डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ एक भयाण प्रवास… डॉ. माधुरी जोशी 

टायटल वाचून आश्चर्य वाटेल… पण होय! हा माझ्याच आयुष्यातला भयाण, भेसूर, बेसूर काळ… कुणाच्याही वाट्याला येऊ नाही असा… खरंच खोल खोल अंधारातून पुन्हा त्या सोनेरी प्रकाशाकडे गेलेला… आपण निराशेत चिवटपणे आशेवर जगत असतो.. तशीच मी ही जगत राहिले…

१९८०च्या आसपास बेबीताई आणि नृत्यभारतीशी नाळ जुळली.. पुढे कित्येक वर्ष तो सुरेल प्रवास चालू राहिला. “Genius Babytai” आणि त्यांच्या तयार शिष्यांच्या नृत्याला माझी गायनसाथ… अनेक कार्यक्रम, महोत्सव, मैफली…

… असाच एक कार्यक्रम १९९० मधे रंगपंचमीच्या आसपास.. नाशिकला… मी शाळेत नोकरी करत होते. मग रजा वाचवायला अर्धी शाळा करून मी सोयीच्या एस्. टी. नी अनेकदा एकटीच पोहोचे कार्यक्रमाच्या जागी… नृत्य कलाकारांना तयारीसाठी वेळ लागे… त्या सकाळीच गेलेल्या असंत. मी त्या दिवशी तशीच गेले… जेमतेम आवरून स्टेजवरच गेले. काय गायचं यांची भरपूर प्रॅक्टिस झालेलीच असे… माझ्या पद्धतीप्रमाणे त्या दिवशी जे गायचं त्यांची नीट वही सोबत होतीच… काही नवीन नव्हतं मला कारण नृत्यभारतीत रुळून १० वर्ष झाली होती… नेहमीप्रमाणे तयारी होतीच गायची… बेबीताई पढंतसाठी बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी माझी रिकामी जागा होती तिथे जाऊन बसले… बेबीताईंनी एक कौतुकाची, हासरी नजर टाकली वेळेवर पोहोचल्याबद्दल… तिथेच बसल्याबसल्या त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला…

आता वंदनेसाठी पडदा उघडला… मी वंदना गायला स्वर लावायला लागले आणि एक भयंकर धक्कादायक गोष्ट घडली… माझा आवाजाच फुटेना… तोंडातून फक्त हवा… हकार… हे काय होतंय? माझा आवाज का फुटत नाहिये? हे काय झालं? मी घाबरले… हैराण झाले… हे काहीतरी भयंकर होतं… बेबीताई वैतागून बघत होत्या.. ही गात का नाहिये? … मी खुणेनी सांगितलं माझा आवाज गेला… डोळे डबडबलेले… कोरड पडली भितीनं… बेबीताईंनी परिस्थिती ओळखली. त्या उत्तम गात असत. अनेक रचनाही त्यांच्याच… मुखोद्गत.. त्या बिचाऱ्या स्वतः गायला लागल्या. काही उपायच नव्हता दुसरा त्या क्षणी… मला पृथ्वी पोटात घेईल तर बरं असा भाव माझ्या मनात… वंदना संपली आणि तालाचं काम सुरू झालं.. त्यात माझं काम नव्हतं… या प्रसंगानं मला तिथे बसवेना… रडूच फुटत होतं… आत श्वास कोंडला… घुसमटले मी… बेबीताईंना खूण करून तिथून मी उठले… हॉलबाहेर आले… इतकी उध्वस्त.. त्याच मनस्थितीत कुणाला तरी एस्. टी. स्टॅंडवर सोडायला सांगितलं… मिळाली ती एस्. टी. पकडली आणि पुण्याला निघाले. तो परतीचा प्रवास फार… फारच भयाण होता. प्रवासभर रडतच होते…

अडनिड्या वेळी घरी पोहोचले… यांनी दार उघडलं आणि मी ओक्साबोक्सी रडायलाच लागले… यांना काही कळेना… एव्हाना आवाजानं मुलही उठली… आईला असं रडतांना पाहून ती पण कावरीबावरी झाली… लहान होती बिचारी… यांना सगळी हकीकत सांगितली… हे सगळं धक्कादायक होतं… अनपेक्षित होतं… “गाणं” हा तर माझा प्राण… तो सुरेल गोड आवाजच गेला होता.. कासाविशी… बेचैनी.. फक्त बेचैनी… झोप येणं शक्यच नव्हतं. मी हादरले. तेवढ्या वेळात मन कुठे कुठे धावून आलं. माझी संगीत शिक्षिकेची नोकरी… ती राहील ना? आर्थिक भवितव्य क्षणार्धात काळवंडलं. हे काय झालं? का? कशामुळे? … मी कुपथ्य करत नव्हते… भरपूर, नियमित डोळस रियाज करत होते… चोख प्रॅक्टिसमुळे रचना जणू माझ्याच झाल्या होत्या… मग काय घडलं असेल? आवाज बसणं, खराब होणं यापेक्षा आवाजाचं जाणं झेपतच नव्हतं… त्या अंधारात मी मनाने अडखळले, कोसळले.. दिशाहीन झाले…

खूप खूप विमनस्क स्थितीत दुसरा दिवस उजाडला… शाळा होतीच… कसंतरीच आवरून शाळेत गेले… पण टीचर्स रूममधे गेलेच नाही… मैत्रीणीत दु:ख फुटायची भिती वाटली… गाण्याच्या खोलीतच गेले… प्रार्थना झाली… वर्गात गेले तासांप्रमाणे… आवाज विचित्र घोगरा, बसकट, चिरकता… काय काय घडतं होतं. मोठ्या वर्गातल्या मुलींना जाणवलं काही तरी बिघडलंय… बाईंचा हा आवाज नाही. पण बरं नसेल… बसला असेल आवाज.. गार, तळकट खाण्यात आलं असेल… असंच वाटलं बिचाऱ्यांना… अन् लहान मुली हासल्या, डोळेही टिंगल करून गेले त्यांचे… हळवं मन अजूनच दुखावलं… मी पूर्ण उध्वस्त… तो पहिला दिवस होता. आता पुढे काय? हे कधी सुटणार? हे नीट होणार ना? विचारांचा कल्लोळ… दोन दिवसांत वेड लागायची पाळी आली… एखाद्या नर्तकाचा, खेळाडुचा पाय जावा… वादकाचा, चित्रकाराचा हात जावा तसं भयाण काही तरी होतं हे… रोजचा दिवस ढकलणं क्रमप्राप्त होतं…

पितृतुल्य पिंपळखरे गुरूजी आणि पं. अभिषेकीजी हे गुरूजन… छान रमले होते स्वरात… एम्. ए. ला पहिली, खूप स्पर्धात यश, काही मैफली, सवाईत गाणं, अलूरकरची कॅसेट, आदर्श शिक्षिका पुरस्कार, बेबीताईंबरोबर आफ्रिका, अमेरिकेचे यशस्वी दौरे… स्वतःबद्दल म्हणून नाही पण खरंच यशाचा आलेख सुंदर वर चढत होता… तो दाणकन उताराकडे धावला… सारं अनपेक्षित, भयंकर, बेसूर, भेसूर… डोकं बंद झालं जसं काही…

मग उपाय सुरू झाले. अनेक तज्ञ डॉक्टर्स, वैद्य, कडक पथ्य, काढे, ॲंटीबायोटिक्स, स्टीरॉइडस्, अनेक औषधं, टेस्ट, ऊपासतापास, जपतप, पूजा, व्रतं, ओमकार प्राणायाम…

जो जे सांगेल ते सुरू होतं. रस्ता मिळु दे, स्वर मिळु दे… गाऊ दे… एकच मागणं…

सरांकडे जाणं थांबलं… गाताच येत नव्हतं… बुवांनी मात्र खर्जात गाण्याचा सल्ला दिला. तिथे जाऊन नुसतं ऐकायचाही… ऐकणंही शिकणं आहे एक प्रकारचं… हे मात्र पटलं… सर्व शिष्यांच्या मागे भिंतीशी बसून मी किती राग, आलापी, विचार, मांडणी, भावार्थ, बंदिशी, ताना, पलटे… काय काय ऐकत राहिले… इतकं मनापासून… अंतर्मनात शिरंत होतं अगदी… स्वरांचा थेट मनाशी संवाद.. अक्षरशः अधाशासारखं टिपत राहिले… किती काळ जाणार माहिती नव्हतं… पण ते सारं आजवर सोबत आहे…

एक भयाण पोकळी आली आयुष्यात… फक्त ज्या गाण्याचा ध्यास घेतला… नोकरीपायी पहाटे उठून रियाज केले… अभ्यास केले.. गाणं जमायला लागलं, रंगायला लागलं, जरा नाव व्हायला लागलं… आणि अचानक सगळं सगळं संपलं… तो भयानक काळ फारच संथपणे सरकत होता‌.. एखाद्या काळ्या सावलीसारखा… भसाड्या आवाजात नोकरी चालूच होती.

पर्यायच नव्हता… कीव, उपहास, टिंगल, उपेक्षा, दुर्लक्ष साssssरं सोसंत होते. किती उपाय करून झाले. तज्ञ म्हणत घशाला सूज नाही, व्होकल कॉर्डस् पॅरालाईज्ड नाहीत, चरे नाहीत, गाठ नाही.. ‌सगळं उत्तम आहे… दोषंच नाही काही… पण मग काय? उत्तर काय? उपाय काय? .. ‌वेड लागायची पाळी आली अक्षरशः…

.. अचानक कुणी म्हणालं काही खायला घातलं का कुणी? छे, छे… हा तर अगदी वेडा विचार… मी काही कुणी आशा, लता नव्हते माझ्याशी स्पर्धा करायला… ना कुणाशी वैर होतं… एक मात्र खरं… मी चांगल्या गुरूंनी घडवलेली, जरा तयार, चांगलं, ऐकावं असं गाणारी गायिका होते. अशा अजूनही होत्या. मी जरा पुढच्या रांगेतली होते बहुतेक… उत्तम कलाकारांच्या ओळीत असू शकणारी… हा काही खायला घातल्याचा विषय झटकूनच टाकला मी…

होता होता दोन तीन वर्ष होत आली. धीर सुटत चालला… घडत नव्हतंच काही आशादायक… कधीतरी तर जीव द्यावासा वाटला… पोरांच्या ओढीनं, मायेनं पाय ओढला मागे…

आवाज परत आलाच नाही तर… संपलं आपलं गाणं? स्वरात राहणं… परत परत स्वरांना नव्यानं भेटणं… सगळा अंधार समोर… आत मात्र गाणं सुरूच असे… विचार, रचना, रियाज… पण बाहेर येत नव्हतं… घुसमटंत होतं आता…

भीतीनं गिळलं भविष्याला…

– – – आता गुणगुणण्याइतपत आवाज आला होता… त्यावेळी बेबीताईंकडे मासिक सभा चाले… एखादी तयार शिष्या कार्यक्रम करे… आत्मविश्वास, जबाबदारी यासाठी… बेबीताई म्हणाल्या, “तू प्रयत्न कर.. एक वंदना आणि एखादं अभिनयासाठी पदच गायचं असतं. तुझं उत्तम गाणं लोकांनी ऐकलंय… आपलेच पालक वगैरे असतात… ते समजून घेतील. “

.. बेबीताईंची आज्ञा, प्रेम, काळजी समजून मी गायला लागले खरी… पण कधी आवाज दगा देत असे… वाटे कशाला घेतलं हे…

पण हळूहळू सुधारत होतं. गात होते… आशेचा पातळसा किरण फुटत होता… जरा जरा गाता यायला लागलं… १९९० मधे लागलेलं ग्रहण १९९५ मधे सुटलं… मी गायला लागले… एखाद्या भुताटकीसारखा आवाज गेला.. आणि आता परतही यायला लागला… आलाच… मला दागिने, साड्यांपेक्षा नेहमीच स्वरांचा ध्यास होता… मी परत श्रीमंत झाले होते.

पण आवाज गेल्याच्या त्या ५ वर्षात आवाज गेल्याच्या गप्पा, चर्चा, कणव… पसरलं होतं. गाणी मैफली होईनात. पण सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तरीसुद्धा माझ्याकडे शिकलेल्या अर्चना फाटक, संपदा थिटे, अंकिता देवळे, रश्मी मोघे, प्रियांका बर्वे छान गायला लागल्या‌.. परमेश्वर कृपेनी, रियाजानी यशस्वी झाल्या. खूप समाधान आहे…

माझं गाणं देवानी दिलं… त्यानं परत घेतलं अन् परत दिलंही… एका अंधाऱ्या भयावह डोहातून चांदण्यांच्या लखलखत्या घुमटाखाली आणलं…

आजही गाते… वयानं थोडा श्वास, ताना कमी पडतं आता… पण स्वर, लय, शब्द, भाव यांचा हात हातात तसाच… कणभर जास्तच घट्ट आहे आता… खोल मनात गाणं खूप उलगडलंय… संवादी झालंय… जे कळलंय, उलगडलंय, येतंय, जे घडावं असं वाटतं यासाठी शिकवत राहते. देत राहते. खूप ऐकते, अभ्यासते, विचार करते… आणि हो या अंधाऱ्या काळात “खर्जानं'” खूप दिशा दिली. खर्जातल्या ओमकारानं तर किमयाच केली… मंदिराच्या गाभाऱ्यात घुमावा तसा मंद्रातला स्वर वेगळीच शक्ती, आनंद, शांती देतो… ही दिशा देणारे गुरू महानच… कलावंत, गुणीजन… खूप दिलं, घडवलं त्यांनी… एक स्वररस्ता स्वर रांगोळ्यांनी सजवला.. ‌त्यांचे ऋण कधीही संपणार नाहीत… बेबीताईंचा विश्वास, माझ्याबद्दलची कळकळ, माझ्या दु:खाची जाणीव… त्यातून तर परत स्वर लागला… मी गाती झाले… कसं विसरू?

… माझ्या कडे खूप काही आहे असा दावा नाही माझा, पण जे आहे ते खूप आहे हे मात्र नक्की… आज गुरूजन राहिले नाहीत पण सुंदर स्वरमार्ग सतत आहेत… त्यावरूनच जात्येय… जात राहीन… अंतिम श्वासापर्यंत!!!

आवाजाला काय झालं कधीच कळलं नाही… कळणार नाही… तो नियतीचा जबर फटका होता…

… यशातही अहंकार नव्हताच कधी… वडिलांचा संस्कारच होता तसा… आणि खरतंर कुणालाच असुही नाही… कारण स्वर हे त्यांचेच राजे.. त्यांचे मूडस्, भाव… कधी साथ देतील, कधी सोडतील… माहिती नाही… त्यांना शरण जाणं हेच त्यांचं पूजन!!

परमेश्वरा खूप ऋणी आहे तुझी… ‌शिक्षाही तुझी आणि हे सुंदर दानही तुझंच!!!! असाच अखंड सूर राहुदे…

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments