सुश्री मीनल केळकर
मनमंजुषेतून
☆ बेबी स्टेप्स… लेखिका : सुश्री प्राजक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
परवा रात्री सगळीकडे सामसूम झाली आणि बारा वाजता स्वयंपाक घरात खुडबुड सुरू झाली.
बेडरुमच्या दारातून आत स्वयंपाकघरात पाहिले तर बेबी स्टेप्स टाकत आमची दोन बाळं स्वयंपाकघरात कारभार करताना दिसली. एक बाळ पाणी गरम करत होतं. दुसरं दूध हळद गरम करत होतं. नेहमीचा नजारा बघून मी डोक्यावर पांघरूण घेतले आणि झोपी गेले.
… तुम्ही म्हणाल यांची बाळं घरात कारभार करतात, यांना झोप तरी कशी येते. तर यातलं एक बाळ आहे वय वर्षे 88 माझ्या सासूबाई आणि दुसरे बाळ आहे वय वर्षे 81 माझी आई.
– – एकमेकीला सांभाळत गुण्यागोविंदाने राहतात. यांचं आयुष्य कधी सुखासीन नव्हतंच. पण चांगले समाधानाचे थोडे दिवस पण बघितले आणि आयुष्याचे दशावतारपण बघितले.
.. पण आनंदात सामील व्हायची त्यांची धडपड(हो धडपडच. आपल्या गेलेल्या तरण्याताठ्या पोरांच्या आठवणी मागे टाकून, कटू स्मृती मागे टाकून, छोट्या गोष्टीत आमच्या आनंदात सामील व्हायचा प्रयत्न करणं ही मला खूप समजूतदार, शहाण्या बाळांची धडपडच वाटते) बघून कधी मन भरून येतं कणवेनं.
दोघींचे स्वभाव टोकाचे. एकीला टीव्ही मालिका, वाचन, शब्द कोडी आणि आता मोबाईलवर मालिकांची उजळणी करणे हे वेड. तर दुसरीला अखंड जुनी गाणी ऐकणे, बसवणे, त्याच्यावर चर्चा करणे, स्वयंपाक घरात ओट्यापाशी लुडबुड करणे याचं वेड.
दिवसाचं स्वागतच सकाळी लवकर टाळ्यांनी करतात. मग दिवस चांगला जाणारच. छोटे-मोठे व्यायाम, आरोग्यदायी काढे, मितस्थ जेवण, आपले छंद, ठराविक वेळेस स्तोत्र पठण. आयुष्यात इतकी उलथापालथ घडली. इतकी श्रद्धा आणि पाय रोवून उभं राहायचं बळ येतं कुठून.
दोघींचेही आयुष्य सण, रीतीरिवाज पारंपारिक पद्धतीने जपण्यात गेलं. माझ्याकडे आल्या. वाढत्या जबाबदाऱ्या आणि वयामुळे कामाचा कमी झालेला आवाका यामुळे हे सगळं करताना मी एक पथ्य पाळायचा प्रयत्न केला. रीतिरिवाज पाळताना घरातल्यांची हेळसांड होऊ नये. माझी चिडचिड होऊ नये. दुसऱ्याकडून कामाची अपेक्षा न करता माझ्या हातून जेवढं होईल तेवढेच कटाक्षाने करणे. त्यासाठी जितके जमतील तितके शाॅर्टकट्स केले. सगळ्याच गोष्टी त्यांना पटणार्या होत्या असं नाही. पण ही शहाणी बाळं इथे ही समजूतदारपणे वागली.
… एकाही शब्दाने नाराजी नाही. तक्रार नाही. त्या दिवशी काहीतरी चांगलं हॅपनिंग आहे यातच त्यांनी आनंद मानला. बदललेलं रुटीन स्वीकारताना त्यांना त्रास झाला नसेल का! मुळातून उपटलेलं रोपटे सुद्धा नवीन ठिकाणी रुजताना पहिल्यांदा मान टाकतं.
ही बाळं थोडी खोडसाळपण आहेत हां. छोटी आहेत ना. मग कधी तरी रागावून घेतात. रुसवे-फुगवे, समजूत घालणं, सगळं होतं. पण तसंही त्यांना त्या मूडमध्ये जास्त वेळ राहण्याचा कंटाळाच येतो.
– – एका बाळाचा स्वभाव अति काळजी करण्याचा. सतत व्यक्त होण्याचा. दुसऱ्या बाळाला व्यक्त व्हायचंच कळत नाही. आपल्याबद्दल याच्या भावना काय आहे याचं कोडं पडावं. ना चेहऱ्यावर दिसतं. ना बोलण्यात येतं.
… पण सणावाराला पाया पडताना पायाला हात लावला की सगळ्या भावना मनाला न जुमानता बाहेर येतात. बाळं कुशीत शिरतात. पाठीवरून हात फिरवून घेतात.
तापानं फणफणल्यावर एक बाळ सतत येऊन येऊन अंगाखांद्यावर हात फिरवतं आणि दुसरं बेडरूमचं दार किलकिले करून हळूच येता-जाता डोकावून बघतं. मग मात्र जाणवतं या बाळांची घालमेल जास्त वेळ होता कामा नये. लवकर बरं व्हायला हवं.
… यांच्या बेबी स्टेप्स आमच्या घरातून पडत राहणं हीच आम्ही आमची समृद्धी मानतो. आम्ही खरंच श्रीमंत आहोत.
लेखिका : सुश्री प्राजक्ता कुलकर्णी
प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





