श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ४ ☆ श्री संभाजी बबन गायके 

पालखी सोहळ्यातील ‘अभंग’ व्यक्तिमत्त्वे!

भक्तिगीते आणि अभंग यांच्यात नेमका फरक सांगायचाच झाल्यास तो अनुभूतीचा असतो. शब्दांवर हुकुमत प्राप्त केलेले कवी अतिशय उत्तम भक्तीरचना करू शकतात, यात काहीच वाद नाही. परंतू संतांनी लिहून ठेवलेले अभंग हा त्यांचा प्रत्यक्ष जीवनानुभव असतो आणि म्हणूनच तो कधी भंग पावत नाही!

भारतातील जवळपास सर्वच संतांनी त्यांचे विचार काव्यरुपात लिहून ठेवलेले आढळतात. महाराष्ट्रभू तर संतकवींची खाणच म्हणावी. आणि हे काव्य म्हणजे कुणा व्यावसायिक वा हौशी कवीने प्रसिद्धी, धन, मान यांसाठी योजलेली शब्दयोजना नव्हेत! म्हणूनच कित्येक शतके उलटून गेली तरीही ते शब्द जनमानसावर आपले गारुड कायम ठेवून आहे!

जगदगुरू संत श्री तुकोबारायांसोबत वाट चालत होतो. हे माझे त्यांच्यासमवेतचे पहिलेच वर्ष होतं. दिंडीत खूप ज्येष्ठ वारकरी होते. दिवसभराच्या वाटचालीत एका वयोवृद्ध वारकरी आजोबांनी ‘म्हणा माऊली! ” म्हणत माझ्याकडे वाटचालीत अभंग म्हणायची सूचना केली! मला बोलू ऐसे बोले…. हा अभंग तोंडपाठ होताच… मात्र चाल? चाल रेकॉर्डवरची म्हणजे ध्वनीमुद्रीकेवरची…. छोटा गंधर्व यांनी गायलेला हा अभंग. मी माझ्या आवाजात बोलू ऐसे बोले…. अशी सुरुवात करतात….. मृदुंगावर थाप टाकण्याच्या तयारीत असलेले पखवाजे आणि सोबतचे टाळकरी एकदम थांबले आणि त्यांनी सर्वांनी माझ्याकडे नाराजीनेच कटाक्ष टाकले… मी गोंधळून गेलो!

विणेक-याच्या सोबतीने चालणा-या त्या आजोबांच्या चेह-यावर तर नाराजी अगदी उठून दिसली. “वारकरी चालीत म्हणा, महाराज! ” त्यांनी कडक शब्दांत आदेश दिला. आणि मी थबकलेलो पाहताच त्यांनी स्वत:च सुरुवात केली… बोलू ऐसे बोले… हां… बोलू ऐसे बोले… जेणे बोले विठ्ठल डोले… जेणे बोले विठ्ठल डोले!

चालता चालता टाळाच्या तालावर सहज गाता येणारी चाल. उच्चार स्पष्ट आणि नेमके. त्यामुळे अर्थही मनापर्यंत पोहोचतो…. आजोबांनीच चरणापर्यंत अभंग म्हटला… आणि म्हणाले… आता लावा तुमची शास्त्रीय चाल…… मी मला येते ती साधी चाल लावली…. सर्व सत्ता आली हाता… नामयाचा खेचर दाता! आणि आजोबांच्या मुखावर आनंद परतून आला! तेंव्हा समजलं… वारीत वाट चाल करताना वारकरी, नियमित चालीत अभंग गायचे असतात… येथे शास्त्रीय किंवा प्रथितयश गायकांनी गायलेल्या रचना गाऊन उपयोग नाही! कारण हे चालता चालता गायचे शब्द असतात.

असाच एक नवखा वारकरी कुणाचे तरी भक्तीगीत गाऊ लागला तेंव्हाही आजोबांनी त्याला रोखले. म्हणाले…. संतांचे अभंग म्हणा…. महाराज. हजारो आहेत. आपल्या तुकोबारायांचे तर चार हजार आहेत… कोणताही म्हणा! तेंव्हा समजले की वारीत केवळ संतांचेच शब्द गायचे असतात.

संत त्यांच्या रचनांच्या अखेरीस त्यांची नाममुद्रा गुंफीत असत… जसे एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रावर आपण स्वाक्षरी करतो, शिक्का उठवतो, तसे. उदाहरणार्थ….. तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे… इत्यादी. संतांना त्यांच्या काव्य रचनेत स्वत:चे नाव हवे असायचे, प्रसिद्धी हवी असायची म्हणून ते असा नामोल्लेख करीत असत, हा काही सुशिक्षित लोकांचा (गैर)समज आहे! त्याकाळी copy right विषय नव्हता. तरीही काही नतद्र्ष्ट माणसं स्वत:च्या रचना प्रसिद्ध संतांच्या नावाने खपवीत…. त्या रचनांना क्षेपक अभंग अशी संज्ञा आहे. अभ्यासू वारकरी, भजनकरी संतांचा मूळचा आणि इतरांनी घुसवलेला क्षेपक अभंग अचूक ओळखतात! त्यामुळे वारीत तरी केवळ अधिकृत संत अभंगच गावेत, असा दंडक असतो.

आमच्या दिंडीत चालणा-या त्या आजोबांना संपूर्ण भजनी मालिका, हरिपाठ, गाथा, नाथ महाराजांचा गाथा यांतील जवळजवळ सर्वच अभंग तोंडपाठ होते. विशेषत: तुकोबारायांचा गाथा त्यांना मुखोद्गत होता. दिंडीत कुणी गाताना एखादा शब्द चुकला की ते लगेच दुरुस्ती सांगत. विशेषत: शेवटच्या चरणात, म्हणजे हा अभंग कुणी लिहिला आहे त्या नावाचा उल्लेख करताना अनेकवेळा गफलती होत असतात! पण हे आजोबा म्हणजे आमचे चालते बोलते encyclopaedia होते!

हे आजोबा अत्यंत काटेकोर दिनचर्या पाळीत. दिंडीत सर्वांच्या आधी म्हणजे चार-सव्वाचार वाजता उठून आन्हिके आटोपित आणि तंबूमध्येच एका कोप-यात त्यांची पूजेची पेटी उघडून बसत. पत्र्याच्या त्या छोट्याशा पेटीत त्यांचे सर्व पूजासाहित्य असे. गंध, गंधगुळी, उद्बत्ती, काडेपेटी, छोटा हरिपाठ, विठोबा रखुमाईची कागदी तसबीर इत्यादी. मुखाने हरी हरी म्हणत त्यांची पूजा चाले…. सर्वांगावर गंध लेपन करीत. अंगावर गणवेश तर नेमून दिलेलाच असे…. पांढरे धोतर, पैरण, पटका… कपाळी गंध! बाकीची दिंडी उठून तयारीला लागेपर्यंत आजोबा महाराजांच्या रथासमोर जाऊन उभेही रहात. आणि पालखी रथ विसाव्याला थांबल्याशिवाय खाली बसत नसत. दिवसभर अभंग गाताना कधी थकलेले त्यांना पाहिले नाही. रात्री दिंडी मुक्कामावर पोहोचल्यावर रात्रीचा भजन जागर सुरु होई… त्यात आजोबा उशीरपर्यंत भजने गात. इथं कळलं… त्यांना उत्तम पेटी वाजवता येते. आवाजात माधुर्य नसलं, रागदारीचं फारसं ज्ञान नसलं तरी मनातले भाव आणि पाठांतर अप्रतिम होतं…. कित्येक वर्षांचा परिपाठ असावा!

आजोबा जातिवंत शेतकरी. त्याच्या खुणा त्यांच्या अंगभर दिसून येत. रापलेला रंग, भेगा पडलेले तळपाय, कपाळावर पसरलेलं आठ्यांचं जाळं… आणि विझत चाललेलं डोळे. कुणीतरी केंव्हातरी नंबरचा चष्मा दिलेला असावा… तुटलेला चष्मा… त्याच्या काड्यांना दोरा बांधून काम चालवलेलं. भजनी मालिकेच्या पुस्तकात कधी वाचायचा प्रसंग येत नसे… कारण बहुतेक सर्वच पाठ होतं… पण आपला असावा म्हणून डोळ्यांवर चष्मा असे. पूर्वी कारभारीण आणि ते असे दोघे वारी करीत. काही वर्षांपूर्वी त्या निवर्तल्या. मग आजोबांनी महिन्याची वारी धरली. म्हणजे दर महिन्याला देहू-आळंदी ते पंढरपूर अशी वारी. जमली तशी पायी केली आणि थकले तेंव्हा मिळेल त्या वाहनाने. विशेषत: बार्शी लाईट रेल्वे आवडीची आणि सोयीची!

आजोबांनी आपल्या दिंडीत यावे, असा सर्वच दिंडीचालकांचा प्रयत्न असे. पण आजोबांनी आपली एकच दिंडी धरून ठेवली होती. त्यांच्याकडून कोणी भिशी अर्थात दिंडीचा खर्च म्हणून पैसे घेत नसत… कारण दिंडीमध्ये वाटचालीचे अभंग म्हणायची जबाबदारी, शिस्त पाळायची जबाबदारी त्यांच्यावरच असे. ते सुद्धा एखाद्या सैन्याधिका-याने आपले सैन्यदल दिमाखात, शिस्तीत चालवावे, तशी दिंडी चालवीत!

द्वादशीचा उपवास सोडून दिंडीकरी लगबगीने, घराच्या ओढीने परतत… आजोब मात्र पुढील चातुर्मास पंढरीतच मुक्कामी राहण्यासाठी मागे रहात….. नेमाचे, निष्ठावंत वारकरी. जोडोनिया धन.. उत्तम व्यवहारे वेच करून संसारिक जबाबदा-या पार पाडून आयुष्याच्या संध्याकाळी हरी हरी करीत काळ व्यतीत करणारे संतांचे लाडके सेवक!

एका वर्षी ते दिंडीत दिसले नाहीत….. त्यांच्या नातवाने एका मुक्कामावर त्यांच्या स्मरणार्थ दिंडीला पंगत दिली तेंव्हा समजले…. ते मागील महिन्यात वैकुंठवासी झाले! असे वारकरी हे वारीचे वैभव असतात… त्यांचे दर्शन घडले, सहवास लाभला हे भाग्यच म्हणायचं…. रामकृष्णहरी!

– लेख क्र. ४ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted