शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ जांभूळ आख्यान☆ शीला पतकी 

जांभूळ आख्यान नावाच नाटक खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं. त्याची कथा थोडक्यात अशी आहे… की एकदा पांडव वनविहाराला गेले असताना कर्ण द्रौपदीच्या दृष्टीला पडतो. आणि क्षणभर तिला त्याचा मोह होतो. आणि वाटतं की हा जर सहावा पांडव असता तर… हा विचार अगदी क्षणभरच येतो… कृष्णाला तिच्या मनातला हा भाव कळतो. द्रौपदी खरंतर तो विचार क्षणात झटकून टाकते… तरी तिला असा विचार आपल्या मनात कसा आला असं वाटतच राहतं… पण ते किती स्वाभाविक होतं ना कारण तो खरंच पहिला पांडव होताच ना… त्या सगळ्यांना खूप भूक लागते म्हणून फळे आणण्यासाठी त्यातील एक पांडव जातो… कुठेही फळं मिळत नाहीत केवळ. एका झाडाला एक जांभूळ लागलेल असत ते तो काढतो. तेव्हा तिथे तपश्चर्याला बसलेल्या ऋषींनी बारा वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर खाण्यासाठी ते जांभूळ राखून ठेवलेले असत हे जेव्हा त्या पांडवाला कळतं तेव्हा तो घाबरतो. ते ऋषी आपल्याला शाप देतील ही भीती वाटते. तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. कृष्ण तेव्हा सांगतो की पतिव्रता स्त्रीने ते झाडाला जर चिकटवलं तर ते पुन्हा लागून जाईल. मग आता द्रौपदी सारखी दुसरी पतिव्रता नाही… सगळे म्हणतात, जा बाई तू हे कर… ती मनोमन जाणून असते हे खरं नाहीये… आपल्या मनात क्षणभर का होईना पर पुरुषाचा विचार आला होता… आणि ती मनोमन श्रीकृष्णाचा धावा करते की, आता मला या पेचातून सोडव. आणि त्याच्या प्रतिमेला नमस्कार करून ती झाडाला जांभूळ चिकटवते. ते चिकटत पण ते उलट चिकटतं… असं का घडलं? … याचे उत्तर श्रीकृष्ण तिला सांगतो की, परपुरुषाचा विचार मनात आणल्यामुळे तुझ्यातून चूक झालेली आहे. त्या चुकीची जाणीव तुला सतत व्हावी म्हणून तुझ्या हातून चिकटवलेले ते जांभूळ उलट लागलं तुला सदैव याची खंत वाटली पाहिजे…

 इथे आख्यान संपत. बायकांच्या मनात पर पुरूषा विषयी कधीही लोभ निर्माण होता कामा नये… अगदी मनांत सुद्धा! …

आता याकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहूयात… एखाद्या पुरुषाला हे जांभूळ चिकटवण्याचा सांगितले असते तर… तर मला वाटतं सगळी जांभळं झाडाला उलटी चिकटली असती किंबहुना जांभळाचे झाडच उलटे झाल असत.

त्या कथेत शेवट सांगताना असं सांगितलं जातं की… म्हणून जांभळ खाल्लं तर आपली जीभ जांभळट होते… म्हणजे जांभूळ खाल्ल्याचे लपून राहत नाही जसे की पाप लपून राहत नाही… म्हणजे एखाद्या स्त्रीच्या कल्पनेत असलेला क्षणभर तिने कल्पना केलेला पुरुष तिच्या मनात आला तर तिच्या पातीव्रत्याचा भंग…! तिच्या हातून मोठे पाप घडले…! आणि पुरुषांच्या दिवसातनं दहा वेळा दहा बायकांबद्दल विचार येतात ते मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ…!

अगदी श्रीकृष्णांन सुद्धा बायकांवर अन्याय केला आहे… हे माझं मत तुम्हाला काय वाटतं…?

– – मी आत्ताच जांभळं आणली.. ते घेताना माझ्या डोक्यात हिच कथा होती. काहीतरी कारण सांगतात. खरंतर जांभळाला पूजेमध्ये ठेवू शकत नाही. पण द्राक्षाला ठेवतात का? किंवा ज्या फळांचे घोस असतात त्यांना तरी ठेवतात का? एक तर जांभूळ पिकल्यानंतर ते लगेच फुटतं. ते जास्त टिकत नाही. त्यामुळे कदाचित पूजेमध्ये त्याला ठेवता येत नसेल.. पण त्याच्या मागे ही कारण देणे चुकीचेच आहे.. कोणत्याही कारणांच्या मागे स्त्रियांना नीतिमत्ता शिकवणं ही एकेकाळची परंपराच होती. स्त्रियांना सगळे नियम आणि बंधन.. अर्थात याला अनेक कारणं आहेत.. कारण स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यात तीच सफर होते.. पुरुष नामानिराळे राहतात. म्हणून स्त्रियांचे चारित्र्य जपण्यासाठी अशा अनेक कथा निर्माण झाल्या असाव्यात..

आणि स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे त्या जास्त श्रद्धाळू म्हणा किंवा अंधश्रद्धाळू होत्या म्हणजे बाईने पुस्तक वाचलं तर नवरा मरतो अशा सगळ्या भयावह गोष्टी तिच्या माथी मारल्या आणि नवरा मेल्यावर बाईची अवस्था त्याकाळी खूप वाईट होती अगदी घरात कामाला मोलकरीण. बायकोचं बाळंतपण करायला घरात हक्काची बाई म्हणून दिर ठेवून घ्यायचे आणि छळायचे. शिक्षणाने खूप परिवर्तन झाले, समाजाला ते स्वीकारावेच लागले. काल माझ्या शेजारी एका मुलीची आई गेली ती डॉक्टर आहे आणि तिची बहीण प्राध्यापिका डॉक्टर असलेल्या मुलीने सर्व क्रिया कर्म मुलाप्रमाणे केले. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यातील चार माणसं काय म्हणतील बाई ती चार बोलणारे नेहमीचे माणसे कोणीही बोलले नाहीत म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवून आले हे नक्की! आणि ते नेमके शिक्षणानेच घडले यात वादच नाही. पण अशा भंपक गोष्टींमुळे मुली थोड्या अधिकच धीट झाल्या आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली आहे. आता संस्कार काहीतरी टिकून ठेवेल अन्यथा अवघड आहे…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted