श्री संदीप काळे
☆ “‘नाझ’ आहे तुझ्यावर !” ☆ श्री संदीप काळे ☆
मी जयपूरच्या विमानतळावर उतरलो. एरवी सरफरोश, कच्चे धागे अशा चित्रपटांतून पाहिलेल्या राजस्थानच्या भूमीवर मी आज पहिल्यांदाच पाऊल ठेवले. अनेक शूरवीरांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक ठरलेल्या, ‘त्या’ भूमीवर पाय ठेवताक्षणी मी त्या भूमीला वंदन केले. विमानतळावर मला घेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोपाल गुप्ता आणि त्यांची सर्व टीम हार-तुऱ्यांसह आली होती. हॉटेलवर पोहचण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले. तेवढ्या रात्री उद्या जयपुरात होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनाच्या तयारीची बैठक घेण्यासाठी सर्व सहकारी तयार होते. बैठक झाली. अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी गेल्यावर मी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचा एक वाजला होता.
उद्याच्या कार्यक्रमाचे चिंतन करत मी अंथरुणावर पडलो होतो, पण झोप काही लागेना. मी सकाळी सातपासून एवढी पळापळ केली तरी, झोप का लागत नाही? याचा विचार मी करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की मुंबईत डॉ. मीना जोशीकाकू धर्माबाद येथून आल्या होत्या. त्यांच्या गडबडीत व्यंकटेश जोशीकाका यांनी मला जेवूच घातले नाही. मी त्यांच्यासोबतच फिरत होतो. मुंबईच्या हॉटेल वेलकमपासून ते जयपूरमधल्या हॉटेलपर्यंतचा माझा प्रवास कमालीचा पळापळीचा होता. मी हॉटेलच्या रिशेप्शनचा फोन डायल केला. त्यांना जेवणाविषयी बोललो. त्यांनी मला सांगितले, किचन अकरा वाजताच बंद झाले आहे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. मी जेवणासाठी ऑनलाईन पार्सल मागविले. खाली काऊंटरवर आलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिले, तर जोरदार पाऊस चालू होता. रस्त्याने गुडघाभर पाणी वाहत होते. अर्ध्या तासाने, तेवढ्या पावसातही माझे पार्सल आले.
पार्सल देणाऱ्या व्यक्तीने मला पार्सल दिले. पाऊस केव्हा कमी होईल, याची तो माणूस वाट पाहत होता. इतक्यात हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या माणसाला जाग आली आणि तो पार्सल आणलेल्या व्यक्तीला पाहत म्हणाला, ‘अरे ‘नाझ’, तू अजून घरी गेला नाहीस का? अजून इथेच कसा?’
त्याने सांगितले, ‘नाही, निघालो होतो. येथे असलेल्या साहेबांची ऑर्डर होती. होम डिलेव्हरी देणारी मुले घरी गेली होती. त्यामुळे मलाच यावे लागले. आता पार्सल देऊन घरी निघावे म्हटले, तर जोरदार पाऊस सुरू झाला’. अचानक लाईट गेली. साफसफाई करणाऱ्या माणसाने मेणबत्ती लावली. आम्ही तिघेजण त्या मेणबत्तीच्या उजेडात बसलो. पाऊस काही थांबत नव्हता. लाईट कधी येणार आहे, हे माहिती नव्हते. मी तिथेच जेवणाचे पार्सल उघडले आणि जेवायला सुरुवात केली. त्या दोघांनाही मी जेवण्यासाठी आग्रह करीत होतो. पण ते दोघेही जेवत नव्हते. मी जेवत जेवत बोलायला सुरुवात केली.
‘नाझ’ हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खूप सुंदर नाव आहे. ‘आमच्याकडे मुलाचे नाव लहानपणी मुलाची आत्या ठेवते. तुमच्यामध्ये कोण ठेवते?’ असे मी त्या पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला विचारले. त्यावर हॉटेलमध्ये सफाई करणारा आणि ‘नाझ’ दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्यांनी मला ऊत्तर दिलेच नाही. आमचे बोलणे चालूच होते. बोलण्यातून एकएक करून अनेक विषय समोर येत होते. माझ्यासमोर बसलेले ते दोघेजण हातचे राखून बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून एक विषय पुढे आला, तो म्हणजे राजस्थानात गरिबी एवढी चिकटली आहे की, त्यातून बाहेर पडणे पिढ्यानपिढ्या शक्य नाही. तोच सफाई करणाऱ्या सोयबला कुणीतरी आवाज दिला, म्हणून तो बाहेर गेला. त्यानंतर मी आणि ‘नाझ’ बोलत बसलो. ‘नाझ’ हे कमालीचे वेगळेपण असलेले व्यक्तिमत्त्व होते. कसली सामाजिक आणि आर्थिक चिंता नाही. तो बिनधास्त जगतोय, अगदी जगाची पर्वा न करता! अनेकांना सोबत घेऊन.
मी जयपूरच्या मयूर हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलपासून अगदी जवळच नाझ राहतोय. तिथे त्याचे आणि त्याच्या मित्राचे एक छोटेसे हॉटेल आहे. जयपूरमध्ये लहानाचे मोठे होताना ‘नाझ’ने जे भोगले होते, ते खरे तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असेच होते. पण त्यातून तो एवढा आनंदी आणि समाधानी आहे की, त्याच्यासारख्या अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे.
‘नाझ’ची कहाणी सुरू होते, एका अशा गल्लीत, जिथे जाणे म्हणजे सामाजिक स्वास्थ्याच्या विरुद्ध मानले जाते. ‘नाझ’ची आई सुलताना देहविक्रीचे काम करायची. जेव्हा ‘नाझ’चा जन्म झाला, तेव्हा सुलताना हिने ठरवले की, आता हा व्यवसाय सोडून आपण दूर कुठे तरी नव्याने आयुष्य सुरू करायचे. ‘ती’ त्या दलदलीतून बाहेर पडली. तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. सुलताना हिने कधीही ‘नाझ’च्या बाबतीत कुणालाही खोटे सांगितले नाही. पण त्याचे परिणाम ‘नाझ’ला भोगावे लागले. ‘नाझ’ त्यातून बरेच काही शिकला.
तो माझ्याशी बोलताना म्हणाला, ‘मला बाप नाही, हे माझ्या आसपास असलेल्या लोकांना खूप खटकते. मला बाप नाही, मी बिनबापाचा जन्मलो, हा विषय ते सतत काढत असतात. मला जे विचारतात, त्यांच्या आयुष्याकडे जेव्हा मी बारकाईने पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की, त्या व्यक्तीचे आणि त्याच्या वडिलांचे आयुष्यभर कधीच पटले नाही. अनेकांना वडील आहेत, पण त्यांनी त्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. अनेकांना वडील असून ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. अनेकांना वडील आहेत, पण ते त्यांच्याशी बोलत नाहीत. दुरावा आणि दुरावा हे त्या अनेक मुलांना जसे लागू होते, तसे बापांनाही लागू होते. वडील आणि मुलगा, मुलगा आणि वडील या दोघांमधले नाते किती ठिकाणी चांगले राहते? ते कसे वाईट आहे? याचे अनेक दाखले मला ‘नाझ’ने दिले.
‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही ज्या मुस्लिम गल्लीत राहत होतो, तिथे मी लहान असताना सर्व मित्र मला ‘ये नाझयज औलाँद है’ म्हणून चिडवायचे. मी माझ्या ओळखीच्या मौलवींकडे याबाबत तक्रार केली. त्यावर मौलवी मला हसून म्हणाले, ‘तू नशीबवान आहेस. तुझ्यामुळे कुणाला तरी असुरी आनंद घेता येतो. हे चांगले आहे. तूही सर्वांना सांग, अगदी अभिमानाने, माझे नाव ‘नाझ’ आहे. ‘नाझ’ म्हणजे अभिमान, ‘नाझ’ म्हणजे आपलेपण. अरे, या जगात कुणी बिनबापाचा नसतो. सर्वांचा बाप अल्लाह आहे. कुणीही येथे पोरका नाही’.
मौलवीच्या सांगण्यानंतर माझ्याआधी माझ्या मित्रांनी माझे नाव सगळ्या गल्लीला सांगितले. माझ्या अगोदर माझे नवे नाव कुणीतरी अम्माला जाऊन सांगितले.
‘नाझायज’चा ‘नाझ’ आता सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. ‘नाझ’ने स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. तिथे अनेक माणसे काम करतात. ‘नाझ’ आणि मौलवी यांच्यातील नाते आता खूप छान झाले होते. मौलवींच्या मदतीने ‘नाझ’ने अम्मासह अनेकांच्या मदतीने ‘नाझ’सारखी असलेली अनेक मुले शोधून काढली. त्यांचे समुपदेशन करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्या सर्व मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून आलेले अनुभव आणि मिळालेले नाव यावर ‘नाझ’ माझ्याशी खूप भरभरून बोलत होता. ‘नाझ’ची पत्नी रेश्मा ‘सलोखा’ नावाची सामाजिक संस्था चालवते. ‘नाझ’चे सामाजिक काम पाहून रेश्मा ‘नाझ’सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. या दोघांना रुक्साना, सरिता आणि विजयमाला अशा तीन मुली आहेत. त्या तिन्ही मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांचा प्रथम येण्याचा क्रम दरवर्षी ठरलेला असतो.
मी ‘नाझ’ ला म्हणालो, ‘ही नावे अशी वेगवगेळी का ठेवली?’
‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही अशी नावे मुद्दामच ठेवली आहेत. मी आणि रेश्माने कधी आपला धर्म एकमेकांवर लादला नाही’.
आम्ही गप्पांमध्ये एवढे रमलो की, बाहेर पावसाची रिपरिप थांबली, हे आमच्या लक्षातच आले नाही. ‘नाझ’ बाहेर गेला. त्याने पाहिले की आता पाऊस थांबला आहे. ‘मी निघतो’ म्हणत ‘नाझ’ निघाला. नेमकेच जेवण झाले आहे. चला शतपावली करू, या उद्देशाने मीही ‘नाझ’सोबत बाहेर पडलो.
‘नाझ’ने बॅग गाडीला अडकवली आणि आम्ही जयपूरच्या ‘त्या’ रस्त्याने गपा मारत फिरत होतो. मध्येमध्ये आकाशातून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. आकाशातले ते पाणी जेवढे स्वच्छ होते, तेवढीच ‘नाझ’ची इमानदारी, वर्तन आणि माणुसकी स्वच्छ होती. मेहनतीतून कमवायचे, निराधार मुलांना रस्ता दाखवायचा, कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे, लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घ्यायचा, सामाजिक ‘सलोख्या’साठी प्रयत्न करायचे, असे अनेक उपक्रम ‘नाझ’ आणि त्यांच्या पत्नी रेश्मा दोघे मिळून चालवत होते.
मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘आता रात्र खूप झाली आहे. आपण परत हॉटेलच्या दिशेने निघूया’. त्यावर ‘नाझ’ विनंती करत म्हणाला, ‘साहेब, अगदी बाजूलाच माझे घर आहे. आपण पाच मिनिटांसाठी आलात, तर बरे होईल’.
मी होकारार्थी मान हलवली. आम्ही ‘नाझ’च्या घरी गेलो. आम्ही घरी येतोय हे ‘नाझ’ने अगोदरच घरी सांगितले होते. ‘नाझ’च्या आईने दरवाजा उघडला. ‘नाझ’ची रेशमाही आमची वाट पाहत होती. छोटेसे, पण अत्यंत नीटनेटके घर. त्या घरात मंदिर आणि मज्जितमधील ‘देवपण’ समसमान दिसत होते. ‘नाझ’, ‘नाझ’ची आई सुलताना, ‘नाझ’ची पत्नी रेश्मा यांच्यासोबत माझ्या खूप गप्पा झाल्या.
सुलताना म्हणाल्या, ‘माझ्या मुलाने, माझ्यामुळे खूप भोगले आहे. त्यातून तो आता सावरला आहे. ज्याचा त्याला त्रास व्हायचा, राग येत होता, त्यातून त्याने सावरून मौलवीच्या मदतीने खूप मोठे काम उभे केले. ‘नाझ’ लहान असताना मुले त्याला चिडवायची, तू ‘नाझायज औलाद हैं’ असे म्हणायची. त्यावर ‘नाझ’ घरात येऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायचा. मी त्याला समजून सांगायची. त्यावर तो ओरडून मला विचारायचा, ‘खरं सांग, माझा बाप कोण आहे?’
तो जसाजसा मोठा गेला, तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली’. ‘नाझ’कडे पाहत सुलताना म्हणाली, ‘माझ्या ‘नाझ’चा मला अभिमान आहे. ‘नाझ’ने कित्येकांच्या आयुष्यात सोनेरी सामाजिक पहाट आणून दिली.
‘नाझ’च्या गालावरून हात फिरवत सुलतान म्हणाली, ‘बेटा, काळजी घे स्वतःची. खूप पळापळ करतोस तू. मुली मोठ्या होत आहेत त्यांची काळजी घे. किती डोळे खोल गेलेत तुझे’ असे म्हणताना सुलतानाच्या डोळ्यांत पाणी आले. सुलतानाने ‘नाझ’ला जवळH’b घेतले. ‘नाझ’ सुलतानाच्या मांडीवर झोपी गेला. सुलताना ‘नाझ’ला थोपटत होती. सुलतानाआईच्या प्रेमाला कोणत्या शब्दांत बांधावे, असे मला झाले होते.
रेश्मा म्हणाली, ‘या जगात असे अनेक ‘नाझ’आहेत, ज्यांना रस्ता दाखवण्याची गरज आहे. नाहीतर ते व्यसनाला जवळ करतात. दरवर्षी एकट्या राजस्थानमध्ये असे ‘नाझ’ वीस हजारापेक्षा जास्त सापडतात. हाच आकडा देशभरात दहा पट आहे. जगभरातल्या ‘नाझ’चा विचार केला, तर अशा ‘नाझ’ची एक मोठी जमात तयार होऊ शकते. यातली साठ टक्क्यांहून अधिक माणसे लोकांच्या बोलण्यामुळे जगणे सोडून देतात आणि उर्वरित चाळीस टक्के लोकांच्या बोलण्याला घाबरून जीव मुठीत धरून जगतात’.
मी घड्याळाकडे पाहिले. रात्र आता संपण्याकडे झुकली होती. मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘चला ‘नाझ’कुमार, निघावे लागेल मला. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीत आहात. माझी आई फारच लांब आहे’.
त्यावर दुसऱ्या बाजूने मला सुलताना आईने पकडले आणि मांडीवर झोपवले. सुलताना मला म्हणाली, ‘बाळा, आई शोधा, म्हणजे सहज सापडेल’.
तो क्षण कमालीचा भावनिक होता. मी ‘नाझ’च्या घरातून बाहेर पडलो. सोबत ‘नाझ’ही होता. ‘नाझ’ मला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आला. त्याची गाडी घेऊन तो परत घरी गेला. त्या हॉटेलमध्ये अजून लाईट आली नव्हती. मी विचार करीत होतो, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या ‘नाझ’ला हाच समाज पूर्वी नावे ठेवत होता. आता हाच समाज ‘नाझ’चा उदो उदो करतो. या समाजाचे खरे रूप काम करणाऱ्या, वेगळेपण जपणाऱ्या, सामाजिक प्रवाहात असणाऱ्या माणसाला कधी दिसले नाही. उलट या टीका करणाऱ्या, बेसुमार वागणाऱ्या माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे चांगली माणसे अजून चांगले काम करीत असतील, जसा ‘नाझ’ करतो. सामाजिक स्वास्थ्य ‘यांनी’ बिघडवले, असा ज्यांच्यावर बेसुरी सामाजिक शिक्का बसला, पण त्यांनी सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थाने सुधारले, असे अनेक ‘नाझ’ आपल्या अवतीभोवती आहेत. त्या ‘नाझ’ला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून मदत करणे गरजेचे आहे, बरोबर ना? करणार ना तुम्ही मदत?
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





