शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ अनुभवाचे शहाणपण… ☆ शीला पतकी ☆
☆
परवा एक वाक्य वाचलं….” माणूस लहान मोठा असू शकतो, त्याच काम लहान मोठ असू शकत पण माणसाचा अनुभव मात्र नेहमीच मोठा असतो…..” वाक्य पुन्हा एकदा वाचलं आणि मनाला पटलं म्हणून तर आपण वयाने मोठे असलेल्या माणसाला तो कितीही कमी शिकलेला असू दे आपण त्याला वाकून नमस्कार करतो, म्हणजे करत होतो आताची पिढी झेन वाली आहे ती माहित नाही… तो नमस्कार त्यानं त्याच्या वयात घेतलेल्या अनुभवाला असायचा. याची एक गमतीदार गोष्ट एका वक्त्याच्या तोंडून ऐकली. मला ती खूप आवडली आणि खूप बोलकी होती…
कॉलेजमध्ये शिकणारी तीन मुलं रेल्वेमधून प्रवास करत होती. एक शास्त्र शाखेचा एक कला शाखेचा आणि एक वाणिज्य शाखेचा… असे ते तिघे …त्यांच्या वृत्तीही त्याप्रमाणे म्हणजे एखादी गोष्ट पाहिली तर कला शाखेचा विद्यार्थी त्याच्यावर निबंध लिहील कविता करेल…. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ती किती फायदा घेऊन विकता येईल… बाजारात त्याला काय किंमत असेल? त्याचे आणखीन काही प्रॉडक्ट बनतील का ?.असा विचार करेल. विज्ञान शाखेचा विद्यार्थी त्याचं पार डीसेक्शन करून त्यात नेमकं काय काय आहे त्या प्रत्येक गोष्टीमुळे काय घडतं याच संशोधन करेल …!
अशा वृत्तीची ही तीन मुलं प्रवास करत होती तिघे खालच्या बर्थ वर बसलेले. वरच्या बर्थवर एक माणूस झोपलेला होता… साधारण मळके कपडे, डोक्याला बांधलेला फेटा उशाशी घेऊन चपला जवळ घेऊन तो पाय मोडून झोपला होता. त्याच्या वरच्या बाजूला साखळी होती. डब्यात काही दुर्दैवाने घडलं तर ती ओढून गाडी थांबवण्याची सोय.. आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवता येत असे…! त्या तिघांनी त्या साखळी कडे पाहिलं त्यातला एक म्हणाला,” खरंच का रे साखळी ओढली तर गाडी थांबेल?” सायन्स वाल्यांनी सांगितलं,” अरे हो साखळी ओढली की एक विशिष्ट ब्रेक असतो तो आपोआप लागतो गाडी एक दोन मिनिटात थांबते त्या डब्याचा नंबर तिथे येतो गार्ड त्याप्रमाणे चौकशी करत त्या पर्यंत येतात आणि मदत मिळते” …दुसरा म्हणाला,” खरंच हे असं घडत असेल का रे?” विज्ञानवाल्याने उत्तर दिले,” अर्थात प्रयोग करून बघायचे का?.” त्यावर कॉमर्स वाला म्हणाला,” अरे त्याच्या खाली काय लिहिले वाचा विनाकारण साखळी सोडल्यास तीनशे रुपये दंड होईल… सर्वांनी ती बारीक अक्षरात लिहिलेली सूचना वाचली आणि म्हणाले, “खरंच रे बाबा…” एका मिनिटांनी त्यांच्या डोक्यात परत विचारआला…. काय हरकत आहे आपण प्रयोग करून पाहू ना… कॉमर्स वाला म्हणाला,” अरे पण दंड कोण भरणार? आर्ट्स वाला म्हणाला आपण प्रत्येक जण शंभर शंभर रुपये काऊंट्री काढू आणि तीनशे रुपये दंड भरू …आहेत का बघा सगळ्यांकडे पैसे” सगळ्यांनी खिशे चाचपले प्रत्येकाकडे शंभराची एक एक नोट होती. शंभर रुपये तर प्रत्येकाकडे आहेतच आपण आज हा प्रयोग करूनच बघू…असे म्हणून त्यातल्या एकाने साखळी ओढली… गाडी थांबली… गार्ड आणि रेल्वेची इतर काय त्यांची जी व्यवस्था होती ती माणसं त्या डब्यापर्यंत आली. डब्यात चढून आल्यावर त्यांनी विचारले कोणी साखळी ओढली? आणि काय झाले? आता हे तीघे थोडे घाबरले होते. त्यातल्या एकाने युक्तिवाद केली त्यातला एक जण पटकन म्हणाला ,”आम्ही काय केलं नाही साहेब तो वरच्या बाकड्यावर झोपलाय ना माणूस त्यांनी साखळी ओढली बघा अन आता गपचूप खाली मान घालून झोपलाय” गार्डने त्या खेडूताला हलवून उठले आणि म्हणाला ,”ओ बाबा उठा साखळी कशासाठी ओढली? तुम्हीच ओढली ना साखळी? त्यावर तो माणूस ऊठला म्हणाला,” मला जरा खाली घ्या “दोघांचा हात धरून तो खाली उतरला आणि म्हणाला,” होय साहेब मीच साखळी वडली. गार्डन विचारले “काय झालं तुम्हाला काय आपत्ती होती कि तुम्ही साखळी ओढलीत?” तो म्हणाला, “साहेब लयधरन झालय ही तीन पोरं मला पिडत्यात मला ढुसन्या देऊन मारले. आणि माझ्या खिशातले तीनशे रुपये काढून घेतलेत, हे चोर आहेत. माझ खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या खिशात तपासा बर नुसते घेतले नाहीत तर ते लगेच वाटून प्रत्येकाने आपापल्या खिशात शंभर शंभर रुपये ठेवलेत माझा खोटं वाटत असेल तर तुम्ही त्याची झडती घ्या माझे गरीबाची तीनशे रुपये द्या साहेब .अन निघाले नाही ना तर मग तुम्हाला काय मला शिक्षा करायची ती करा आता माझ्याकडे तर एक पैसा बी नाही” गार्डने त्या तिघांचे खिसे तपासले आणि त्या माणसाने म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाच्या खिशात शंभर शंभर ची नोट निघाली कारण ही मुलं जेव्हा खाली बोलत होती तेव्हा म्हातारा वरती गप्प पडून ऐकत होता अन प्रत्येकाच्या खिशात शंभर रुपयात हे त्याला पक्क ठाऊक होतं प्रत्येकाच्या खिशातले शंभर रुपये काढल्याबरोबर म्हातारा म्हणाला,” बघा साहेब म्या म्हणतो ते खर आहे का नाही ?” आता गार्डने तीनशे रुपये म्हाताऱ्याच्या जवळ ठेवले हे घ्या बाबा .बाबा तुमचे पैसे नीट सांभाळा आणि त्याने पोरांना पुढच्या स्टेशनवर उतरून त्यांची धुलाई केली ते म्हाताऱ्याच्या गळ्यात काही अडकवायला निघाले होते आणि म्हातारा एवढा बेरकी आणि वयाने अनुभवी त्यांन बरोबर त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला आणित्याला नाहक गोवल्या बद्दल तीनशे रुपये वसूल केले.
असं कोणाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नये समोरचा माणूस शिकलेला नाही याचा अर्थ शहाणा नाही असा होत नाही ना तो धडा त्या मुलांना जन्मभर बरंच काही शिकवून गेला
एकूण काय शहाणपण शिक्षणावर अवलंबून असतच असे नाही अनुभव समृद्धता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अनुभव हे कोणत्या शाळेत शिकून येत नाहीत ते जगाच्या शाळेत डोळे उघडे ठेवून वावरल्यानेच प्राप्त होतात….!
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





