श्री विश्वास दाते

? मनमंजुषेतून ?

☆ पहिला सलाम – – ☆ श्री विश्वास दाते ☆

“बरं आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार! ” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. पोलीसच काय, कुठल्याही सरकारी ऑफिस मध्ये जाण्याचा प्रसंग आला तरी माझ्या छातीत धडधड वाढते. आणि हे पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.

मी, माझी बायको, मुलगी आणि आमचा चालक असे चार जण आमच्या गाडीने काही कार्यक्रमासाठी पुण्याहून ठाण्याला चाललो होतो. ऐरोलीपर्यन्तचा प्रवास गप्पा मारत मारत अगदी मजेत झाला आणि अचानक एका हवालदाराने आम्हाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. वेळ भर उन्हाची होती. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केल्यावर, हवालदाराने गाडीच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. मी रीतसरपणे सर्व कागदपत्रांचा गठ्ठा त्याच्याकडे सुपूर्द केला. चिंता करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते.

अचानक त्या हवालदाराचा चेहरा उजळला आणि माझ्या पोटात धस्स झाले. त्याने माझ्या कारच्या चालकाचे लायसेन्स मागून घेतले आणि खिशात ठेवले. “ साहेब, हे काय, PUC ची मुदत संपली आहे. ” मला तर अगदी आत्ता आत्ता PUC केल्यासारखे वाटत होते. काही वेळा दिवस कसे चटकन सरतात याचा अनुभव आला कारण PUC ची मुदत खरोखरच चार दिवसांपूर्वी संपली होती. मी जरा ओशाळे हसत विनती केली, “ जाउदे ना साहेब, चुकून विसरलो आहे. आत्तापर्यंत असे कधी झाले नाही. आज जरा ठाण्याला पोहोचायची घाई आहे. पुढे लगेच PUC करून घेतो. ”

त्याचे निर्विकार उत्तर आले, “PUC न करणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला ८०० रु दंड पडेल. ” चूक माझी होती. मी ८०० रु काढून त्याला विनंती केली की ही दंडाची रक्कम घ्या, त्याची पावती आणि चालकाचे लायसेन्स परत द्या म्हणजे आम्ही पुढे जायला मोकळे होऊ”

त्यापेक्षा साहेंब असे कराना. मला ५०० रु तसेच द्या आणि निघा. हा प्रकार मला जराही मान्य नसल्याने, मी त्याला पुन्हा विनन्ती केली की चूक माझी आहे. तरी योग्य तो दंड घेउन मला कृपया पावती द्या आणि मोकळे करा.

“ साहेब, पावती पुस्तक इथे नाही आहे. ८०० रु कमविण्यासाठी तुम्हालापण खूप कष्ट करावे लागतात. त्यापेक्षा निदान ४०० रु देऊन मिटवा आणि जा. तुम्हाला घाई पण आहे ” मागे नजर टाकत त्याने मला सुनावले. आमच्या गाडीतील महिला समाज तिरक्या कटाक्षातून लवकर निघण्याची अपेक्षा करत होता आणि चालक गोंधळून हा सर्व प्रकार बघत होता.

माझ्या प्रथमच लक्षात आले की मागच्या बाजूस साधारण १५-२० मीटर अंतरावर झाडाच्या सावलीत, एका बुलेट गाडीवर गुढगा टेकून रेबान काळा चष्मा लावून एक इन्स्पेक्टर टेचात उभा आहे. मी त्याच्यापर्यंत चालत जावून पुन्हा एकदा पैसे घेवून पावती देण्याची विनंती केली. त्याला हे ही सांगितले की मी लाच दिल्यास मला शांत झोप लागणार नाही.

काळ्या काचेतून गालात हसत हसत त्याने मला सांगितले की ऐरोली पोलीस चौकी मध्ये पावती पुस्तक आहे. तेथे जावून पैसे भरा आणि मग लायसेन्स परत मिळेल. थोडक्यात काय माझी सत्व परीक्षा घेत होते.

आम्ही होतो तेथून ऐरोली पोलीस चौकी अंदाजे ५ किलोमीटर अंतरावर असल्याने आणखी अर्धा तास वाया जाणार हे नक्की होते तरी पण नाईलाजाने आमची वरात ऐरोली पोलीस चौकीवर पोहोचली. तेथे एक पोलीस नुसत्या बनिअनवर पंख्याखाली दात कोरत बसला होता. मी त्याला कशाकरता आलो आहे ते सांगितले आणि ८०० रु पुढे केले. तो माझ्याकडे कुठलातरी विचित्र प्राणी बघितल्यासारखा बधत राहिला. पुन्हा तोच सल्ला. “साहेब, ४०० रुपयात मिटवून टाकाना. ” पुन्हा एकदा मी माझा प्रोब्लेम त्याला सांगितला.

अजून थोडावेळ अळमटळम केल्यावर आणि मी बधत नाही हे लक्षात आल्यावर, अचानक त्याचे हावभाव बदलले. अत्यंत नम्र आवाजात मला म्हणाला, “साहेब, कस सांगू पण तुम्हाला दंड करणे माझ्या जीवावर आले आहे. पण गुन्हा झाला आहे म्हणून मी १०० रु ची पावती करतो. अहो रोज दिवसभर आमचा संबंध फक्त लाच देवून स्वस्तात व्यवहार मिटवणाऱ्याशी येतो. तुमच्यासारखे फार विरळ. आज रात्री घरी सांगायला एक चांगला अनुभव मिळाला. ” त्याने मग साहेबांना फोन करून काय झालेय ते सांगितले आणि मला सोडायला गाडी पर्यंत आला.

पुन्हा आमची वारी हायवे वर आली. मी घाबरत घाबरत इन्स्पेक्टरला दाखवली. पण आता नूर एकदम बदलला होता. काळा चष्मा खिशाला लावून दिलखुलास पणे हसत त्याने मला आमच्या चालकाचा लायसेन्स परत दिला. मला म्हणाला, “भेटून फार आनंद झाला. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी. बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार! ”

मी ‘जाऊद्या हो’ असे काहीतरी मोघम बोलत निघालो तेंव्हा त्याने चक्क मला खाडकन सलाम केला. यानंतरही बऱ्याच वेळा पोलिसांच्या चांगुलपणाचे अनुभव आले पण हा सलाम पहिलावहिला असल्याने, त्याचीच ही गोष्ट.

माझा चालक आदराने तर आमचा महिला समाज कौतुकाने माझ्याकडे बघत होता आणि मी लोकांच्या हृदयातील लपलेल्या झऱ्याच्या ओघात चिंब झालो होतो.

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted