सुश्री स्नेहा देशपांडे पतकी

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप बापच असतो…” ☆ सुश्री स्नेहा देशपांडे पतकी 

गोष्ट म्हटले तर काल्पनिक म्हटले तर खरी. डोळ्यांच्या दवाखान्यातला प्रसंग.

मोतीबिंदू ऑपरेशनचे पेशंट त्यामुळे साहजिक साठीच्या वरचेच होते.

कुणी मुलगा सून बायको याच्यासोबत, कोणी मुली बरोबर, कोणी दोघच नवरा बायको, कोणी जावई आणि मुली, मुलगा असे सगळेच दिसत होते.

त्या सगळ्यांच्या मनात किती वेगवेगळे विचार येत असतील.

 कुणाला वाटत असेल मुलगा असता तर bre झाले असते. कुणाला मुलगी सोबत असल्याचा आधार वाटत असेल. कुणाला मुलाला आणि सुनेला करावे लागतंय याचे दडपण येत असेल. तर ज्यांची मुले परदेशात होती त्यांना तर वाटत असेल अशा वेळी दोघेही जवळ नाहीत काय उपयोग.

असो अशा विविध विचारांनी ते गोंधळलेले होते. शिवाय ऑपरेशन कितीही सोपे असेल तरी त्यांच्या भीती मनात होतीच. नर्स consent घेण्यासाठी एकेक नाव पुकारत होती. एक क्ष नावाचे काका काकू त्यांचा मुलगा आणि सून असे आले होते. त्यांचा नंबर येताच ते उठले, तसा मुलगा जोरात खेकसला, बसा ना गप मी बघतोय, ते जागेवर बसले. पुन्हा कायतरी झाले पुन्हा तो तसाच ओरडला.

त्या काकांना काकूंना खूप ओशाळ्यासारखे झाले.

काकू कसेनुसे हसल्या. अहो तुम्ही बसा इथे शांतपणे, तो बघतोय ना सगळे. असे काकांना समजावणीच्या सुरात म्हणाल्या. नेहमी व्हीलन ठेवली जाणारी सून मात्र तुलनेने शांत होती. स्वतःच्याच आईवडिलांचे करताना मुलांना एवढे ओझे का वाटत असेल. एकूणच तो मुलगा फार वस वस करत होता. तो सीन बघून मला वाटले इतका वेळ या लोकांच्या मनात घोळणारे विचार क्षणात बदलले असतील बहुतेक.

 कुणाला वाटले असेल माझा मुलगा किती चांगला आहे. कुणाला वाटले असेल मुलगा आलाच नाही ते बरे झाले. कुणाला वाटेल मुलगीच आपली असते. तर कुणाला वाटले असेल परदेशांत आहेत ते बरे आहे…

 त्या काकांचे ऑपरेशन झाले. ते बाहेर येऊन बसले. काकूही तिथेच होत्या. मुलगा आणि सून नाश्ता करायला बाहेर गेले होते. मी त्यांच्याकडे बघत आहे म्हंटल्यावर त्यांना कस्तरीच वाटले.

त्यांचे अवघडलेपण दूर करायचे म्हणून मग मीच त्यांची औपचारिक चौकशी केली. मग त्या थोड्या नॉर्मल झाल्या. त्या आपणहूनच मुलाची बाजू सावरत म्हणाल्या, त्याला खूप tension असते हो कामाचे. म्हणून त्याची फार चिडचिड होते. तसा तो खूप चांगला आहे. आमची काळजी घेतो……… त्यांची ती केविलवाणी धडपड मला कळत होती. मी विचारले पण चारचौघात असे बोलले की वाईट वाटतच. एवढा वेळ शांत ऐकत बसलेले काका बोलायला लागले, आणि ते जे काय बोलले ते थक्क करणारे होते, ते म्हणाले होय वाईट तर वाटतच. आम्ही दुखावलेही जातो. पण दुखवले जाण्यापेक्षा मला त्याची काळजी जास्त वाटते हो.

काळजी? मला थोडे आश्चर्य वाटले.

हो ना गर्दीतला एकटेपणा तेवढा त्रासदायक नसतो पण एकांतातले एकटेपण माणसाला जगू देत नाही.

या मुलांना नेमके काय हवं ते कळत नाही.

त्याचा या स्वभावापाई तो जेव्हा असा एकटा पडेल तेव्हा कदाचित आम्ही दोघेही नसू त्याला सांभाळायला.

मी निशब्द झाले, आईला फक्त मुलाच्या वर्तमानाची चिंता असते पण बापाला त्याच्या भविष्याचीही काळजी असते ती कुणालाही दिसत नाही.

आईप्रमाणे बापाच्या दुःखाला ग्लॅमर नसते.

कदाचित, म्हणूनच बाप बापच असतो.

© सुश्री स्नेहा देशपांडे पतकी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted