डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ स्वर भावाचा सत्संग!!! डॉ. माधुरी जोशी 

यू ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर न जाणो काय काय नित्य नवीन सामोरं येतं. अशीच ही समोर आलेली पोस्ट… त्यात मोठ्याशा लॉनवर तानपुरा, तबला, हार्मोनियम अशी वाद्यं आणि वादक गायक दिसले आणि मी थांबलेच त्या लॉनवर तिथे त्या सर्वांसाठी उत्सुक.. ‌ऑनलाईन श्रोता होऊन… ते सर्व कलाकार लॉनवरच्या बैठकीवर वाद्य जुळवणीत, माईक टेस्टिंग मधे मग्न… समोर जरा उंचसं, शुभ्र आसन… मुलायम, साधं पण स्वच्छ, तलम, काळजीनं केलेलं आणि त्यावर विराजमान कुणी स्वामीजी.. तेजस्वी, तपस्वी, शांत, आतल्या स्वरांशी संवाद सुरू असणारे.. त्या खऱ्या खोट्या शिष्यगणांच्या गर्दीत असूनही एकटे… स्वतः स्वतःशी रमलेले… मला नाव, पंथ, धर्म कशाचीच उत्सुकता नाही… नसतेच… ओढ होती ते शब्द, स्वर ऐकायची…

ते बहुधा सत्संग शिबीर वगैरे असावं… एखाद्या निसर्गरम्य शांत जागी… गर्दी गडबडीपासून दूर कुठेतरी झालेलं… समारोपाकडे आलेलं… म्हणून ती आजची गायन सेवा…

स्वामीजी ती वाद्य जुळवणी पण ऐकत असतात… अचूक स्वराला मान डोलावंतात… ते उत्तम स्वर ज्ञान असणारे… ते मन लावून, डोळे मिटून ऐकतात… स्वरांशी एकरूप होऊन ध्यानात असावे असे… अगदी साधेसे स्वच्छ शुभ्र कपडे.. तेजासारखेच. कसला डामडौल नाही… आपल्या साधनेचा देखावा नाही… मी पणाचा तर लवलेशही नाही… त्यांच्याबद्दलच्या आदरानी मन भरून येतं माझं…

त्या हिरवळीवर अनेक भक्तजन… त्यांचे भारी कपडे, ऐटीत वावरणं, बसणं, महागडे फोन, अंगठ्या, कडेच्या रस्त्यावरच्या त्यांच्या महागड्या गाड्या… याचंच प्रदर्शन. आपण स्वामीजींच्या फार जवळचे आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न… तर काही श्रद्धाळू, साधे भोळे… आधी त्या प्रवचनासाठी आणि आता स्वरांसाठी उत्सुक… जरा अंतरावर आपलं स्थान ओळखून बसलेले… ही शिष्यवर्गातली कॅटॅगरी चटकन जाणवतेच… त्या काहिंची दृष्टी फक्त स्वामीजींवर… काहिंची स्वामीजी आणि कॅमेऱ्यावर… आपण दिसतोय ना ही काळजी घेऊन जागा पकडलेली… एकूणच गाणं कळंत किती असेल शंकाच वाटावी अशी एक्सप्रेशन्स… तरीपण स्वामीजी दाद देतील तिथे दाद द्यायला हे तयार आणि हे सगळं स्वामीजी बघतायत ना याकडे एक डोळा ठेवून… कारण गाणं कळो ना कळो आपण स्वामीजींच्या गुड बुक्समधे पाहिजे… काही त्यांच्या आसनाच्या शेजारी चिकटून. मनानीच पट्ट शिष्य वगैरे ठरवणारे… हातात महागडा मोबाईल समोर आणि चारही बोटात रत्नांच्या अंगठ्या… ते दिसेल कॅमेऱ्यात असं सहजपणानं दिसणंही जमवलेले… सारं बेगडी, पोशाखी, आपण कुणी खास आहोत स्वामीजींचे असा आविर्भाव… असंच मनात असेल तर कशाला हवाय सत्संग, जप, शिबीर, ध्यान… आपण तिथे आहोत हेच तर जाणवून द्यायचंय ना? … आणि तेच तर हवंच आहे दिसायला… गाणं वगैरे दुय्यम आहे…

काही महाभाग तर आता शिबीर बिबीर संपलंय हे पाहून तिथेच व्यवसायाच्या मेसेजला लागलेले… आव मात्र गाणं ऐकण्याचा पण बोटं सरसर उद्याच्या १०च्या मिटिंगच्या योजनेत… कुणा मागे लपत… तर कुणी तरी चक्क जरा पलीकडे लॉनवर लोळलेले… आता हा किती वेळ गातो काय जाणे… मनात हॉटेल, सामान, परतीचं जेवण, उद्या जातांना पहायचे स्पॉट यांची मांडणी सुरु.. खरंतर केव्हाच सुरू झालेली… उगीच अडवायला झालंय खरं…

कुणी कुणी अगदी हलक्या आवाजात फोनवरच लागलेले. अगदी आपण बोलणंच नाहिये असा चेहरा करून.. त्या आलेल्या सर्वांच्यातच श्रद्धा नाही असं नक्कीच नाही… पण फारच थोडे अगदी पूर्णपणे खरे भक्तीमार्गाचे श्रद्धाळू… स्वामींचं अगदी तिथून निघेपर्यंत दर्शन घेत ते दृष्टी लावुन बसतात. स्वरही ऐकतात.. त्या भावात एकरूप होतात. सोबत काही तरी मनात कानात साठवूनच नेणार असतात… शिबीराचं फलित…

काहिंची तर फॅमिली ट्रीपंच असते… ऑन द वे हे शिबीर आणि मग थंड हवेचं ठिकाण… एन्जॉय करायचंय… बरं झालं सत्संग शिबीराच्या, ट्रीपच्या, सुट्टीच्या तारखा जुळल्या.. पुढे हॉटेलही मिळालं योग्य तारखांना ऊत्तम… हवं होतं ते… म्हणून तर मग शिबीरही पण झालं… त्यामुळे ते अगदीच कंपलसरी गाण्याला थांबलेले. कारण उद्या निघायचं पहाटेच्या फ्लाईटनी… इतरांच्या कानावर हे घालून झालंय आधीच… काही रसिक भक्त मात्र खरंच डोलतात… दाद देतात… स्वरात रमतात… गायक वादकांकडे कौतुकानं पाहतात तर काही जण इतर काय करतायत हेच पहात राहतात… ना गाण्यांशी घेणं ना स्वामीजींशी… आता एकदाचे लवकरच निघुया हीच एवढीच भावना…

. तो गायक, ते वादक मात्र भारावलेले त्या महान विभूतीची गायन सेवा करण्याच्या आनंदात… जीव ओतून, गुरूला स्मरून सुंदर गातात. वाजवतात. रंग, रस भरतात मैफलीत… स्वामीजी तृप्त… सुंदर प्रसन्न स्वरांनी चेहऱ्यावर कधी मंद हास्य… तर आर्त स्वरांनी कधी डोळ्यात तरळलेलं पाणी… अशी त्यांची स्थिती… जरी ते स्वरात रमले तरी ते पण जाणंत असतात कोण खरा रसिक, कोण जाणकार, कोण या मांडवाची फक्त शोभा… कोण उसने… कोण सच्चे… कुणासाठी सत्संग हा दिखावा, कुणासाठी अतीव श्रद्धा, कुणासाठी कंपलसरी… कुणासाठी एन्जॉयमेंट…

स्वामीजींना वाटतं, कशाला हे प्रदर्शन? बेगडी मोठेपण… माझ्या आसपास सतत वावरणं… करा ना व्यवसाय… कमवा पैसा… मला तुमची ऐट, पैसा, बडेजावकी नकोच आहे… मला हवी फक्त श्रद्धा, निर्मळ निर्भेळ मन‌.. हा असा सच्चा भावपूर्ण आर्त स्वर… परमेश्वराला घातलेली आर्त साद… कारण तिथेच भेटेल तो… हा भक्तीचा मार्ग नेईल तिकडे… खाली माना घालून मोबाईल मधे रमणारे महाभाग त्यांना विदीर्ण करतात. हे स्वर नाही का पोहोचत यांच्या कानात, मनात? नाही का ओलावत डोळे? याक्षणी पण हा मोबाईलच जवळचा असेल, व्यवसायच हावी असेल मन, बुद्धीवर तर तीन दिवस सत्संगात काय ऐकलं यांनी? काय ठसलं मनात? थोडावेळ अनेक विचार फेर धरतात… बेचैन, उद्विग्न करतात त्यांना… पण असेही असतातच भक्त जे अंतर्मनातला अमूर्त स्वरही बघतात, ऐकतात, साठवतात ह्रदयात आणि या व्यवहारी जगातही तरतातही…

 स्वामीजींना आजवर ती सोबत करणारी तरूण वयातली ती मैफल आठवते… ती मैफल सांगतेकडे नेणाऱ्या भैरवीची… आर्त पण रडवी नाही… बाराही स्वरात नटलेली तरी उद्दाम नाही… जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी तरी रटाळ नाही… पण साऱ्या श्रोत्यांचे कान, मनं, त्या आर्त सुरेल शब्दांकडे लागलेले… आकंठ तृप्त व्हायला उत्सुक… खरंच.. आज का नाही तसं वाटंत. तेव्हा ही आजची वेडी मशीन्स नव्हती म्हणून? … स्पर्धेचा अतिरेक नव्हता म्हणून? … पैशामागे ऊर फुटेस्तवर धावणं नव्हतं म्हणून? काही मूल्य होती सोबत म्हणून? … तसं तर हवंच असतं ना सारंच जगायला… पण तेव्हा बहुतेकांना स्वरही हवासा होता… शब्दही हवासा होता… बुडत होते ते त्या आनंद रंगात… आणि जगतांना लढंतही होतेच ना.. यशस्वी होते.. मग आता चित्र जरा गडद का? डोळे, मन कोरडे का?

स्वामीजींचा तर तेव्हाही मार्गंच अनोखाच.. ध्यानाचा… त्यांनी तरूणपणी ते स्वर आकंठ अनुभवले अन् संतवचनही… आज मात्र ते स्वर ऐकणारे जरा कमी भेटतात अन् असे काही तरी बेगडी दाखवणारे जास्त

देखावे विदीर्ण करतात त्यांना… विचारांना दूर सारंच अंतराळातून अचानक एक आर्त आलाप कानावर पडतो… थेट मनाच्या गाभ्यात पोहोचतो…

अन् हे विचारांच मळभंच दूर सरकवतो. मग ते त्या तरूण सुरेल भावपूर्ण गायकाच्या, लयदार तबलजीच्या आणि स्वर अलगद टिपणाऱ्या कुशल हार्मोनियम वादकाच्या स्वरात रंगून जातात… साऱ्या सच्चा रसिकांसोबत… जसा काही त्या क्षणी साऱ्यांचा सहज घडतो… सत्संग!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted