सुश्री तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ एक तरी ओळ अनुभवावी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
श्रद्धा आणि आणि चिकित्सा जेव्हा हातात हात घालून येतात तेव्हा मिळणारं आत्मिक समाधान मोठं असतं.
लहानपणापासून घरात आणि आजूबाजूलाही धार्मिक वातावरण होतंच. दर गुरुवारी नियमितपणे दत्ताची आरती म्हटली जायची. त्यातलं…
“दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपलें मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवणं
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान”
या कडव्यापाशी टाळ्यांचा वेग आपोआप मंद व्हायचा. लहान असताना म्हणजे सहावी सातवीत असेन मी एकदा बाबांना विचारलं होतं ‘दत्त दत्त असे लागले ध्यान’ म्हणजे काय असतं… का कोण जाणे त्या शब्दांची मला मोठी गंमत वाटायची. इतक्या लहान मला समजावून सांगायला बाबांनाही बहुतेक जड जात असायचं. ते म्हणायचे तू थोडी मोठी झालीस की शोध घे, हे काय आहे त्याचा. काही प्रश्नांची उत्तरं दुसऱ्याने देऊन समजत नाहीत ती आपली आपण शोधायची असतात. तेव्हापासून श्रद्धेला चिकित्सेचं वावडं नसणं हे कुठेतरी मनात नोंदलं गेलं. आणि नकळत शोध सुरू झाला.
आजही या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे मिळालेलं नसावं असं वाटतं पण आता एवढं लक्षात आलं की काही गोष्टींची भाषिक (व्याख्या) उत्तरं उपयोगी नसतात, त्याची अनुभूतीच घ्यावी लागते तेव्हाच त्या गोष्टी समजतात. जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. किंवा त्या शब्द माध्यमातून आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. श्रद्धा, विश्वास या गोष्टी अशाच आहेत ज्या शब्दांमध्ये किंवा कुठल्या विशिष्ट परिस्थितीत प्रयोगाद्वारे आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकत नाही. आपले आपण स्वतःवरच प्रयोग करून त्या समजून घ्यायच्या असतात. प्रयोग करणारे पण आपणच, प्रयोग करतोय तेही आपणच, आणि प्रयोगाची अनुभूती घेणारेही आपणच. ही एक अजब प्रयोगशाळा आहे.
खूप वर्षांपूर्वी अशीच एक कथा वाचनात आली होती. त्या कथेमध्ये साधारण असा आशय होता की, एक लहान मुलगा वनात खेळत असतो. त्याला कुठेतरी कुणीतरी शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसतं. त्याला ती खूप भावते आणि तोही एका देवळात जाऊन तशी पूजा करतो. त्यावेळेला काय घडतं तर पाषाणाची आरंभली पूजा, पूजा करता करता स्वयेच झाला पाषाण. अशा अर्थाच्या त्या काही ओळी होत्या. तेव्हाही मला ते वाचून फार गंमत वाटली होती की ही तन्मयता, ही एकरूपता कशी साधली जात असेल. आणि गंमत म्हणजे त्यावेळेला मला ‘दत्त दत्त असे लागले ध्यान’ याच ओळी आठवल्या होत्या. आणि एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्या गोष्टींमध्ये जरी सगुणाचं वर्णन असलं, पूजा असली तरी ते अंतिम ध्येय नाही. त्या सगुणत्वाला सुद्धा कुठेतरी निर्गुणत्वाशी जोडले गेलेलं आहे. ध्यान लागणं यामध्ये कुठलाही भौतिक अर्थ नसून मनाची आणि त्या तत्त्वाची किंवा विश्वाशी एकरूप होण्याची शक्ती आहे. आणि मग तिथे लक्षात आलं की सर्व देवी देवतांच्या प्रतिकांचा प्रतिमांचा उपयोग हा फक्त पूजाअर्चा करणे नसून त्यातून पुढे ध्यानाकडे जाणाऱ्या ईश्वरी तत्त्वाशी जे अद्यापही कोणाला ठोसपणे समजलेलं नाही, तरीही त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं हे आहे.
पण मग हे तत्व काय आहे? जर ते निर्गुण निराकार आहे तर त्याला सगुणांच्या माध्यमातून पाहण्याची गरज का आहे? ही ध्यानाची अवस्था कायम का असू शकत नाही? त्याच्यासाठी इतके प्रयास का आहेत? आणि जर ईश्वर ही संकल्पना आपण मानली नाही तर आपल्याला ती अवस्था समजणार नाही का? एखादा जर निरीश्वरवादी असेल तर तो ध्यानाची अवस्था, या एकरुपतेच्या स्थिती अनुभवू शकणार नाही का?
अशी कुठली गोष्ट आहे की जिच्यामध्ये ही अवस्था अनुभवता येईल? आणि पुढे जसं जसं वेगवेगळ्या व्यक्ती चरित्रांचं वाचन झालं, माणसांचे अनुभव जमा होत गेले. तसं लक्षात आलं की एखादी कला, एखादं संशोधन करताना, एखाद्या खेळात किंवा एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेताना सुद्धा जर तुमचं मन शांत असेल, स्विकारार्ह असेल तर अशी अनुभूती येऊ शकते. धाता आणि ध्येय एक होऊ शकतं. आणि मग किती तरी लौकिक पुरुषांच्या अलौकिक कार्याचं मर्म समजायला लागलं. भले ते लोक धार्मिक नसतील निरीश्वरवादी असतील पण त्यांना ते तत्व गवसलेलं आहे आणि म्हणूनच ते आपल्या कार्यातून अजरामर झाले आहेत.
त्यामुळे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ही फक्त एका आरतीची ओळ नसून ही आपल्या ध्येयाशी एकरूप होणाऱ्या स्थितीची वर्णन करणारी रचना आहे हे लक्षात आलं. आणि त्याचबरोबर ते साधण्यासाठी विचार, मन आणि शरीर यांचा किती उत्तम मेळ साधला जायला हवा एकरूपता साधली जायला हवी हेही लक्षात आलं.
हे अवघड आहे पण अशक्य नाही…
इथे संत नामदेवांचं स्मरण होतं.. ते म्हणतात ना एक तरी ओवी अनुभवावी… मी म्हणते ही एक तरी ओळ अनुभवावी.
आज दत्त जयंतीच्या उत्तम मुहूर्तावर अनेकांना अशी प्रेरणा व्हावी, प्रचिती यावी हीच प्रार्थना!
||श्री गुरुदेव दत्त||
© तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






