श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ पालकत्व अपग्रेड व्हायला हवं… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
पालक मित्रांनो, नमनाला पळीभरसुद्धा तेल न घालता थेट मुद्द्याचं बोलूया..
आपली मुलं कॉलेजमध्ये, कोचिंग क्लासेस मध्ये नेमकी कुणाच्या सहवासात असतात याची व्यवस्थित आणि खरी माहिती दोन्ही पालकांना (आई आणि वडील दोघांनाही) असणं नितांत आवश्यक आहे. दोघांपैकी एकाच कुणालातरी माहिती असणं पुरेसं नाही. दोन्ही पालकांची आपल्या मुलांविषयीची मतं, दृष्टिकोन वेगवेगळी असतात, त्यामुळं अर्थातच मुलांच्या कोणत्या वागण्यात कुणाला गैर वाटेल आणि कुणाला गैर वाटणार नाही याची काय खात्री?
आपली मुलं शिक्षण किंवा नोकरी निमित्तानं परगावी राहत असतील तर, ती नेमकी कुठं राहतात, कुणासोबत राहतात, त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत, हे मित्र मैत्रिणी काय काय करतात, त्यांचे पालक कुठे राहतात याची खरीखुरी माहिती पालकांना असायलाच हवी.
आपला मुलगा किंवा मुलगी फावल्या वेळात नेमकं काय करतात, सोशल मीडिया वर नेमकं काय करतात, कशी व्यक्त होतात, कुणाला फॉलो करतात, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मते काय आहेत, स्वतःचे मत असण्याएवढी आणि ते चारचौघात किंवा सोशल मीडियावर व्यक्त करण्याएवढी परिपक्वता त्यांच्यात आली आहे का, याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.
आपल्या मुलामुलींवर नेमका कुणाचा प्रभाव आहे? हा प्रभाव अचानक निर्माण झाला आहे का? अचानकच आपल्या मुलाचे किंवा मुलीचे विचार बदलले आहेत का? आपल्या मुलांची भाषा अचानकच विखारी झाली आहे का? आपली मुलं अचानकच जास्तीत जास्त वेळ नव्याने झालेल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवायला लागली आहेत का? ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला लागली आहेत का? त्यांच्याकडे आपल्या माहिती व्यतिरिक्त वेगळे सिम कार्ड, वेगळा लॅपटॉप किंवा वेगळे सोशल मीडिया अकाऊंट आहे का? याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.
त्यातल्या त्यात आपली मुलं कलेची आवड, मीडियाची आवड, नाटकात काम करण्याची आवड, क्रिएटिव्ह रायटिंग ची आवड, मोठं मित्रमंडळ, सोशल मीडियावर भरपूर कनेक्शन्स, हजारो पेजेस फॉलो करत राहणं, सतत ऑनलाईन असणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा, ‘माय लाईफ माय रुल्स’ असा नियम सतत बोलून दाखवणं, कोणत्याही प्रश्नांची धड उत्तरं न देणं अशा वर्तन प्रकारातली असतील तर… पालक मित्रांनो, मुलांपेक्षा आपणच जास्त सावध व्हा.. कारण, या प्रकारच्या मुलांवरच कुणाचं तरी जास्त लक्ष असण्याची शक्यता आहे.
नाकासमोर सरळ चालणाऱ्या, आपल्या करिअरवर अत्यंत क्लिअर फोकस असणाऱ्या, जिवाचं रान करुन अभ्यास करणाऱ्या मुलांकडे कुणी बघणार नाही. कारण, त्यांचा बुद्धिभेद करणं फार कठीण असतं. आपल्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या सहवासात रमणाऱ्या, सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होणाऱ्या, सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसणाऱ्या मुलामुलींकडे कुणी बघणार नाही. पण कौटुंबिक मतभेदांमुळे त्रासलेल्या, पालकांशी न पटणाऱ्या, कष्ट, परिश्रम, अभ्यास यांवर विश्वास नसणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत वादाचे मुद्दे काढून भांडणाऱ्या, वाद घालणाऱ्या, कुठं काय बोलावं याचा अजिबात पाचपोच नसणाऱ्या मुलामुलींकडे मात्र आता विशेष लक्ष दिलं जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यांच्या याच वागण्याचं राजकीय भांडवल करण्याचे प्रयत्न होतील.
‘आम्हाला कुणी समजूनच घेत नाहीय’, असं आपली मुलं मुली सतत म्हणतात का? पालक म्हणून आपण जे वागतो, त्यातलं काहीच आपल्या मुलामुलींना पटत नाही का? आमच्यावर अन्याय होतोय असं आपली मुलंमुली सतत बोलत राहतात का? असं असेल तर हीच मुलं मुली भविष्यात रडारवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या मुलामुलींना त्यांच्या मनातलं सगळं ऐकून घेणारा कुणी गुड लिसनर हवाय का? आणि कुणी त्यांना “आम्हीच तुमचे गुड लिसनर आहोत” असं ठासून पटवण्याचा प्रयत्न करतंय का? जर असं असेल तर आपल्या मुलामुलींच्या याच अस्वस्थ, अशांत मनस्थितीचा गैरफायदा कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०२६ मध्येच २०२९ च्या निवडणुकांविषयी पत्रकार प्रश्न विचारायला लागले आहेत. अनेक विचारवंत “देशाचे निर्णय संसदेत नाही तर रस्त्यांवर व्हायला हवेत” असं स्पष्ट म्हणत आहेत.
कुणीतरी इतक्यातच भारताला “मनहूस देश” म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणून झालेलं सगळ्या देशानं पाहिलेलं ऐकलेलं आहे. त्यांना “घटिया प्रधानमंत्री” म्हणून झालेलं आहे. “त्यांना मूलबाळ, संसार नाही, त्यामुळं त्यांना तरुणांची मनं कळणार नाहीत” हेही बोलून झालं आहे. एकूण काय तर, तुमचं भवितव्य चांगलं नाही आणि त्याला कारण देशातला सत्ताधारी पक्ष आहे, असं तरुणांच्या मनांवर नव्हे तर, बुद्धीवर बिंबवण्याची सुरुवात झाली आहे. तरुण पिढीला रस्त्यांवर आणून सरकारवर दबाव टाकून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे प्रयत्न मोठ्या ताकदीनं सुरु झाले आहेत.
आता पालकांना असं वाटेल की, यात आमचा आणि आमच्या मुलांचा काय संबंध? आम्हाला तर आमच्या मुलांबद्दल पूर्ण खात्री आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण, इथेच तर पूर्ण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्या मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या फावल्या वेळेचा, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांच्या मतं व्यक्त करण्याच्या पद्धतीचा अन्य कुणीही गैरफायदा घेता कामा नये. त्यांना अन्य कुणीही वापरुन घेता कामा नये.
आपणच आपल्या मुलांशी चांगला, मनमोकळा सहज संवाद वाढवणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलांचे गुड लिसनर व्हायला हवं. वात्रटपणा आणि वाह्यातपणा यांच्यात फरक असतो. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी मांडण्याची सुद्धा एक वेगळी योग्य पद्धत असते, हे मुलांना सांगायला, शिकवायला नको का?
देशातली कायदे व्यवस्था आपल्या मुलामुलींच्या पूर्ण परिचयाची नाही. सोशल मीडिया संदर्भातले कायदे मुलामुलींना अद्यापही ठाऊक नाहीत. हक्क आणि स्वातंत्र्याची घोषणाबाजी करणं फार सोपं आहे, पण कायद्याच्या चौकटीत न वागण्याचे फटके आपल्या मुलामुलींनी सोसावेत, इतकी त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता आहे का? अगदी स्वच्छ सांगायचं तर – अजिबात नाही.
आपल्यापैकी बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमधल्या मुलामुलींना स्वतःचं बरं वाईट नीट कळतं का? स्पष्ट सांगायचं तर – नाही. मग “कुणीही यावं आणि टिकली लावून जावं” इतकं आपल्या मुलांचं आयुष्य वाऱ्यावर सुटलेलं आहे का? नाही ना..
आंदोलन करताना ब्रिटिशांची लाठी खाऊन हुतात्मा झालेल्या लाला लजपतराय यांचं नाव आजचे सो कॉल्ड जेन झी आंदोलक घेतही नाहीत आणि ह्यांचे तथाकथित नेते स्वतःसुद्धा अंगाला झळ बसवून घेत नाहीत. पण ह्यांच्या बोलण्याला भुललेल्या मुलामुलींना कायदा हातात घेतल्यामुळं पोलिसांचा प्रसाद खावा लागला आहे. दोन तीन तास एअर कंडिशनर नसेल तर उन्हानं चक्कर येऊन पडणारे लोक अख्खा देश बदलण्याची वल्गना करतात, तेव्हा त्यावर हसू सुद्धा येत नाही, फक्त कीव येते.
देश बदलण्यासाठी कुणीकुणी आयुष्यं झिजवली आहेत, हे आपल्या मुलांना माहिती तरी आहे का? त्यांना बाबू गेनू, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस ही मंडळी ठाऊक नाहीत. अमरेंद्रनाथ चटर्जी, अतुलकृष्ण घोष, भूपेंद्रनाथ दत्त, धनसिंग गुर्जर, राणी कित्तूर चन्नम्मा, मदनलाल धिंग्रा, राजा नाहर सिंह, सांगोली रायण्णा, वेलू नचियार, यातली किती नावं आपल्याला किंवा आपल्या मुलांना ठाऊक आहेत?
‘देश बदलण्यासाठी ऐंशी-नव्वद तास काम करायला हवं’ असं नारायण मूर्ती म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. ‘पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलूया’ असं दिलीप कुलकर्णी म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला अक्षयकुमारने दिला की, आपल्याला ते नको वाटतं. वयाच्या ९३ व्या वर्षी सुद्धा एकदम खणखणीत प्रकृती असणारे, रोजच्या रोज दणकून व्यायाम करणारे मधुकर तळवलकर आपण आपल्या मुलांना दाखवतो का? रघुनाथ माशेलकरांनी देश बदलण्यासाठी पन्नास वर्षांहून जास्त काळ स्वतःला झोकून दिलं, त्यांची गाथा आपण आपल्या मुलांना सांगतो का? अमेरिकेनं स्वतःच्या नावावर करुन घेतलेलं हळदीचं पेटंट पुन्हा भारताकडे आणण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले, हे नव्या पिढीला आपण सांगतो का? पर्यावरणाच्या जतन, संवर्धनासाठी आजही रोज मातीत अक्षरशः घाम गाळणारे जुन्नरचे रमेश खरमाळे सरकारवर टीका करत बसण्यापेक्षा स्वतःपासून बदलाची सुरुवात करणं जास्त योग्य मानतात. त्यांचा आदर्श घ्यावा, असं आपण आपल्या मुलांना सांगतो का?
म्हणजे, देशात ज्या उत्तम गोष्टी घडतायत, त्यांची चर्चाच आपल्या घरात होत नाही. आपण आपल्या मुलांशी अशा विषयांवर बोलतच नाही. “आम्हाला वेळ नसतो आणि मुलांनाही वेळ नसतो” हे वाक्य आता पर्मनंटली डिलिट करुन टाका. आईवडील हे फक्त पैसे आणि सोयी पुरविण्यासाठीच असतात, हे तत्त्वज्ञान तद्दन बिनडोकपणाचं आहे.
पोलिसांचे फोन येणं, आपल्याला किंवा मुलांना पोलिस चौकीत बोलावलं जाणं आणि तिथं आपल्याला मुलांच्या अनेक दिव्य कृत्यांचे साक्षात्कार होणं, हे आपण निगेटिव्ह मार्कांनी नापास होण्याचं लक्षण असतं. मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष किंवा अज्ञान या कॅटेगरी मधून तात्काळ बाहेर पडा. आणि सकारात्मक गोष्टी आवर्जून शोधून काढा. त्याची चर्चा सुरु करा, वाढवा.
आपल्या मुलांच्या मनात नेमकं काय खदखदतंय याचा शोध घेणं, हे पालकांचंच मूळ काम आहे. आणि त्यांच्या पोटातली खदखद त्यांचीच आहे की कुणा दुसऱ्याचाच पोटशूळ ह्यांनी आपल्याला लावून घेतला आहे, याचाही शोध घ्यायला हवा. कुणाच्या तरी स्वार्थाची मळमळ आपल्या घरात कशासाठी हवी? त्यासाठी आपल्याला आपल्या देशानं आजवर काय काय दिलं, हेही पालकांनी आठवून पहावं. त्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी नक्की सापडतील. आणि त्याचबरोबर आणखीही एक आत्मपरीक्षण करावं – ‘मी इतकी वर्षं या देशात नांदतो आहे. मी माझ्या देशासाठी आजवर काय काय केलं? देशासाठी किती वेळ दिला? काय काय त्याग केला? देशासाठी किती झिजलो? ‘ देशासाठी वेळ, बुद्धी द्यायला हवी, हे मुलांना शिकवलं का?
देशाची सेवा करण्याचे, देशाला मोठं करण्याचे आणि देशातल्या त्रुटी सुधारण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. रतन टाटांचा मार्ग, रघुनाथ माशेलकरांचा मार्ग, सुधा मूर्तींचा मार्ग, आनंद देशपांडेंचा मार्ग, अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत. यांच्यापैकी कुणीही गैरसमज, पूर्वग्रह यांचं माध्यम वापरलं नाही. तरुणांना उलटे सल्ले दिले नाहीत. सरकारी किंवा राष्ट्रीय साधन संपत्तीचा गैरवापर केला नाही आणि नुकसानही होऊ दिलं नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे.
वेळ हातात असणं, हीच अनेकदा फार मोठी शक्ती असते. वेळ निघून गेली आणि नंतर योग्य-अयोग्यतेची जाणीव झाली तरी उपयोग नसतो. ११ वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी पेनाचं निब बदलण्यासाठी ज्या मुलाच्या खिशात २५ पैसे नव्हते, त्याच मुलानं ५०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणारी कंपनी उभी केली, ते पद्मश्री अशोक खाडे आपल्या देशानं पाहिले आहेत आणि देशात आंतरराष्ट्रीय परिषद सुरु असताना, हजारो परदेशी उद्योजकांच्या कार्यक्रमात कपडे काढून धिंगाणा घालणारे तरुणही आपल्या देशानं पाहिले आहेत. जे आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणत आहेत, त्यांनी या तरुणांना कुठलीच विशेषणे लावली नाहीत, हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
आता पालकांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा काय तर, आपण त्या कपडे काढून उघडा नागडा गोंधळ घालणाऱ्या तरुणांना विसरलो असू, पण कायदा त्यांना विसरत नाही. कोणत्याही समाज विघातक किंवा अयोग्य कृतीसाठी आपलं नाव रेकॉर्डला लागलं की, त्या नावाचा विसर कायद्याला आणि न्याय व्यवस्थेला काही केल्या पडत नाही. कायद्याची स्मरणशक्ती फार विलक्षण. त्यामुळं, आपल्या देशातल्या कायदे व्यवस्थेच्या क्षमतेची परीक्षा आपणही घेऊ नये आणि आपल्या मुलांनाही घेऊ देऊ नये. आपल्या मुलामुलींनी अजाणतेपणी काहीतरी करुन कायद्याच्या कात्रीत अडकण्यापेक्षा आपणच आपलं पालकत्व अपग्रेड करुन हा धोका टाळूया ना..!
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






