डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ नियमांचे पालन… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

रविवारची सकाळ.

चिंचवडहून जवळच पिंपरीला सहकुटुंब सहपरिवार जाण्याचा अनिल देशमुखांचा बेत ठरला होता.

सरकारी खात्यातील अधिकारी अनिल देशमुख हे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी वाखाणले जात. ऑफिसमध्ये तर लोक त्यांना “नियमपुस्तक”च म्हणायचे.

त्या दिवशी, पत्नी स्वाती, आठ वर्षांचा मुलगा अथर्व आणि पाच वर्षांची मुलगी गौरी यांना घेऊन ते घराबाहेर पडले.

घरापासून अंतर फार नव्हते. “अरे, एवढ्याशा अंतरासाठी कार कशाला?  शिवाय मित्राकडे पार्किंगचाही प्रश्न असतो. ” असा विचार करून अनिल यांनी स्कूटर काढली.

स्वाती मागे बसली. तिच्या मांडीवर गौरी. आणि अनिल यांच्यासमोर अथर्व.

रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी होती.

एकीकडे गप्पा, मुलांचा गोंधळ आणि बडबड सुरू होती आणि स्कूटर पुढे जात होती.

समोर थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी होती. कारमध्ये चालक बसलेला होता.

अनिल स्कूटरने कारला ओलांडत होते, इतक्यात…

धाडकन्! – – कारच्या चालकाने कोणतीही सूचना न देता अचानक दरवाजा उघडला आणि तोंडातील तंबाखूची पिचकारी मारली.

दरवाजा स्कूटरवर आदळला, स्कूटरचा तोल गेला.

अनिल, स्वाती, अथर्व आणि गौरी चौघेही रस्त्यावर आपटले.

सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही, पण मुलं घाबरून रडू लागली.

अनिल संतापाने उठले.

“हे काय केलं तुम्ही?  दरवाजा उघडण्यापूर्वी मागे बघायचं नसतं का? “

कार चालक निवांतपणे खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता.

“त्यात एवढं काय झालं? “

“तुमच्यामुळे आम्ही पडलो! “

“तुम्ही जरा सांभाळून चालवायला हवं होतं. “

“म्हणजे चूक तुमची आणि दोष आमचा? “

“रस्त्यावर चालताना खबरदारी घ्यायची असते. “

– – हे ऐकताच अनिल यांच्या रागाचा पारा चढला.

“मी आता थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो. “

“जा ना. कुणी अडवलंय? ” चालकाने खांदे उडवले, त्याला काहीच फिकीर नव्हती.

अनिल यांनी गाडीचा नंबर लिहून घेतला, गाडीचा, दाराबाहेर मारलेल्या तंबाखूच्या पिचकारीचा आणि पडलेल्या स्कूटरचा फोटो काढला. हे फोटो काढताना आतल्या ड्रायव्हरचा फोटो येईल याचीही काळजी त्यांनी घेतली.

पंधरा मिनिटांत अनिल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.

कपाळाला खरचटलं होतं. शर्ट कोपऱ्यावर फाटला होता. मुलं अजूनही घाबरलेली होती.

ड्युटीवरील कॉन्स्टेबलने खुर्ची पुढे केली.

अनिल यांनी आपले सरकारी ओळखपत्र (आय कार्ड) दाखवले. राज्य शासनात वर्ग-एक अधिकारी. आय कार्ड पाहताच कॉन्स्टेबलने लगेच उभं राहून कडक सलाम ठोकला.

“काय झालं साहेब? “

अनिल यांनी संपूर्ण घटना सांगितली. कॉन्स्टेबलने मान डोलावली.

“हो, दरवाजा बेफिकिरीने उघडणं हा गंभीर प्रकार आहे. तुमची तक्रार लिहून घेतो. “

– – अनिल यांना हायसं वाटलं.

कॉन्स्टेबलने वही उघडली. देशमुखांचे नाव, हुद्दा लिहिला आणि पुढील माहिती विचारू लागला.

“घटना कशी घडली? “

अनिल तपशीलवार सांगू लागले.

– कॉन्स्टेबल लिहीत होता. अचानक त्याने पेन खाली ठेवलं. डोकं वर केलं. आणि शांतपणे विचारलं,

“साहेब, स्कूटरवर कोण कोण होतं? “

“आम्ही चौघे. “

“म्हणजे तुम्ही, पत्नी आणि दोन मुलं? “

“हो. “

कॉन्स्टेबल पुन्हा शांत झाला.

“साहेब, तुमची तक्रार खरी आहे. कार चालकाची चूकही दिसते आहे. “

“मग एफआयआर नोंदवा. “

कॉन्स्टेबल किंचित हसला.

“एफआयआर नोंदवण्याआधी मला आधी एक दुसरी नोंद करावी लागेल. “

“कुठली? “

“चार जणांना दुचाकीवर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची. “

अनिल गप्प.

कॉन्स्टेबल पुढे म्हणाला,

“तुम्ही स्वतः सरकारी अधिकारी आहात. “

“हो. “

“कायद्याचं ज्ञान आहे? “

“अर्थात. “

“मग दुचाकीवर फक्त दोन जणांना परवानगी असताना चौघे का बसलात? “

… अनिल यांच्या तोंडून शब्द फुटेना. काही क्षण शांतता पसरली.

आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की ते फक्त पीडित आहेत. पण आता चित्र वेगळं दिसू लागलं.

– – कार चालकाची बेफिकिरी चुकीची होतीच. पण स्वतःची चूकही ते नाकारू शकत नव्हते.

कॉन्स्टेबल म्हणाला,

“साहेब, कायदा हा फक्त इतरांनी पाळावा म्हणून नसतो. तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. तुमची तक्रार आम्ही नक्की घेऊ. पण त्याचबरोबर तुमच्यावर झालेल्या नियमभंगाची नोंदही करावी लागेल. “

अनिल काही क्षण खाली मान घालून बसले.

नंतर त्यांनी खोल श्वास घेतला.

“तुम्ही बरोबर आहात. “

कॉन्स्टेबल आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.

“माझी तक्रार नोंदवा. आणि माझ्यावरचा दंडही करा. “

– – पोलिस स्टेशनबाहेर पडताना अनिल यांच्या मनात अनेक विचार चालले होते.

कार चालकाची चूक त्यांना न्यायालयात सिद्ध करता आली असती.

पण त्या दिवसाने त्यांना आणखी मोठा धडा दिला होता…..

… कायद्याचा आधार मागण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण स्वतःही तोच कायदा पाळत असतो.

रस्त्यावरची जखम काही दिवसांत भरून निघाली.

… पण त्या दिवसाचा धडा कायमचा मनावर कोरला गेला—

“इतरांच्या चुकीकडे बोट दाखवताना उरलेली तीन बोटं अनेकदा स्वतःकडेच वळलेली असतात. “

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted