डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
“निष्पाप तारुण्य ही एक अमूल्य संपत्ती आहे, जी तथाकथित सुखाच्या क्षणिक उत्साहासाठी वाया घालवू नये”— महात्मा गांधी
या लेखाच्या संदर्भात तरुण म्हणजे नुसताच मनाने तरुण नव्हे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार हे वय १५ ते २४ वर्षे आहे, मात्र भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा धोरणानुसार ते १५ ते २९ वर्षे आहे. हे वय लक्षात घेता तरुणाची शारीरिक क्षमता अत्यंत उर्जावान असते. त्याच्या डोळ्यात जग बदलण्याची स्वप्ने तरळत असतात तर रगारगात चैतन्याचे रक्त उसळत असते. हि अशी आग आहे जिला योग्य दिशेच्या अग्निकुंडात ठेवणे आवश्यक आहे नाही तर ती, जग जाळून टाकेल. समाज तरुण पिढीकडे मोठ्या आशेने बघत असतो कारण आजचा तरुण हा देशाचे भविष्य नव्हे तर वर्तमान आहे. “
आजची युवा पिढी ही आपल्या देशाची संपत्ती आहे. तिचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे कालच्या पिढीचे परम कर्तव्य आहे. कुठल्याही तरुणाच्या जीवनात सर्वाधिक प्रभाव पडतो तो त्याच्या कुटुंबाचा! , याव्यतिरिक्त शेजारी, समाज, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, शासकीय व्यवस्था, राजकारणी हे या ना त्या कारणाने त्याला प्रभावित करतात. मात्र मी म्हणेन की याहूनही त्याचे जीवन ढवळून टाकणारी अधिक प्रभावशाली आहेत ती समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे. नेटफ्लिक्स पासून तर हॉटस्टारपर्यंत समाजमाध्यमांतून तरुणांसाठी करमणुकीचे दरवाजे सताड उघडे आहेत. गुगल गुरुजी, ए आयचे अलाउद्दीनच्या शक्तिशाली जिन्नसारखे सेवक त्यांच्या चरणी बारा महिने आणि तिन्ही त्रिकाळ सेवेसाठी सज्ज आहेत. या स्वप्ननगरीच्या अतिविशाल फुग्यात आजचा तरुण आरामात विहार करतोय. तेच त्याचे जग आहे. या आभासी जगात तो किती वेळ वाया घालवतो त्याचे मोजमाप करायला देखील त्याला वेळ नाही. हळू हळू हेच आभासी जग त्याचे सर्वस्व होऊन बसते. त्यातील समृद्ध नायक नायिका, त्यांचे अनिर्बंध विचार, श्रीमंत जीवन पद्धती आणि स्वैराचार हेच त्याला सामान्य वाटू लागते. मंडळी बहुतांश तरुणांना अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांतील जीवनाची भुरळ पडलेली असते ती याच माध्यमस्नेही प्रवृत्तीमुळे. त्यातूनच निर्माण होते ती मदिरा आणि मदिराक्षीची वासना, सोबतीला अभिनव आणि अनवट अनुभव देणारे ड्रग्स. रेव्ह पार्ट्या तर श्रीमंत तरुणांचा जिव्हाळ्याचा विषय. सिगारेट आणि दारू तर सर्वमान्य आणि सामान्य जनांसाठी असल्याने ड्रग्सच्या रूपाने त्या पुढील पायरी गाठणे हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे प्रदर्शन असते. यासाठी प्रतिष्ठा हेच एक कारण नसून इतर करणे देखील आहेत.
- स्वतःच्या आणि पालकांच्या अपेक्षेनुसार शैक्षणिक प्रगती न होणे
- गरिबीमुळे हवे ते शिक्षण घेता न येणे
- पेपरफुटीसारख्या समस्या आणि शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार
- शिक्षणाअभावी किंवा योग्य शिक्षण झाल्यावरही बेरोजगारीचा सामना करावा लागणे
- व्यवसाय किंवा नोकरीत वरिष्ठांशी न पटणे
- कामाचा योग्य तो मोबदला न मिळणे किंवा त्याची वरिष्ठांकडून दाखल घेतल्या न जाणे
- प्रेमभंग
- कौटुंबिक कलह आणि कुटुंबातील व्यसनाधीनता
- समाजात प्रतिष्ठा न मिळणे
वरील कारणांमुळे आजचा तरुण तणावाखाली आणि नैराश्याने ग्रस्त असू शकतो. अशा वेळी कधीतरी मनाच्या कमकुवत अवस्थेत तो व्यसनांच्या आहारी जातो. आपण याच व्यसनाधीनतेविषयी आणि त्यापासून मुक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. तरुण अंमली पदार्थांचे सेवन कान करीत आहेत? मंडळी, एरवी माणसाच्या विविध व्याधींकरिता अनुकूल अशा कांही औषधांपैकी कांही मोजकी औषधे रोगांविरुद्ध लढण्याऐवजी स्वतःच अतिभयानक रोगाचे कारण बनतात. तेव्हां या अमृतवेलीची माणसाला कशी अन केव्हां आपला गुलाम बनवणारी विषवल्ली होते हे त्याचे त्यालाच कळत नाही. कळते तेव्हां तो मृत्यूच्या पाशात अडकलेला असतो. हे असे कां आणि कसे होते?
वैद्यकीय व्याख्येनुसार ड्रग अर्थात औषध म्हणजे असा कोणताही रासायनिक पदार्थ, जो आपल्या सामान्य किंवा विकृत शारीरिक प्रक्रियेत बदल करतो. उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे रसायन ‘औषधी तत्व’ आहे. मात्र औषध कंपन्यांसाठी ते निव्वळ एक ‘प्रॉडक्ट’ अर्थात उत्पादन आहे. त्यापलीकडेही ‘ड्रग’ या शब्दाचा विस्तारित अर्थ ‘रंग माझा वेगळा’ असा प्रतिध्वनित होतो. समाजासाठी व्यावहारिकरित्या ड्रग म्हणजे व्यसनाधीनता निर्माण करणारे घातक रसायन असते हे सर्वांनी लक्षात असू द्यावे. एकाच रसायनाकरता आपण दोन नावे वापरतो, ड्रग आणि मेडिसिन. या दोहोंतला मूलभूत फरक त्यांच्या वापरातील हेतूचा आहे. डॉक्टर पेशंटला ‘मेडिसिन’ देतांना त्यांचा एकमेव उद्देश रुग्णाला बरे करण्याचा असतो. डॉक्टरांना अर्थातच त्या औषधाचे डोस आणि साईड इफेक्टचे परिपूर्ण ज्ञान असणे अपेक्षित असते.
ऍडिक्शन अथवा अंमली पदार्थांचे सेवन हा एक रोग आहे. यात व्यक्ती मेंदूला घातक उत्तेजना देणारे ड्रग वारंवार वापरते. इथे तीन कळीचे मुद्दे आहेत.
- त्या व्यक्तीचे एकमेव उद्दिष्ट असते, ड्रग घेत राहणे. त्याला त्या ड्रगचा इतका पराकोटीचा हव्यास असतो की, ‘हवास मज तू, हवास तू’ या विचाराने वेडे होत ते कुठूनही अन कसेही मिळवण्यासाठी तो जिवाचे रान करतो, (भीक मागणे किंवा लाचार होऊन गयावया करणे अथवा चोरी करणे यापैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करणे)! आईजवळ हे (अजाण? ? ) लेकरू वाढीव अधिक पॉकेटमनीचा हट्ट करते, तर कधी जवळच्या मित्राकडे दोस्तीचा हवाला देत उधार मागते, हे उपाय अयशस्वी झाल्यावर बिनदिक्कतपणे घरातील पैसे चोरते! या आगंतुक रसायनाविषयी इतकी लालसा का? कारण त्याला वाटत असते, “हे ड्रग मिळाले नाही तर मी मरून जाईन”.
- कांही दिवसांनी या रासायनिक तत्वाचे त्याचे आवडते परिणाम त्या डोसने येईनासे होतात. मग त्या ड्रगचे तथाकथित ‘गोड’ परिणाम अनुभवण्यासाठी तो स्वतःच निष्णात डॉक्टरचा आव आणत ड्रगचा डोस वाढवत राहतो. मी या तथाकथित ग्वाड परिणामांची फक्त काही उदाहरणे सांगते, मूड मध्ये येणे, परमानंदाचा अनुभव, भ्रम, नसलेली गोष्ट दिसणे किंवा ऐकू येणे, (ध्वनी दिसणे आणि प्रकाश ऐकू येणे) आणि या सर्वांवर वरताण म्हणजे सर्वात आकर्षक अशी जगप्रसिद्ध ‘किक’!
- अशा व्यक्तीने ड्रग घेणे थांबवले तर गंभीर विथड्रॉव्हल सिंड्रोम (ड्रगपासून वंचित राहण्याचे भयंकर परिणाम अर्थात विरहवेदना) दिसून येतो. यात अस्वस्थपणा, नैराश्य, निद्रानाश, फिट्स येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात तसेच एखाद्या वेळेस मृत्यू देखील होऊ शकतो.
व्यसनाधीनता निर्माण करणारी काही औषधे ही वनस्पतींपासून निर्मित आहेत. उदाहरण द्यायचे तर तंबाखू, अफू, कोकेन इत्यादी घटक सामाजिक संस्कृतीचा भाग म्हणून सामूहिकरीत्या सेवन करण्याची प्रथा बरीच जुनी आहे. आपण म्हणतो ना, देव सोमरसपान करतात, ते बहुधा ‘दैवी मद्य’ असावे. अफूच्या पार्ट्यांची तर लेखी नोंदच उपलब्ध आहे. मागील शतकात अशा पार्ट्यांची आमंत्रणे राजरोस छापली जात होती. अफू आणि मद्य हे ५००० वर्षे किंवा त्याहून आधीपासून प्रचलित असावे. हे ड्रग नैसर्गिक अवस्थेत अशुद्ध रूपात असत. त्यांचे वाईट प्रभाव पण त्या मानाने कमीच असत. पण जेव्हां अफूच्या स्रोतातून आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेतून मॉर्फिनसारखे शुद्ध औषध निर्माण केल्या गेले तेव्हा त्याचे चांगले अन वाईट दोन्ही परिणाम तीव्र होते. वैज्ञानिकांनी त्याचे रासायनिक अपत्य शोधले हेरॉइन, सुपर ऍडिक्शन निर्माण करणारे ड्रग. म्हणजेच अवगुणांत बाप से बेटा सवाई! अशी अनेक नवनव्या उचापती करणारी संयोगक्रियेद्वारा प्रयोगशाळेत निर्मित कृत्रिम ड्रगस युवा पिढीला आपला विषाक्त विळखा घालण्यास सज्ज आहेत. हे प्रयोगशाळेतून निघालेले शुद्ध सिंथेटिक ड्रगस खूप विषारी असतात आणि व्यसनी माणसाचा जीव देखील घेऊ शकतात.
धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आणि दारू पिणे हा अनेक लोकांच्या वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक जीवनाचा देखील एक अविभाज्य भाग झालेला आहे. माझ्या मते या सर्व व्यसनांचे मूळ कारण आहे त्यांना मिळालेली अवास्तव सामाजिक मान्यता, प्रतिष्ठा आणि स्टेटस सिम्बॉलचे अग्रमानांकित स्थान. अशा अमली पदार्थांचे व्यसन कुठल्याही दृष्टिकोनातून बघावे! शरीर, मन, कुटुंब आणि समाज यांच्याकरता हे व्यसन पूर्णपणे हानिकारक आहे हेच मुळी समाज मान्य करीत नाही. सेलिब्रिटीजचा वरदहस्त असल्यामुळे त्याला लाभलेल्या ग्लॅमरचे वलय तर अनुकरणप्रिय युवा पिढीकरता आणखीच वाईट! यात पहिल्या प्रेमासारखी पहिली सिगारेट, दारूचा पहिला पेग आणि कोकेनचा पहिला झुरका या ‘प्रथम तुज पाहता’ सारखी जी अवस्था होते तिच्यातून बाहेर येणे कठीण. दुर्दैवाने ही पहिली पायरी दाखवणारे कधी कधी पालक, कुटुंबातील अन्य सदस्य, नातेवाईक किंवा जवळचे मित्र असतात. एकदा का ही पहिली पायरी ओलांडली की मग त्या माणसाला कुठे थांबावे हेच कळत नाही. याशिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत केलेले अपराध आणि लैंगिक गुन्हे घडतात ते वेगळेच. आजकाल रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आपण बघतो. यातून स्वतःला वाचवायचे तर या ड्रगच्या पहिल्या डोसलाच नाकारणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. राम गणेश गडकरींचे ‘एकच प्याला’ हे १९१२ सालचे आशयघन नाटक दुर्दैवाने आजच्या घटकेला तितकेच प्रभावी आणि समयोचित वाटते.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






