श्री दिवाकर बुरसे

??

☆ छंद माझा वेगळा!!… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

काव्य, संगीत, चित्र, साहित्य, पर्यटन इ. विषय सोडून आज काही व्यवहाराचे बोलावे असे वाटले म्हणून नम्रपणे केलेले हे कथन.

माझ्या अनेक मैत्रणींनीही आणि विशेषतः माहितीच्या महिलांनीही, मी माझ्या या वेगळ्या छंदाबद्दल कुठेतरी बोलावे, लिहावे असे अनेक वेळा आग्रहाने सांगितले. मी त्या सूचनेकडे हसून दुर्लक्ष करीत आलो आहे आजपर्यंत.

काल काय झालं, सुलूनं सहज कुशलमंगल विचारण्यासाठी मला फोन केला. सुलू ही माझी बालमैत्रीण. बासष्ट सालापासूनची आमची मैत्री. तर फोन आला त्यावेळी मी मिक्सरवर डोश्याचं पीठ दळत होतो. तिनं विचारलं, “काय चाललंय सध्या? काही नवीन उपद्व्याप? म्हणजे लेखन, चित्रं, कविता, नाटक, भटकंती असं काही तरी? तू काय नुसता गप्प बसणारा आहेस का? ” त्यावर मी म्हणालो, ” नाही गं, काही नाही. पूर्ण निवृती भोगतोय! हां, पण आत्ता या क्षणी मात्र ऋद्धीसाठी डोसा करायची पूर्वतयारी करतोय. ” त्यावर ती म्हणाली, ” अरे, तू घरकामं करतोस हे मी कैक वर्षे पहात आल्येय. त्यावर काही लिहावंस असं मी कितीदा सुचवलंय. तू लिही ना काही तरी. कळू तरी दे इतरांना. त्यातून कुणाच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर बरंच होईल. निदान एखादी गृहिणी तरी सुखावेल त्यानं. ” त्यावर मी हसंत म्हणालो, ” कुणा नवरा-बायकोत भांडणं होण्याचीच शक्यता अधिक. तरी बघतो”. इतरही गप्पा झाल्या आणि मी फोन ठेऊन पुढच्या कामाला लागलो. पण डोक्यात तिची सूचना घोळत राहिली दिवसभर.

तिच्या सूचनेला दिलेला प्रतिसाद म्हणून आज लिहितोय. माझा हा छोटासा लेख समस्त गृहिणींना अर्पण करतोय. (बाप्यांनी सहानुभूतीने विचार करावा… माझा!)

मी निवृत्त होऊन पंधरा वर्षे लोटली. ही सेवानिवृत्ती मी कशी साजरी करत असेन?

निवृत्तीच्या दिवशीच मी पत्नीला सांगितलं की, “उद्यापासून मी किचन सांभाळीन. दोन्ही वेळचा स्वयंपाक मी करत जाईन. चाळीस वर्षं तू जे करत आलीस त्यातून तुलाही निवृत्ती नको का मिळायला? “

दुसऱ्या दिवशी मॕडम उठल्या तोच समोर चहाचा कप हजर होता. ती संकोचली असेल. भाज्या निवडून, धुऊन तयार. तांदूळ, डाळ, भिजत पडलेली. थोड्याच वेळात कुकर गॕसवर चढला. कणीक तिंबून ‘रेस्ट’ करत्येय हे पाहून पत्नी कमालीची अस्वस्थ, अवघडलेली. संकोचून अखेर तीच म्हणाली, ” पोळ्या तेवढ्या मी करीन हो. “

आज वीस वर्षे होत आली. स्वयंपाक बहुतेक वेळा मी करतोय. नातीच्या आवडीचे खाऊ, दक्षिणी पदार्थ, पंजाबी भाज्या, काही काॕन्टिनेन्टल पदार्थ, पुलाव व भाताचे विविध प्रकार यथामती करतो. त्यात प्रयोगशीलता असते. नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो. या छंदात माझा वेळ मजेत जातो आहे. असलेल्या अल्पशा प्रतिभेला विधायक वाट मिळते. पोळ्या मात्र पत्नीच करते. (कदाचित माझ्या पोळ्याबाबत, त्याच्या गुणवत्तेबाबत तिला संशय असावा.)

वर्षाची उन्हाळी कामं, हळद, तिखट, मसाले, लोणची, मुरंबे करतो. निदान हे करायला पत्नीला मदत करतोच करतो.

लेकीचे पहिले (आणि नवीन प्रथेप्रमाणे अखेरचे, – हम दो, हमारा एक! ) बाळंतपण माहेरी झाले. बाळ-बाळंतीण घरी आल्या दिवसापासून ते आपल्या घरी जाईपर्यंतची सर्व कामं मी केली आहेत. डिंक लाडू, अळीव लाडू, शेपा लाडू, सुगंधी सुपारी, बाळ घुटीचा डबा, इ. इ. सर्व काही स्वहस्ते केलं. त्याची तयारी म्हणून अनुभवी जेष्ठ महिला, मावश्या, आत्या, काक्या, बहिणी यांच्याकडून माहिती घेतली. त्यांच्या नोंदी केल्या. त्याप्रमाणे सगळं केलं.

रोजच्या जेवणानंतरची साफसफाई, उरलेले अन्नपदार्थ काढून ठेवणं, स्वयंपाकाचा ओटा व गॕस धुणं ही सहसा बिनडोकपणाची समजली जाणारी कामं हौसेनं, उत्साहानं, प्रेमानं व कल्पकतेनं अगदी न कंटाळता करतो हे सांगताना मला यत्किंचितही संकोच वाटत नाही, उलट अभिमान वाटतो! उरलेला पदार्थ ठेवण्यासाठी योग्य आकाराचं आणि मापाचं पात्र निवडणं हे या कामातलं कौशल्य आहे. उत्तम स्वयंपाक आणि नंतरची आवराआवर करण्यासाठी उत्तम बुद्धिमत्ता आणि कल्पकता लागते असं स्वानुभवातून मी ठामपणे सांगू शकतो.

सण-वार, श्राद्ध-पक्ष, भिश्या-संम्मेलनं काहिही असो, मला प्रसंग निभावून नेता येतात. अर्थात मला पत्नी बरोबरीनं साथ देते, माझ्या हाताखाली कामही करते हे आवर्जून सांगायलाच हवं.

इथंच हे ही सांगतो, मित्र कौतुकानं म्हणतात, “आयला, तुला सैपाक करता येतो? आम्हाला साधा चहाही नाही जमत. ” पण हे सांगताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. आपल्याला येत नाही याची लाज वाटत नाही! पुरुष प्रधान संस्कृतीचं लक्षण! असो.

वर जे सांगितलं त्यामागे आत्मगौरवाचा यत्किंचितही भाव नाही, उद्देश नाही हे मात्र वाचकांनी समजून घ्यावं. घरच्या स्त्रियांचा आदर – आपल्या प्रत्यक्ष क्रियेतून – करणारा कोणी पुरुष असू शकतो!

माझ्या या करण्याविषयी माझ्या पत्नीला व कुटुंबियांना काय वाटतं हे मात्र ना मी तिला विचारलं ना कुटुंबियांना. तिनं किंवा त्यांनीही मला कधी सांगितले नाही. पत्नी “बस करा तुमचं” असं म्हणत नाही तोपर्यंत असंच चालू ठेवायचं मी तरी ठरवलंय.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted