सुश्री नीला महाबळ गोडबोले
☆ आईच्या बांगड्या… भाग-१ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
” बांगड्या “… स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग.. इतका की पुरुषाला..
” हातात बांगड्या भरल्यास का? ” असं ऐकावं लागावं…! !
बांगड्या घालण्यासाठी फक्त “स्त्रीजातीत जन्मणं “… एवढीच पात्रता..
बांगडीला वय, जात, धर्म, शिक्षण, देश, प्रांत, भाषा, आर्थिक स्थिती, नव-याचं असणं-नसणं.. कशाचाच अडसर नाही. फक्त “गोलाकार” एवढीच व्याख्या..
(खरंतर आता तीही नाही.. चौकोनी, पंचकोनी, षट्कोनी, चांदणी अशा कितीतरी विविध आकारात हल्ली बांगड्या मिळतात..)
बाकी बांगडीला रंगाचं किंवा मटेरियलचं बंधन नाही…
प्लास्टिक, चिकणमाती, लाखे पासून ते थेट लोखंड, स्टील, पितळ, चांदी, सोन्यातल्या… अगदी हिऱ्या माणकांच्या, पाचुंच्याही … एखाद्या राणी किंवा राजकन्यकेच्या हातातल्या… स्वप्नवत्…
काही साध्या… प्लेन.. तर काहींवर मणी, काचा, आरश्यांची सजावट…
असं असलं तरी काचेच्या बांगड्यांची नजाकत वेगळीच…
नाजुकशा किणकिणीनं मंत्रमुग्ध करणारी … सजणाला आवतण देणारी..
काचेच्या हिरव्या बांगड्या… सौभाग्यालंकाराच्या मानकरी..
काही नशीबवान काचेच्या बांगड्यांना झळाळत्या सोन्याच्या पाटल्या, बिल्वर, तोड्यांची सोबत…
तर काही कष्टणाऱ्या मनगटांत मात्र एकाकी खुळखुळणाऱ्या… कर्तृत्ववान … कामाच्या रगाड्यातही स्वत:चं अस्तित्त्वं जपण्याची कसरत करणा-या..! !
” बांगडी ” हे नाव कसं नि कुठं जन्माला आलं? … मला अजूनही उत्तर न सापडलेला प्रश्न..
हिंदीतली ” चुडी ” नि मराठीतली ” बांगडी “..
शेवटचं ” डी ” सोडलं बाकी साधर्म्य कोणतचं नसलेली..
तशीच इंग्रजीतली ” बॅंगल “…
बांगडीतला ” ब ” घेऊन आलेली.
संस्कृतातील “कंकण ” ला मात्रं आमच्या कामवाल्या शेवी नि शिर्मिनं जपलेलं..
… ” वहिनी, हे बगा, काकणं भरूनशान आलो.. ” दोन दोन डझन बांगड्यांनी सजलेली मनगटं माझ्या आईला दाखवत शेवी नि शिर्मी तोंडभरून हसायच्या…
माझी आई… अगदी टिपिकल पन्नास वर्षांपूर्वीची स्त्री..
.. ” आई ” डोळ्यांसमोर आली की तिच्या गळ्यातलं लांबसर मंगळसूत्रं.. नि बांगड्यांनी सजलेले तिचे हात डोळ्यासमोर येतातच..
सोन्याच्या जडशा पाटल्या.. त्यापुढे दोन-तीन काचेच्या बांगड्या … मग सोन्याचा शंकरपाळीच्या नक्षीचा जाडसर बिल्वर… पुन्हा काचेच्या बांगड्या.. पुन्हा सोन्याचा बिल्वर.. त्यापुढे काचेच्या बांगड्या…
तिच्या गोऱ्यापान हातांत हा चुडा फार सुरेख दिसायचा… लग्नाकार्याला जाताना ती या चुड्यापुढे सोन्याचे तोडे घालायची तेंव्हा एखाद्या लक्ष्मीसारखी दिसायची..
.. ” आई, या एवढ्या बांगड्या घालून तुला काम कसं करता येतं गं? .. ”.. मी लहान असताना आईला विचारायची..
.. ” बाळा, या बांगड्या आदब शिकवतात. काम करताना शांतपणे, आदबशीर करायचं. धसमुसळेपणानं नाही.. काम करताना बांगडीचा आवाजही येता कामा नये.
संसार असाच करायचा असतो.. साऱ्या जबाबदाऱ्या पेलत… आपल्या माणसांना बांगड्यांसारखं एकत्र जपत … न फुटू देता… आणि बांगडीला बांगडी लागली तरी आवाज न होऊ देता… पाहणाऱ्याला फक्त बांगड्यांची शोभा दिसावी … हे गृहिणीचं कौशल्य असतं… “
त्या पोरवयात यातलं काहीच कळलं नाही..
नि
.. मोठं झाल्यावर हे तत्त्वज्ञान काही झेपलं नाही.
– – माझी आईसोबतची आठवण सुरू होते तीच आईच्या बांगड्यांनी..
माझा अगदी लहानपणचा म्हणजे चार पाच महिन्यांची असतानाचा फोटो … नुकती पालथी पडायला लागलेली मी… चिमुकल्या दोन्ही हातांच्या बोटात आईची सोन्याची बांगडी.. तोंडात घातलेली… फोटो काढताना रडायला लागले म्हणून हातात दिलेली… त्या परिचित आईच्या बांगडीनं माझं रडणं थांबलेलं..
कदाचित बांगडीलाच आई समजून…! !
मी चार-पाच वर्षांची असेन..
आई मला घेऊन संध्याकाळी भाजी आणायला जाई.. जाताना मी आईचं बोट धरलेलं असायचं..
परतताना मात्र आईच्या हातात भाजीच्या पिशव्या असायच्या.. मग मी आईच्या बांगड्यांना धरून चालायची..
… त्या बांगड्या मला आधार द्यायच्या..
… झोपताना आईच्या माझ्या डोक्यावरून फिरणा-या हाताबरोबर त्या बांगड्यांचा होणारा मायेचा स्पर्श… कधी कोणी अपमान केला, अपयश आलं तर आईच्या कुशीत शिरून रडताना आईचा पाठीवरून फिरणारा हात.. नि त्याबरोबर बांगड्यांचाही आश्वासक स्पर्श..
.. आईनं केलेल्या पांढऱ्याशुभ्र भाकरीवर नाहीतर पिवळ्या धम्म थालीपीठावर उमटलेली आईच्या सोन्याच्या बिल्वराची चौकोनी नक्षी..
.. नि तिच्याकडे पाहून आम्हा भावंडांचं मनमुराद हसणं … नि आईचा पाठीवर पडलेला धपाटा..
… बांगडीसारखाच तो सोन्याचा क्षण..
” माझी काचेची बांगडी फुटलीय.. बघून चाला.. “
… फुटलेल्या बांगडीनं आईच्या मनगटावरून वाहणारं रक्त.. आम्हा पोरांच्या काळजात जखम करणारं…
पण त्या माऊलीला स्वत:च्या जखमेपेक्षा आमच्या पायांची काळजी..
ती फुटकी बांगडी माय-लेकरांच्या चिरंतन प्रेमाला, मायेला ओसंडवून वाहवणारी…
नागपंचमीला आम्हा बहिणींना बांगड्या भरायला घेऊन जाणारी आई… आमच्या मिरजेतल्या ओगलेंच्या दुकानात..
.. त्या दुकानातल्या अनंत रंगीबेरंगी बांगड्या, कानातली-गळ्यातली, टिकल्या, नेलपॉलिश.. असा मायाबाजार बघून आम्ही बहिणी खुळावून जात असू.. अख्खं दुकान घरी घेऊन जावसं वाटायचं … आमच्या हातात प्लॅस्टिकच्या चमचमत्या जाड बांगड्या चढवल्या जायच्या.
मग आई बसायची बांगड्या भरायला… ओगले काका नाहीतर काकू आईच्या हातातल्या जुन्या बांगड्या एका लोखडाच्या दांडीने मारून फोडायचे. तेव्हा आम्ही दोघी बहिणी डोळे घट्ट मिटून घ्यायचो.. आईला बांगडी लागणार नाही नं? या भीतीनं..
” बांगड्या घट्ट बसणा-या पाहिजेत ” या आईच्या आग्रहास्तव आईचा हात दाबत दाबत बांगड्या भरल्या जायच्या… पुढे कधी त्या काढायची वेळ आली तर साबण लावून काढतानाची कसरत आजही डोळ्यापुढे येते.
ओगले काकांच्या दुकानाची फरशी बांगड्यांच्या तुकड्यांनी भरून गेलेली असायची… त्या तुकड्यातही आमचा जीव गुंतलेला असायचा. काकांच्या परवानगीनं ते तुकडे आम्ही गोळा करून खिशातून घरी आणायचो… मोठा खजिना गवसलेला असायचा. काचेचे ते तुकडे गॅसवर धरून एकमेकांना चिकटवून त्यांचा हार बनवणं, कागदावर चिकटवून नक्षी बनवणं, शोभादर्शकात हे तुकडे घालून त्याची बनलेली नक्षी पाहून आश्चर्यानं थक्क होणं… असे असंख्य प्रकार पुढचे कितीतरी दिवस चालायचे.
नागपंचमीची लालचुटुक मेंदी, नखांचं सुंदरसं नेलपॉलिश आणि मनगटातल्या बांगड्या या त्रयींना सजलेला स्वत:चाच गोरा-गोरा गोंडस हात निरखत बसून खूश होण्यात महिनाभर तरी जायचा..
… नंतर मात्र लिहिताना त्या बांगड्या टोचायला लागायच्या. त्यामुळे त्या शाळेतच काढून दप्तरात ठेवल्या जायच्या … भूमितीतील किंवा चित्रकलेतील वर्तुळे, कंटाळवाण्या तासाला बांगडीत पेन ठेवून फिरवत फिरवत वहीच्या मागच्या पानावर काढलेली नक्षी… काचापाणीचा खेळ… यासाठी त्या बांगडीचा उपयोग व्हायचा..
आमच्या काकूचं माहेर पंढरपुरचं.
ती माहेरी गेली की तिच्या परतीची मी वाट पहात बसायचे..
ती येताना सुरेखशा पंढरपुरी बांगड्या माझ्यासाठी आणायची..
आमची कन्या शाळा..
सहावीत आमच्या एका कडक बाईंनी कुंकु नि बांगड्या कंपलसरी केलेल्या… त्यांच्या तासापुरत्या दप्तरातल्या बांगड्या घालणं … स्वत:कडे नसतील तर मैत्रिणीकडून उसन्या घेणं नि त्या वर्गाबाहेर पडल्याक्षणी बांगड्या काढून दप्तरात ठेवणं.. हा आमचा रोजचा उद्योग..
– – अशा या खट्याळ बांगड्या…
” वहिनीच्या बांगड्या ” चित्रपटाने मात्रं रड रड रडवलं..
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




