सौ. शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “राम कसे दिसतात??…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
एक दिवस एक दांपत्य आपल्या १० वर्षांच्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेले. त्यांनी फाईल डॉक्टरांच्या टेबलावर ठेवली. डॉक्टरांनी फाईल पाहिली आणि मुलाची तपासणी केली. मग डॉक्टर म्हणाले,
“बाळा, तू थोडा बाहेर बस, मी तुझ्या आई–वडिलांशी बोलतो. ”
आई–वडील म्हणाले, “साहेब, त्याला सगळं माहित आहे, तुम्ही आमच्याशी चर्चा त्याच्यासमोर करू शकता. ”
डॉक्टर थोडे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले,
“मी पहिल्यांदाच असं कुटुंब पाहतोय ज्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही. ”
ते म्हणाले, “साहेब, सुरुवातीला आम्हीही खूप घाबरलो होतो, पण हळूहळू देवावरच्या विश्वासाने आमचं मनोबल वाढलं. ”
डॉक्टर म्हणाले, “बाळाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. प्रकरण गंभीर आहे. ५०-५० टक्के शक्यता आहे. यशस्वी झालं तर आयुष्यभर हृदयाचं दुखणं राहणार नाही, आणि जर नाही झालं तर…”
आई–वडील म्हणाले, “मग तुम्हीच सांगा आम्ही काय करू? ”
डॉक्टर म्हणाले, “माझ्या मते मरत–मरत जगण्यापेक्षा एकदा धोका पत्करलेला बरा. ”
ते तयार झाले.
जेव्हा त्यांनी डॉक्टरांची फी विचारली, तेव्हा डॉक्टर म्हणाले,
“साधारणपणे मी अॅडव्हान्स घेतो, पण तुमच्या केस मध्ये ऑपरेशननंतर बघू. ” आणि तारीख दिली.
ऑपरेशनच्या दिवशी सगळे वेळेवर पोहोचले. कोणाच्याही चेहऱ्यावर भीती नव्हती. वातावरण शांत होतं.
बाळाला ऑपरेशन टेबलवर झोपवलं. भूल देण्यापूर्वी डॉक्टरांनी विचारलं,
“बाळा, तुझं नाव काय? ”
बाळ हसून म्हणालं, “आनंद. ”
डॉक्टर हसून म्हणाले, “बाळा, तुझ्या नावासारखाच तू नेहमी आनंदी राहा. काही सांगायचं आहे का ऑपरेशनच्या आधी? ”
बाळ म्हणालं, “साहेब, हे हृदय म्हणजे काय असतं? ”
डॉक्टर म्हणाले, “बाळा, हृदय म्हणजे काळीज, ज्याची आज आपण शस्त्रक्रिया करणार आहोत. ”
बाळ म्हणालं, “साहेब, आई–बाबा नेहमी म्हणतात की प्रत्येक माणसाच्या हृदयात राम राहतात.
जेव्हा तुम्ही माझं काळीज उघडाल, तेव्हा जरा बघा ना, माझ्या आतले राम कसे आहेत, आणि मला सांगाल का ते कसे दिसतात? ”
डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं. संपूर्ण स्टाफ भावुक झाला.
डॉक्टर म्हणाले, “हजारो ऑपरेशन मी केले आहेत, पण आज हात थरथरत आहेत. ”
त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली —
“आजपर्यंत मी प्रत्येक ऑपरेशन व्यवसाय म्हणून केलाय,
पण आज हे श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे.
मी फक्त शस्त्रक्रिया करतोय,
पण खरा सर्जन तू आहेस, देवा.
ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ दे. ”
ऑपरेशन सुरू झालं. सर्व काही नीट चाललं होतं. पण अचानक बाळाचा रक्तदाब कमी होऊ लागला, शरीर थंड झालं… आणि काही क्षणांत सगळं शांत झालं.
डॉक्टरांच्या डोळ्यांतून अश्रू आले —
“हे देवा, तू जिंकलास, मी हरलो…”
ते हात धुवायला गेले. तेव्हाच त्यांना बाळाचे शब्द आठवले —
“जेव्हा माझं हृदय उघडाल, तेव्हा बघा ना, राम कसे आहेत…”
डॉक्टरांनी झटपट बाळाच्या हृदयाकडे पाहिले आणि जोरात म्हणाले —
“राम दिसतायत का तुला? ”
इतकं म्हणताच एक चमत्कार झाला —
बाळाचं हृदय पुन्हा धडधडू लागलं!
संपूर्ण टीम आनंदाने ओरडली —
“जय श्री राम! ”
ऑपरेशन यशस्वी झालं. बाळ वाचलं.
डॉक्टरांनी फी घेतली नाही आणि म्हणाले —
“हजारो ऑपरेशन केले,
पण कधी विचारच केला नाही की राम कुठे आहेत…
आज या बाळाने मला दाखवून दिलं की राम आपल्या हृदयातच आहेत. ”
जेव्हा आपण आपल्या बुद्धीचे दरवाजे बंद करतो,
तेव्हा देव आपले दरवाजे उघडतो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





