सुश्री नीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ “मसालेभात…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमचा त्या दिवशीचा शाखेतला खेळ होता मसालेभात .
काय म्हणता..
ही तर खायची गोष्ट आहे..
हो खरंच खायचीच गोष्ट..
पण त्याचा कसा खेळ होतो ते सांगते .गोल करून सर्वांनी उभं राहायचं एकीने म्हणायचं मसालेभात… दुसरीने म्हणायचं मी नाही खात… तिसऱीने विचारायचं ..
का नाही खात? चौथीने त्याचे तिला वाटेल ते उत्तर द्यायचं. अर्थात हा सगळा पटापट बोलून खेळला जाणारा खेळ.
उत्तर येणार नाही ती बाद.
चमचमीत विषय…
मसालेभातानी भरलेलं ताटच सामोर आलं…
आता तो का नाही खात?
याच कारण एक एक जण सांगायला लागली. पहिली तीन वाक्य पटकन म्हणून होतात.. चौथीला उत्तर तयार ठेवून सांगायचं होतं.
अर्थात हा स्वयंपाकातला विषय .. तिथे तर आमचंच राज्य ..आणि हे राज्य फुकट दिलं तरी कोणी घेणार नाही म्हणा
– – तर काय सांगत होते… मसालेभात
अनेक वेळा केलेला .त्यामुळे हसत हसत लगेच उत्तरं येत होती .मटार नाही त्यात, गाजर नाही त्यात, फ्लॉवर नाही त्यात, हे सांगता सांगता सांगता…
मीठ ,हिंग ,जिरे ,शहाजिरे ,दालचिनी, लवंग ,वेलदोडे, कोथिंबीर, खोबरं हे सगळं सांगून झालं …
आता फक्त तांदूळच तेवढे राहिले होते ….
मग खेळ खेळता खेळता एक एक जण बाद होत गेली. शेवटी दोघीच राहिल्या. का नाही खात? याला उत्तर देताना त्यातली एकजण म्हणाली,
” भूक नाही मला आज”
दुसरीला काही सुचलंच नाही .पहिली त्या.खेळात जिंकली .खेळ संपला.
” अरे वा किती छान उत्तर तुला सुचलं.. “म्हणून तिच मी कौतुक केलं.
घरी आले. विचार केला. हा काय बर खेळ असेल…
तेव्हा लक्षात आलं की आम्ही सर्वांनी फक्त मसालेभातावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे…
‘आऊट ऑफ द बॉक्स’…जाऊन त्याचा संपूर्ण परिस्थितीजन्य वेगळा ही अर्थ असू शकतो हे लक्षातच घेतलं नव्हतं .
मी का खाल्ला नाही येतला ” मी ” चा विचारच केला गेला नव्हता. संपूर्णपणे एकांगी विचार करून आम्ही मसालेभातालाच दूषणं देत होतो. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला ट्रोल करत होतो आणि त्याची गंमतही घेत होतो….
मला आज नको, माझा खायचा मूड नाही, नंतर खाईन, आत्ता वेळ नाही.. असे अनेक पर्याय मला घरी आल्यावर सुचायला लागले.
समजा त्याच वेळेस ही उत्तरें दिली असती तर कदाचित खेळच बदलला असता….
म्हणजे आपल्यासमोर एखादी गोष्ट चुकीची आहे हे दहा वेळा दहा जण सांगायला लागले की आपल्यालाही ती तशीच वाटते .आपणही त्यातले न्यून काय आहे हे हुडकायला लागतो.
संदर्भ लक्षात आला का?
असं आपल्या आसपास कुठे घडत आहे का ?…बघा बरं तपासून…
सध्य:स्थितीत कोण आपली दिशाभूल तर करत नाही ना..
याचा विचार करावा लागेल.
एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू आपल्या समोर येतच नाही असं तर होत नाही ना…
असत्याला आपण सत्य मानत आहोत का?
त्यादिवशी आम्ही अगदी छोट्या शहाजीऱ्यालाही दोष दिला होता…
तसं तर आपलं होत नाहीये ना?
तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्याने या समाज माध्यमांचा ऊपयोग करून आपल्यावर माहितीचा भडीमार होत आहे…. या सगळ्या गोंधळात नकळत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत का?
“सावज ” म्हणून कोणी आपल्याला गळाला लावत आहे का? याचा सावधपणे विचार करणे गरजेचे आहे.
मात्र यासाठी जे घडतय ते चुकीचं आहे हे सांगणारं …. योग्य कुणीतरी … मार्गदर्शन करणार हवं आहे . त्यांच्याशी आपला संपर्क आणि संवाद हवा आहे .नाहीतर आपण अविवेकाच्या लाटेत वाहत जाऊ.
आपलं हित कशात आहे हे आता राष्ट्र सेविका समितीत जाऊन थोडे कळायला लागलेले आहे. आम्ही आपल्याच नादात होतो. पण तिथे गेल्यापासून आसपास काय चाललेलं आहे याचा आम्ही… निदान विचार करायला लागलो आहोत.
हळूहळू सुधारणा होत आहे. समितीत शिकवलेल्या एका गीतातल्या या चार ओळी..
” गलत मत कदम उठाओ
सोच कर चलो विचार कर चलो
राह की मुसीबतोंको पार कर चलो”
मुसिबतें कौन सी है..
हमे मालूम है..
फिर विचार तो करना ही पडेगा…
सोच लो …
अरे हो…एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शाखेतल्या खेळातला ” मसालेभात ” ही फक्त ” खायची “गोष्ट नव्हती…
हे तुमच्या लक्षात आलं ना….
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




