “पण बिचारीला नाहीच मिळालं कधी असं काही… गेलीच जग सोडून… ती जेव्हा भेटे तेव्हा ही खंत येईच बाहेर… किती खरी, किती माफक, किती साधीशी अपेक्षा… पण ती तशीच गेली व्याकूळ, आसुसलेली… सगळी कर्तव्य पूर्ण करूनही यश अपूर्ण!!!मन ढवळून निघालं माझं… तिच्यासाठी, तिच्यासारख्या अनेकजणींसाठी… अशी खूप घरं आहेत… कुणाला काही वाटंत नाही असं नाहिये… पण वाटतं आणि व्यक्त होणं यात फार फरक आहे.. घर सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित… घरातली बाई तशीच झटते. आवाहनं लहान मोठी असली तरी मनाला ओढ त्याच शाब्बासकीची, कौतुकाची, गौरवाची… काळानुरूप हे घरात राहणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं असेलही… पण ज्या आजही याच चक्रात आहेत त्यांचा गौरव व्हायला हवा नाही का?
व्हाल ना व्यक्त? तिच्यासाठी?
आणि पहाच त्या चार दोन शब्दांची जादू… तिला गौरव मिळायलाच हवा!!
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





