श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “निदान एक तरी झाड…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते…
*
आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी…
*
“का रे बाबा? ” विचारले तर म्हणाला,
“भाड्याने मिळेल का एखादे झाड
घरटे बांधण्यासाठी?
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी
पिल्लांसाठी…
*
तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तीत…
*
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी…
*
पोटाला हवेच, खातो ती भीक
अन् नेतो थोडे घरी,
खायला तर हवंच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी…
*
कधीकधी वाटते करावी आत्महत्या
बसून विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर…
*
जसे मग आत्महत्येनंतर
सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला? “
*
ऐकून मी चक्रावलो, खरंच
एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला…
*
मी हात जोडून म्हटले,
“त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको
खरंच मनापासून सांगतो…
*
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा… “
*
तो म्हणाला, “खूप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार? “,
“रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार… “
*
तो म्हणाला, “मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांचं काय? ,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय…? “
*
“अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी… “
*
ऐकून तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी…
*
त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचून तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड…
निदान एक तरी झाड!
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






