सौ. प्रज्ञा गाडेकर

? वाचताना वेचलेले ?

⭐ एक दिवस असाही… – कवी : श्री शिरीष मोराणकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

*

एक दिवस असाही

उनाड होऊन उजाडावा

सकाळ दुपार संध्याकाळचा

कुठलाच मेळ नसावा

*

घड्याळाच्या गजराचीही

कट्टी तेव्हा असावी

कितीही वाजले तरी

चादरीची घडी नसावी

*

तास मिनीट सेकंदाशी

कुठलाही मेळ नसावा

उगवणारा प्रत्येक क्षण

आळसावलेलाच असावा

*

घरभर सारा पसारा

मस्तपैकी पसरावा

घडीविनाच वाचलेला

पेपर समोर असावा

*

स्नानाआधीच पदयात्रा

कोपऱ्यापर्यंत घडावी

झणझणीत मिसळ

येताना उदरी रिचवावी

*

न कळवताच ऑफीसला

सरळ दांडी मारावी

बाॅसच्या चेहऱ्यावर

खुश्शाल फुली मारावी

*

घरच्याच कपड्यांमधे मग

बाईकवरून भटकावं

गावाबाहेरच्या धाब्यावर

पोटभर हादडावं

*

जमलंच तर मित्रांसोबत

दोन घटका बसावं

एखादा रमीचा डाव टाकून

गप्पांमधे डुबकावं

*

रोजच्या सगळ्या चिंतांना

एक दिवस विसरावं

कानात वारा गेलेल्या वासरागत

हवं तसं हुंदडावं

*

रोजच्या आखीव रुटीनचं

रेखीव वळण विसरावं

एक दिवस उनाड होऊन

जगण्याचं टाॅनिक मिळवावं

कवी: श्री शिरीष मोराणकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments