सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ “जन्म” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा
*
दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर
*
दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला
*
नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना
*
जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस
*
भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता
*
संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस?
*
मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?
*
वर बसून छानपैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा
*
माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
तू जवळ असल्याची फक्त
पटवून देत जा साक्ष……
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





