श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

काही वर्षांपूर्वी चांदोबा मासिकात विक्रम आणि वेताळ अशा शीर्षकाच्या अंतर्गत कथा यायच्या….! त्या वाचताना मनुष्य अगदी मश्गूल होऊन जायचा….

त्याची सुरुवात वेताळ राजाच्या मानगुटीवर बसतो आणि त्याला एक कथा सांगून प्रश्न विचारतो…

प्रश्नाचे उत्तर दिले की हा गायब होतो असे त्याचे स्वरूप असे….

…. या कथेचा विचार करीत असताना मला काही सुचले ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे….

मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा तो कोणीच नसतो आणि कोणाचाही नसतो… , तो स्वतःचाही नसतो…

पण…

…. जेव्हा त्याला जाग येते, जेव्हा त्याचे जग त्याला पुन्हा आकळू तसतसे अनेक *”वेताळ”* त्याच्या मानगुटीवर येऊन बसतात….

थोडी कल्पना करून पहा…

अनेक *”वेताळ”* तुम्हाला लगेच आठवतील…

काही वेताळ चांगले असतात, काही नकोसे असतात, काही टाळता न येणारे असतात, तर काही कायमचे अर्थात आपल्या *”राशी”लाच* असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…

…. असे वेताळ आहेत आपल्या आयुष्यात….?

जरा डोक्याला ताण देऊन पहा…

– – अशा वेताळांचे काही प्रकार आपण पुढे पाहणार आहोत..

– – – – 

मनामनातील वेताळ – – (लेख क्र. १) 

सासू — 

सासू शब्द ऐकून सर्वाचे कान एकदम तिखट झाले असतील….

अहो, आपली संस्कृती महान आहे असे आपण सर्वजण मानतो….

या महान संस्कृतीने आपल्याला कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध बहाल केले आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी जी नाती निर्माण केली आणि त्यांना विशिष्ट अशी नावे (नामाभिदान) दिली त्यामागे विशेष प्रयोजन नक्कीच असेल. इतकी वर्षे एखादी प्रणाली अस्तित्वात आहे, याचा सरळ अर्थ हा आहे की ती उपयुक्त आहे….

व्यक्ती परत्वे अथवा कालपरत्वे त्यात काही दोष निर्माण झाले असतील….

बरेच वेळा व्यक्ती म्हणून ती व्यक्ती वाईट नसते, पण जेव्हा ती सासूच्या भूमिकेत शिरते तेव्हा ती एकदम *”कजाग सासू”* बनत असते…

मनुष्याने एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक नात्याची अमुक अशी प्रमाण (स्टँडर्ड) ओळख सांगता येणे जिकिरीचे ठरेल, कारण प्रत्येक नात्याला अनेक कंगोरे असतात आणि ते नाते परस्पर/ संबंधित व्यक्तींच्या वागण्यावर, संबंधावर जास्त अवलंबून असते…

**आपापल्या नात्याची जबाबदारी, हेतू, भूमिका, बांधिलकी, मर्यादा स्पष्ट नसेल तर मग ती ती नाती आणि संबंधित माणसं वेताळ बनतात आणि त्या त्या नात्याला कलंकित करतात…, पहा पटतंय का? “*

कथा, कादंबऱ्या आणि सध्या सुरू असलेल्या डेली सोप मधून सासूचे असे काही चित्रण दाखविले जाते की प्रत्येक सासूला असे वाटावे की मी जर अशी वागले नाही तर माझे अस्तित्व राहणार नाही…

…. कोणत्याही नात्याचे अस्तित्व त्या त्या व्यक्तींच्या उबदार संबंधावर अवलंबून असते…. , ते कोणा एकाची जबाबदारी नसते… नातं नेहमी जिवंत ठेवावं लागतं, तेव्हा ते फुलतं जातं…. त्यासाठी त्याच्यावर प्रेमाचे, स्नेहाचे शिंपण घालावं लागते आणि ते सातत्याने आणि निगुतीने घालावे लागते…. , तेव्हाच ते फुलून येते आणि मग ते कुटुंबातील इतरांना सुगंध देत राहते…..

माझी सासू अमुक प्रकारात मोडते, किंवा ती तशीच आहे असे समजून, थोडक्यात अशा पक्क्या गैर समजुतींचा वेताळ आपल्या मानगुटीवर बसला तर मात्र त्या घराचे, कुटुंबाचे काही खरे नसते…..

मी प्रस्तावनेत म्हटलं आहे की हे वेताळ अनेक प्रकारचे असतात….

– – काही वेताळ मनुष्य आपल्या मनाने निर्माण करता आणि त्यांना गोंजारत राहतो, मग कधीकधी असे वेताळ त्याच्या मानेवरून त्याच्या मनात कधी शिरतात आणि त्याच्या मनाचा ताबा कधी घेतात हे त्याला कळत नाही…

मानगुटीवर वेताळ झटकणे सोपे आहे, पण जर तो मनात शिरला तर आधीपासून बसून असलेले अनेक वेताळ त्याच्याशी युती करतात आणि आपल्या मनाचे *”भजे”* होते….

लोकं मात्र याचा खुबीने आनंद लुटतात, आणि प्लिज आपल्या कुटुंबांची मात्र नाचक्की होत राहते….

आजपासून असे कोणते वेताळ आपल्या मानगुटीवर बसलेले नाहीत ना याचा विचार करायला हवा…

आणि नजरचुकीने असा वेताळ मनात शिरला असेल तर त्याने वेळीच मनाची शुद्धी करून त्याला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा…

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली मी आता सासू होणार आहे…..! पण माझा विचार आहे की मला तिची आई व्हायला आवडेल….

– – तिच्या डोक्यात शिरणाऱ्या वेताळाची जाणीव लागलीच मला झाली, मी तिला सुचवले की गं तू उत्तम सासू होण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी आवश्यक तशी मनाची धारणा करून घे….! अन्यथा ना तू उत्तम सासू होशील, ना आई….!

…. तिला माझा विचार पटला…. कदाचित आपल्यालाही पटेल..

 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted