श्री मंगेश जांबोटकर
वाचताना वेचलेले
☆ पोस्टकार्ड… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
☆
पाकिटाविना, गोंदाविना,
उघड्यावरचा श्वास होता…
पिवळ्याधमक पोस्टकार्डावर
माणसांचा विश्वास होता!
मोजक्या चार शब्दांमधे
काळजी थेट पोहोचायची,
‘प्रिय आई‘ वाचताना
पोस्टमनचीही मान डोलायची.
ना कुठला पासवर्ड होता,
ना कसला एन्क्रिप्शनचा खेळ,
उघड्या पत्रात गुंफलेला
हृदयाचा अन् भावनांचा मेळ.
आज अंगठ्याच्या टोकावर
सुरक्षेची हजारो कुलुपं आहेत,
पण मनात मात्र भीतीचे
भसाडे साचलेले ढग आहेत.
तेव्हा पत्र उघडे असायचे,
कारण माणसे बंद नव्हती…
अन् उघड्यावरच्या माणसांची
नाती कधीच तुटत नव्हती!
माहिती लपवण्याच्या या शर्यतीत
आपण माणुसकी हरवून बसलो,
किंमत वाढली तंत्रज्ञानाची,
पण मूल्यांनी मात्र भिकेला लागलो.
खरंच… ‘जुने ते सोने‘ फक्त म्हणीत उरले नाही,
त्या उघड्या पोस्टकार्डासारखे निर्मळ प्रेम
आता कुठेच उरले नाही!
☆ ☆ ☆ ☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







क्या बात है.
अज्ञात कवीवराला नमन.
प्रस्तुतकर्त्याचे अभिनंदन.