श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुलांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर

आपल्या रोजच्या जीवनाच्या वाटचालीवर आपल्या सगळ्यांना नेहमीच छान छान आणि मजेशीर अनुभव येतच असतात.

असं म्हणतात, की छान अनुभव नेहमीच जतन करून ठेवावेत आणि मधून मधून त्यामधून फेरफटका मारावा, आणि छानशी आनंदयात्रा करावी.

माझा असाच एक छान अनुभव – “फुलांच्या मनातलं”.

बहुतेक घरांमध्ये देवाची पूजा ही रोज असतेच असते. आणि पूजा म्हटलं की फुलं ही असतातच. बरेच जण सकाळी बाहेर जाऊन फिरून येताना फुलं घेऊन येतात. काहींच्या बाल्कनीमधे फुलझाडे असतात. आमच्या बागेत फुलांची छान छान झाडे आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर फुलं रोजच घराभोवती असतात.

मी बागेतून गुलाबाचं एक सुंदर टपोरं फुल रोजच देवाला वाहायला तोडून घेतो. आज बागेत गेलो, विचार केला आज छान दिवस आहे, गुलाबाची तीन चार फुलं तोडावी आणि देवाकरता पूजेला घेऊन जावी.

आणि बघतो तर कुठल्याच गुलाबाला एकही फूल नाही. बाजूची झाडं मस्त फुललेली होती. मनात विचार आला – अरे आज गुलाबाला फुल कसं नाही?

आणि चक्क गुलाबाचं झाड हलत आहे असा भास झाला. आणि एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज आला : मी गुलाबाचं झाड बोलतोय. ऐकू येतय का?

मी : हो हो. ऐकू येतंय. तुम्हाला नमस्कार

गुलाबाचे झाड : नमस्कार, आज आम्ही मुद्दामच फुललो नाही. विचार केला की इतर झाडांच्या फुलांना पण देवाच्या चरणी जाण्याचा योग यायला हवा. आणि म्हणून आम्ही आज मुद्दामच फुललो नाही. विचार केला की, आज गुलाबाला फुलं नाहीत म्हणजे इतर झाडांच्या फुलांना देवाच्या चरणी जाण्याचा छान योग नक्कीच येणार. आणि ती मनापासून खूश होणार.

खरंतर सगळ्याच झाडांची अशी मनापासून इच्छा असते, की, आपली फुलं पण सुंदरच आहेत आणि ती पण देवाच्या चरणी सादर झाली तर मजा येईल. पण त्यांना तसा चान्स मिळत नाही, म्हणून आम्ही आज मुद्दामच फुललो नाही.

मी या बोलण्याचा अर्थ समजलो आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. मी गुलाबाच्या झाडाला नमस्कार केला आणि म्हणालो आजपासून मी रोज निरनिराळ्या झाडांची फुले आलटून पालटून देवाला वाहायला घेऊन जाईन हे नक्की. त्यामुळे सगळीच झाडं आनंदी राहतील.

गुलाबाचं झाड थोडं हलतय, झाडाला आनंद झालाय आणि मला ते धन्यवाद देते आहे, असं मला जाणवलं. मी झाडाला वाकून नमस्कार केला. आणि पुढच्या कामाला लागलो.

त्या दिवसापासून मी एक दिवस जास्वंदीची फूलं घेऊन जातो, एक दिवस कन्हेरीचं, एक दिवस जुईचं, एक दिवस पारिजातक, एक दिवस गुलबक्षी, झेंडू, चमेली, निशिगंध, शेवंती, मोगरा, वगैरे.

सदाफुली ची फुलं देवाला वहात नाहीत असं म्हणतात. पण एक दिवस ती पण घेऊन जातो. कारण देवाला सगळीच फुले प्रिय असणार. रातराणी फुललेली असली तर तिचं फुल रात्रीच देवाला वाहतो, कारण दिवसा ती कोमेजून जातात. आणि रातराणीला पण आपली फुलं देवाच्या चरणी द्यायला आवडत असणारच.

रोजच दिवसातून तीन-चार वेळा बागेत फिरणे होते. फिरताना झाडांकडे बघून असं जाणवतं की सगळी झाडं एकदम खुश आहेत. झाडं थोडी हलायला लागतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. त्यांना आनंदी बघून मी पण आनंदी होतो. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारतो. मजा येते.

गुलाबाच्या झाडाला माझे स्पेशल थँक्स देतो, कारण त्यांनीच मला आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा अगदी सोपा म्हणजे सोपा सोपा मार्ग दाखवला.

सृष्टीची खरंतर नेहमीच अशी इच्छा असते, की, सर्व जणांनी कायम आनंदी राहावं. आणि त्याकरता सृष्टीमधले सगळेच घटक आपल्याला कायम काही काही छोट्या छोट्या टिप्स देत असतात. पण आपलं तिकडे लक्षंच नसतं. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली आनंद मिळण्याची शोध पद्धत असते. आपण वळसेच मारत राहतो आणि कळसा म्हणजे आनंद कधीच मिळत नाही.

चला तर मग, निसर्गाशी मैत्री करूया. बाल्कनी मधे उभं राहून, गच्ची मधे उभे राहून, सोसायटी मधल्या झाडांजवळ उभे राहून, झाडांची गप्पा मारता येतात, वाऱ्याबरोबर हिंडता येतं, पक्षांबरोबर रमता येतं, ढगांबरोबर हिंडता येत, आणि बरच काही, वगैरे वगैरे.

दिवसातून दोन वेळा पाच पाच मिनिटं जरी अशी भ्रमंती केली, तरी ‘आनंद’ या टॉनिकचा दिवसभराचा कोटा सहजपणे मिळतो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted