श्री संभाजी बबन गायके

 

??

“मरणासक्ती! ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कोन्द्रागुंटा महालक्ष्मीअम्मा

मरणासक्ती!

 – – उस जगह ही निकले दम!

जन्माचा किनारा सोडून आयुष्याची नौका पैलतीराकडे मार्गाक्रमण करीत निघते तेंव्हा आपण जिथपर्यंत येऊन ठेपलेलो असतो, तिथून एैलतीर तसा फार दूर आहे, असं वाटत नाही! मध्यावर आलो असता ना अलीकडचा ना पलीकडचा.. कोणताच तीर दृष्टीस पडत नाही.

दिवसांच्या लाटा आपल्याही नकळत पैलतीर गाठण्याच्या तजविजीमध्ये गुंतलेल्या असतात… या जलाशयातला वारा नेहमीच पैलतीराकडे जाण्यासाठी अनुकूल असतो. आपल्या शेजारून, बाजूने आणि पुढे अशा कित्येक नौका निघालेल्या आपण नित्य पाहात असतो… आणि मग मनाच्या खोल तळाशी रुतून बसलेला मरणविचार पृष्ठभागावर येऊ पाहतो… आपणही तिकडेच निघालो आहोत… प्रश्न केवळ काळाचा आहे. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे.. अकस्मात तोही पुढा जात आहे… ह्या भारांच्या पंक्ती आपण कैकदा ऐकलेल्या, उच्चारलेल्या असतात… त्यांतील एक एक शब्द मन:पटलासमोर येऊन नाचू लागतो.

आता जगण्याच्या काळजीपेक्षा मरण्याची चिंता चित्तास अधिक भिवविते. कुठे जन्म व्हावा, हे सर्वस्वी ईश्वराधीन. पण मग मृत्यूचं ठिकाण तरी आपल्या हाती असावं की नाही?  पण हीही सवलत दैवानं मानवाला दिलेली नाही, हेही खरंच. पण अनेक हृदयांचं त्या जन्मदात्या परमेश्वराकडे ही मागणी मात्र असते… जिस जगह पैदा हुए… उस जगह ही निकले दम!

१९६१ मध्ये आलेल्या ‘काबुलीवाला’ या हिंदी चित्रपटात नायकाच्या तोंडी प्रेम धवन यांनी लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं मन्ना डे यांच्या आवाजातील एक अजरामर गीत आहे…

… “ऐ मेरे वतन, ऐ मेरे बिछडे चमन… तुझ पे दिल कुर्बान. ” – – या गाण्यात एक ओळ आहे…

छोड़ कर तेरी ज़मीं को दूर आ पहुँचे हैं हम…

 फिर भी है ये ही तमन्ना तेरे ज़र्रों की क़सम 

 हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम 

 ज्या मातीतून आपण उगवलो, त्याच मातीत अंतिमत:मिसळून जाण्याची इच्छा असणं हे माणसाच्या ओल्या मनाचं आणि स्निग्ध काळजाचं एक अतिनाजूक लक्षण म्हणावं. देहातून आत्म्याने प्रस्थान केल्यावर देह कणाकणाने आणि क्षणाक्षणाने मातीशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत घाईघाईने सहभागी होतो. आणि मग शेवटी उरते ते मातीच. पण ही माती जगात कोणत्या मातीशी एकरूप व्हावी ही इच्छा माणूस का बरं करीत असावा?  याचं कारण आहे… प्रत्येक मातीचा गंध, पोत निराळा असतो! मृदगंध बालपणीपासूनच रंध्रारंध्रात पेरला जातो आणि देह व्यापून उरतो.

म्हणूनच रूग्णालयात मृत्यूची प्रतीक्षा करणारा जीव घरी, मुला-बाळांच्या संगतीत शेवटचे क्षण जावेत, असा ध्यास धरतो. व्यवहारातील अडचणी काहीवेळा असं होऊ देत नाहीत. मग किमान अंत्यसंस्कार तरी गावाच्या मातीत व्हावेत, अशी इच्छा निर्माण होते… ही इच्छा काळ, परिस्थिती पूर्णत्वास नेईल की नाही… हे आपल्या हातात नसते!

जन्माला आलेल्या बालकाला जसं आरंभी गर्भातला काळ स्मरत राहतो… तसं म्हातारपणी माणसाचं होत असावं का?  आईच्या गर्भात ज्या स्थितीत बाळ तरंगत असतं, अगदी त्याच अवस्थेत मुलं पाय पोटाशी घेऊन, अंगठा तोंडात घेऊन निजलेली दिसतात बरेच दिवस! जन्मभूमीचं असंच आहे का?

कोन्द्रागुंटा महालक्ष्मीअम्मा या आज ९४ वर्षांच्या आहेत. २००१ मध्ये त्या पतीसोबत अमेरिकेत गेल्या आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थिरावल्या. त्यांच्या पतींचे नुकतेच निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्या आंध्रप्रदेशातील चिंथागम्पाला या गावी राहायला आल्या आहेत. त्यांनी आता भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे… त्या म्हणतात… माझ्या जीवनाची अखेर आता आली आहे… मला भारतीय म्हणून मरण यावे, अशी माझी अंतिम इच्छा असून माझे अंतिम संस्कार माझ्या गावीच व्हावेत!

माणसाची जगण्याची उर्मी आणि मरणाची इच्छा मानवी भावजगतातील एक अतिशय गुंतागुंतीची भावना आहे… किमान प्रत्येकाची ही अंतिम इच्छा तरी पूर्ण व्हावी! जगण्याच्या विचारापेक्षा मरणाचा विचार आपल्या संस्कृतीत खूप गांभीर्याने केला जातो, हे खरेच!

श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो

मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले… ही मागणी सुद्धा त्यामुळेच मनाला भावते!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted