सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३००
☆ कविता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
ही कोण सखी ,
सारखी माझ्या मागे मागे येते….
हलकेच करांगुली धरूनी,
मज त्या वाटेवर नेते,
*
त्या वाटेवरले काटे,
पावलांवर काढती नक्षी,
घोटाळती अवती भवती,
शब्दांचे मंजुळ पक्षी,
*
मी एकटीच असते तेव्हा,
ही असते माझ्या संगे,
मैफलीत वा एकांती
संवाद तिच्याशी रंगे
*
मी टाळाया बघते पण,
ती सोडत मजला नाही
ही अवखळ,हट्टी पोर
लावते जीवाला घोर,
*
प्रतिबिंब माझे तिच्यात,
डोळ्यातील बाहुली माझ्या,
सोडून दूर ना जाई
तिजवीण सुचेना काही…
*
अंधा-या रातीलाही
करते जी माझी सोबत,
ती सावलीच माझी
प्रतिभेच्या गावामधली !!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





