श्री विश्वास देशपांडे

??

☆ स्वप्न नवे पाहू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

कॅलेंडरची पाने वाऱ्यावर फडफडतात. पक्षी उडून जावेत तसे दिवस, आठवडे आणि महिने भराभर निघून जातात. भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने पलटत जातात. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी आठवतात.

.. रंगांच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी…

खरोखरच पक्षी उडून जावेत तसे भराभर महिने निघून जातात आणि वर्ष संपत येते. या गेलेल्या महिन्यांसोबत उडून जातात ते आठवणींचे पक्षी! या आठवणींनाही रंग असतात. पक्ष्यांसारखे, फुलपाखरांच्या पंखावरील विविध रंगछटांसारखे! रंग जसे विविध तशा आठवणी सुद्धा! आठवणी गोड आणि कडू, सुखद आणि दुःखद. आठवणी मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या आणि आठवणी अनामिक भावनांच्या… वेढून टाकणाऱ्या.

एखादी आठवण नको तेव्हा जखमेवरची खपली उचकटून काढते आणि मग रक्ताळलेल्या, वेदना देणाऱ्या आठवणी जाग्या होतात. पण दुसऱ्याही आठवणी असतातच की त्या मनाला आश्वस्त करतात, जखमेवरती मलमपट्टी करतात आणि सांगतात की असा दु:खी होऊ नकोस कारण हेही दिवस जातील.

तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील अशी कितीतरी वर्षे फुलपाखरासारखी उडून गेली आहेत, आपल्या कडू गोड आठवणी मागे ठेवून! पण प्रत्येक वेळी जेव्हा वर्ष संपत येते तेव्हा नव्या वर्षाची स्वप्ने मनात जागी होतात. घरातील प्रिय व्यक्तीच्या दूर जाण्याने जसे डोळ्यात नकळत पाणी येते, तसेही जाणारे वर्ष सुद्धा आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावते. आठवत राहते यावर्षी केवढा तो पाऊस! नद्या नाले दुथडी भरून वाहिलेले, अनेकांचे घर संसार उध्वस्त झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. पुन्हा आठवतात कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील ओळी…

सर पैसे नकोत

थोडा एकटेपणा वाटला.

 

मोडून पडला संसार 

तरी मोडला नाही कणा 

 

पाठीवर हात ठेवून 

फक्त लढ म्हणा…!

या ओळी आपल्याला परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती देतात.

हा पाऊस, हे वर्ष बरेच काही देऊन गेले आणि खूप काही घेऊन गेले. अनेकांचे सुहृद त्यांना सोडून गेले आणि नव्याने अनेक व्यक्ती जोडल्याही गेल्या. खरंतर सोडून गेलेल्या व्यक्ती किती आणि जोडल्या गेलेल्या आणि त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या व्यक्ती किती असा हिशेब करायचा नसतो. करायची असते ती दुःखांची वजाबाकी आणि सुखाचा गुणाकार!

प्रत्येक नवीन वर्ष घेऊन येते नव्या आशा आणि नवी स्वप्ने! क्षितिजाच्या उंबरठ्यावर सूर्यकिरणांच्या रूपाने स्वप्नांचे सोनेरी दूत उभे असतात. तुमच्या हाकेला ओ द्यायला ते तयारच असतात. फक्त तुम्ही किती मनापासून त्यांना हाक मारता त्यावर त्यांचे येणे अवलंबून असते. तुम्ही आनंदाने बोलवाल तर आनंदाने येतील आणि सोबत घेऊन येतील सुख, समृद्धी आणि आनंद सुद्धा! अशा वेळी पुन्हा कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवत राहतात…

कशास आई भिजविसी डोळे 

उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात

उद्याचा असे उषःकाल

रात्र आहे तर पहाट होणारच! अंधाराला भेदून सूर्यकिरणे येणारच! हे सोनेरी कवडसे तुमच्या माझ्या दारात, खिडक्यांवर आणि घरात येणार. त्यांना मनातही प्रवेश करू द्या. आतला अंधार संपून जाईल. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष यात तुलना करा. मी कुठे आहे? ये कहाँ आ गये हम, युहीं साथ चलते चलते…? पण तुलना दुसऱ्याशी करायची नाही. ती करायची ती आपल्या स्वतःशीच! ताडून पाहायचं स्वतःला, जोखून पाहायचं स्वतःला आणि ठरवायचं मनाशी की खरोखरच भूतकाळापेक्षा वर्तमानातला मी अधिक समृद्ध झालो आहे का? भावनांनी, विचारांनी…? केवळ पैशांनी नव्हे. नसेल तर मला त्यासाठी आणखी काय करायला हवं? माझं कुठे चुकत आहे का? हीच ती वेळ आत्मपरीक्षणाची! म्हणून तर जरा विसावू या वळणावर…!

जीवनाची गती खूप वाढली आहे. त्याबरोबर आपण वेगाने फरफटत जात आहोत. आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ नाही. कुटुंबासाठी वेळ नाही. आयुष्याचा आनंद घ्यायचाच आपण विसरून जातो आहोत. जीवनातील छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना पारखे होत आहोत. खरोखर इतकी ऊर फुटेस्तोवर धावपळ करण्याची गरज आहे का याचाही विचार करूया आणि क्षणभर थांबूया.

काल मी स्वप्नं पाहिली होती पण ती पूर्ण नाही झालीत. काही हरकत नाही पण प्रयत्न तर केलेत ना त्यासाठी! म्हणून निराश व्हायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. पुन्हा मोठी स्वप्नं बघायचीआणि त्यासाठी त्या वाटेवर चालत राहायचं, अविरत…! तुझको चलना होगा…

मला शेतकऱ्याचे उदाहरण फार आवडतं. शेतकरी कधी हताश, निराश होत नाही. यावर्षी निसर्गाने दगा दिला तरी पुढचं वर्ष नक्कीच चांगलं असेल ही त्याच्या मनामध्ये तीव्र आशा असते. तो उद्याची स्वप्न पाहणं थांबवत नाही. भविष्यात पीक चांगलं यावं म्हणून आज तो जमिनीची मशागत करतो, पेरणी करतो, पिकाची काळजी घेतो नको असलेले तण तणकूर काढून टाकतो. आपल्यालाही तसेच करायला हवं ना! तरच उद्याचं उज्वल भविष्याचं पीक हाती येईल. त्यासाठी वर्तमान आपल्या हातात आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करताना काही ओळी सुचतात…

स्वप्न नवे पाहू गड्यांनो 

स्वप्न नवे पाहू…

स्वागत करू या नववर्षाचे

पसरूनिया बाहू.

 

संकल्प नवे, स्वप्न नवे 

प्रयत्नांचे पर्व नवे

स्वतःला अजमावून पाहू

गड्यांनो स्वप्न नवे पाहू.

 

भूतकाळ तो विशाल दुर्धर

आठवणींनी करतो जर्जर

ओझे त्याचे मनावरचे

फेकुनिया देऊ,

गड्यांनो, स्वप्न नवे पाहू.

 

जातीपंथ ते विसरुन सारे 

मानवतेचे देऊ नारे

बंधुभावाची हाक चला देऊ

गड्यांनो स्वप्न नवे पाहू… 

 गड्यांनो स्वप्न नवे पाहू…

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted