सुश्री अश्विनी अभ्यंकर
☆ – A light take on ‘कंटाळा’ – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆
हल्ली ना, मला सगळ्याचाच कंटाळा येतो.
सकाळी उठायचा कंटाळा,
रात्री झोपायचा कंटाळा.
उडुपी नको, पंजाबी नको,
मिसळ नको, चायनीज नको.
फिरण्याचा कंटाळा…
पण, नुसतं बसून रहायचा देखील कंटाळा!
मन रमावं म्हणून म्हणाल तर…
गाणं ऐकण्याचा कंटाळा, गाणं गायचा कंटाळा,
चित्रपटाचा आणि नाटकाचा कंटाळा,
पुस्तक वाचायचा कंटाळा, काही लिहायचा कंटाळा.
जुनं चालू ठेवायचा कंटाळा, नवं सुरु करायचा कंटाळा
नवे जिन्नस करून पाहायचा कंटाळा,
नवे जिन्नस बाहेर कुठे खाऊन बघायचा पण अर्थात…
कोणाशी जुळवून घ्यायचा कंटाळा,
कोणाशी वाद घालण्याचा कंटाळा,
कोणाला काही पटवून द्यायचा कंटाळा.
आता तर मला, ‘कंटाळा’ या शब्दाचा सुद्धा कंटाळा आला आहे.
खरं तर, ‘कंटाळा’ म्हटलं की आयुष्य एकदम सोप्पं होऊन जातं, नाही का? कशाची बांधिलकी नाही, ना जबाबदारी. कोणाला काही कारणं किंवा समर्थन द्यायची गरज नाही. मग काय, मी आणि माझा कंटाळा, अक्सर बांते करते हैं!
आता त्याचाही कंटाळा येण्याची वाट बघते. तो पर्यंत सकाळी उठायचं, जेवायचं, फिरायचं, गाणं ऐकायचं, मग ott आहेच, घरातल्यांशी वाद घालायचे, नव-नवीन काही बाही चालू ठेवायचं. थोडक्यात, त्या कंटाळ्याला लिंपून ठेवायचं. म्हणजे त्याचं अस्तित्व तर आहे, पण दिसत नाहीये!!
– – – – – –
खरं सांगायचं तर, याचं मला वैषम्य अजिबात नाहीये. ही एक मनोवस्था असावी. बऱ्याच जणांची, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या कारणास्तव होत असणार. काही वेळा ती तात्पुरती पण असू शकते. ‘कंटाळा’ या शब्दाला एखाद्या आणखी चांगल्या पर्यायाच्या शोधात मी आहे.
© सुश्री अश्विनी अभ्यंकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





