सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ आईच्या बांगड्या… भाग-२ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(– – अशा या खट्याळ बांगड्या… ” वहिनीच्या बांगड्या ” चित्रपटाने मात्रं रड रड रडवलं..) इथून पुढे – – 

बायका घराबाहेर पडू लागल्या नि मनगटी घड्याळं वापरू लागल्या तसा बांगड्यांचा रुबाब कमी झाला..

हातभर बांगड्या पाहण्याची सवय असणाऱ्या डोळ्यांना आता एका हातात घड्याळ नि दुसऱ्या हातात एखादी बांगडी दिसू लागली… त्यातही हातभर बांगड्यांसमोर मनगटी घड्याळ घालणाऱ्या महिला होत्याच..

मी नववीत होते.

माझ्या ताईचं लग्न चार-पाच दिवसांवर आलेलं..

“उद्या बांगड्या भरूया.. “.. आई नि दोन्ही काकवांचं बोलणं झालं..

…. तेव्हा बांगड्या भरणं हा विधी असायचा…. इव्हेंट नव्हे…

.. बांगड्या भरणं म्हणजे फक्त बांगड्या भरणं..

कासारणीला आदले दिवशी सांगून ठेवलेलं असायचं. कासारीण ठरलेल्या वेळी बांगड्यांनी भरलेल्या मोठाल्या पिशव्या घेऊन नवऱ्याच्या सायकलवरून यायची… आल्याबरोबर बांगड्यांचा मांड मांडायची.

तिच्यासमोर एक पाट ठेवला जायचा… शेजारी एखादी हुशार चुणचुणीत मुलगी बसायची.. कागद पेन घेऊन.. हिशेबनीस म्हणून… बांगड्या भरलेल्या महिलांची नावं नि त्यापुढे बांगड्यांची संख्या ती लिहायची.

… पहिला मान नवरीचा.. नाहीतर वरमायेचा.. मग करवल्या..

” जा गं मीने.. शेजारच्या विमलाबाई, सुनिताबाई, जोशीणबाई, दामलेकाकू, शेगुणशीबाई, .. सगळ्यांना बोलावून आण.. आणि हो मंजी, सवी, गंगी, कांची.. सगळ्यांना बोलाव बरं का.. आणि शेवी, शिर्मी, नर्मदा, लक्ष्मी यांना विसरू नकोस. “.. काकूचं फर्मान..

एकेक बाई यायची. पाटावर बसायची..

” वर्खाच्या का रेशमी? ” कासारणीचा प्रश्न..

” साध्याच भरा. तीन.. तीन.. ” शेजारणीला यजमानीणीच्या खर्चाची काळजी..

” त्यांचं ऐकू नका हो.. छान वर्खाच्या डझनभर बांगड्या भरा.. यजमानीणीची ऑर्डर..

… हिरव्याकंच बांगड्यांचा चुडा भरून बाई पाटावरून उठायची. कासारणीला वाकून नमस्कार करायची.

तिला हळदीकुंकु लावलं जायचं नि चमचाभर साखर दिली जायची. ती तोंडात टाकून बाई आपापल्या घरी परत जायची.

एवढाच कार्यक्रम.. साखरेवर भागणारा… आजच्यासारखी खाणीपिणी, गाणी.. इल्ला..

बांगड्यांचाच खर्च कसाबसा निभावणारा… खाण्यापिण्याला कुठून पैसे आणायचे?

माझ्या ताईलाही चुडा भरला…. आधीचीच सुंदर ताई त्या पाटल्या-बांगड्या नि हिरव्या चुड्यात दृष्ट लागण्यासारखी दिसत होती..

“आता लग्नाच्या दिवसापर्यंत घराबाहेर पडायचं नाही हं.. लग्नादिवशीच माहेरघरातून बाहेर पडायचं नि लग्न करून सासरघरी प्रवेश करायचा.. “.. आत्या बोलली तशी ताईचे डोळे पाण्याने भरले.. त्याचबरोबर आई, दोन्ही काकू, आक्का नि मी… डोळ्यातलं पाणी आवरेचना..

.. त्या चुड्यानं तिला सासरची करून टाकलं! !

मी बारावी पास झाले..

” चला आपल्याला बाहेर जायचंय.. ” 

कुठे, कशासाठी.. कळायच्या आत आमची वरात शिखरे सराफांच्या दुकात पोहोचलीही..

” सोन्याच्या बांगड्या दाखवा हिच्या मापाच्या.. “.. आई-बाबांचा खूप राग आला. डोळे भरून आले.

मुलगी दहावी पास झाली की घड्याळ आणि बारावी पास झाली की सोन्याच्या बांगड्या…

.. ही बारावीची खरेदी म्हणजे लेकीच्या लग्नाची नांदी असे..

” हळुहळु लग्नाच्या तयारीला लागायचं. ऐनवेळी सगळा खर्च अंगावर येतो.. “

संसारात मुरलेल्या आयांचं आर्थिक व्यवस्थापन फार हुशारीचं…! !

एके दिवशी मीही हिरव्या चुड्यानं सासरी गेले. संसारात रमले.

कधीतरी हैदराबादला जाणं झालं. चारमिनारजवळच्या चुडीबाजारानं अक्षरश: वेड लावले..

सासर-माहेरच्या सगळ्यांसाठी प्रचंड बागड्या खरेदी केल्या.

यथावकाश लेकीचा जन्म झाला.

…. चार-पाच महिन्याचं माझं बाळ रडायला लागलं की माझी आई तिला पायावर घेऊन डोलवायची.

तिची चिमुकली नात एका हातानं तिच्या बांगड्या धरून ठेवायची नि खिदळत जोरजोरानं डोलायची..

” तूही लहानपणी असंच करायचीस.. माझ्या बांगड्यांना घट्ट धरून ठेवायचीस.. पडू नये म्हणून.. ” आईला आठवण यायची..

…. माय-लेकीचा तो सोहळा.. आईच्या त्याच सोन्याच्या बांगड्यांनी पाहिलेला…! !

लेकीसाठी आणलेल्या भरपूर बांगड्या.. निरनिराळ्या रंगांच्या.. वेगवेगळ्या प्रकारच्या…

वर्षभराच्या लेकीनं एकदा अख्खी बांगडी तोंडात घालून घशात अडकवून घेतलेला प्रसंग.. तोंडचं पाणी पळवणारा..

आजही तिच्या कपाटात तिच्या सा-या बांगड्या मोठ्या खोक्यात जपून ठेवलेल्या… बांगड्यांच्या रूपात जपलेलं तिचं बालपणं..

.. आणि त्या आठवणी साठवून ठेवण्याचा माझा अट्टाहास..

वाढत्या लेकीला घेऊन प्रत्येक सुट्टीत माहेरी जाणं व्हायचंच्..

” हे बघ तुझ्या आप्पाने हे सोन्याचे गोट केलेत मला.. ” हातातले नवेकोरे जाडजूड सोन्याचे गोट दाखवत आई बोलली तेंव्हा तिचे डोळे चमकत होते..

… खरंतर सोन्यानाण्याने खूश होणाऱ्यातली ती आजिबातच नव्हती.. लगेचच लक्षात आलं..

हे गोट हा तिच्यासाठी फक्त दागिना नव्हता तर तिनं जन्म दिलेल्या, लहानाचं मोठं केलेल्या तिच्या लेकाच्या यशाचं, कर्तृत्त्वाचं नि आईबद्दलच्या प्रेमाचं, कृतज्ञतेचं ते प्रतीक होतं..

तो तिचा अभिमान होता..

” आई, आजीचे हात बघ किती छान मऊ लागतायत.. ” लेक म्हणाली तसं लक्ष आईच्या हाताकडं गेलं..

सुरकुतलेल्या त्या हातांनी काळजाचा ठोका चुकवला..

हातात फक्त सोन्याचे बिल्वर, पाटल्या नि गोट..

” आई. काचेच्या बांगड्या कुठायत? “

” हल्ली जड होतात गं.. “

पुढच्या वेळेला पाटल्या हातात नसलेल्या… सैल होतात.. हातातून ओघळतात म्हणून..

… पोटात पिळ पडला.. आई कमी कमी होत चाललेली…

” आई पडली.. हात फ्रॅक्चर झालाय.. ऑपरेशन करायचंय.. ” भावाचा फोन..

.. त्या ऑपरेशनने तिच्या सोन्याच्या बांगड्या.. बिल्वरही काढायला लावलेले..

तिनं बाकीचे दागिने वेळोवेळी नवीन करून घेतलेले..

.. पण लग्नातले ते बिल्वर.. शेवटपर्यंत तेच… कधीच न बदललेले.. कधीच हातावेगळे न केलेले..

ऑपरेशनने मात्र दोघांची फाटाफूट केलेली..

कधी न पाहिलेले तिचे ते भुंडे हात..

जीव गलबलून सोडणारे..

महिन्याभरात आई आम्हाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली…! !

दोन -तीन महिन्यांनी भाऊ नि वहिनी माझ्याकडे आले.. आईने माझ्यासाठी ठेवलेले तिचे दागिने घेऊन..

जाण्यापूर्वीच तिने तिच्या दागिन्यांचं वाटप तिच्या सुना-मुलींत कसं करायचं ते बाबांना लिहून दिलेलं…

एका रूमालात बांधलेला तो डबा देता-घेताना आम्हा भाऊ-बहिणींना अश्रू आवरता आले नाहीत..

डबा उघडला..

इतर दागिन्यांसोबत आईच्या त्या चार “सोन्याच्या बांगड्या”.. शंकरपाळीच्या डिजाईनच्या..

भाकरीवर शंकरपाळीचं डिजाईन काढणा-या..

झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवणा-या..

डोलताना मला नि माझ्या लेकीला आधार देणा-या…

अन् लहानपणीच्या फोटोसारख्या…

आई सोबत नसतानाही आईची माया देऊन बाळाचं रडणं थांबवणा-या…

मी त्या हातात घातल्या..

.. माझे हात आईचे झाले…! !

इतर दागिने मी बॅंकेच्या लॉकरमधे ठेवते. पण या बांगड्या घरात..

सुख-दु:खाच्या क्षणी त्या हातात घेतल्या की आई भेटल्याचा भास होतो..

डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरतो..

मी आश्वस्त होते..

परवा लक्ष्मीपूजनाला आईच्या बांगड्या काढल्या..

” आई, लग्नात मला या बांगड्या देशील? ” 

लेकीचा मनापासून प्रश्न..

” अगं पण या किती जुन्या पद्धतीच्या आहेत… तुला नवीन करू आधुनिक प्रकारच्या.. “

” नको.. मला याच दे.. सोन्याच्या दुस-या बांगड्या कुठेही मिळतील.. पण असं शुद्ध सोनं, बावनकशी माया नि आजीचे आशीर्वाद त्यात नसतील.. “

… मला त्या बांगड्यात आईचा प्रसन्न चेहरा नि बांगड्यांनी सजलेले तिचे आशीर्वादाचे हात दिसले…! !

संस्कारांची, विचारांची, भक्कम आधाराची नि मुख्य म्हणजे अस्सल मायेची ही गंगा

” आईच्या बांगड्यां ” मार्फत पिढ्यानुपिढ्या वाहती राहण्याची मला ग्वाही मिळाली..

एका आईला अजून काय हवं असतं? ….

समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted