image_print

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस पर विशेष  आलेख  “मी मराठी बोलतेय…”)

 ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष –  मी मराठी बोलतेय…☆

 

“होय.. तुमची माय मराठीच बोलतेय! सर्व प्रथम माझ्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व सान थोर सुपुत्रांना अनेकानेक शुभाशिर्वाद. आज विष्णू वामन शिरवाडकर  उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या दिवशी मला राजभाषा म्हणून माझा गौरव दिन साजरा करण्यात येतो आहे हे पाहून मन भरून आलय. मित्र हो,  आज मला बोलायचय.!”

“महानुभाव पंथीय काळापासून आपण माझा प्रचार प्रसार करीत आला आहात.  अकराव्या शतकापासून मी तुम्हाला  आणि तुम्ही मला समृद्ध करीत  आलो आहोत. गुरू बंधू निवृत्ती नाथ यांच्या कृपाशार्वादाने संत  ज्ञानेश्वरांनी *भावार्थ दीपिका* लिहिली आणि माझे विकास पर्व सुरू झाले.”

ग्रामीण संस्कृती परंपरा,  उत्सव, रिती रिवाज,  बालसाहित्य,  लोकसाहित्य,  लोककला सारं काही मौखिक स्वरूपात घराघरातून ऐकू यायचं. अभंग, भूपाळी, भजन, कीर्तन,  ओवी, कीर्तन, भारूड तमाशा ही सारी माझी संवाद माध्यमे. . . ! संत कवी, पंत कवी, तंत कवी यांनी मला लेखनातून शारदीय सारस्वतात मानाचं स्थान दिलं.  छंदोबद्ध रचनांनी, ललित  अलंकारिक, वैचारीक, गूढ,  आणि वैज्ञानिक साहित्याने माझं अंतःकरण समृद्ध केले. मला  एका पिढीतून दुसर्‍या पिढी कडे सन्मानाने पोहोचवले. माय भाषा, मायबोली म्हणून माझा सन्मान केला. !”

“कौतुकाचे गोडवे पुस्तक पोथ्या पुराणात बंदिस्त झाले आणि दैनंदिन व्यवहारात मात्र माझे स्वरूप संमिश्र, धेडगुजरी, झाले.  अनेक भाषा भगिनी  एकत्र येऊन माझ्या  आश्रयाने स्वतःची पथारी पसरू लागल्या. मराठी शाळेचे भवितव्य धोक्यात आले आणि मग मात्र मला माझ्या  अस्तित्वाची चिंता वाटू लागली.”

“बकुळीच्या फुलाप्रमाणे दरवळणारी मी (मराठी) आतल्या आत घुसमटत राहू लागले. *वाचन संस्कृतीचा -हास* हे नवे संकट समोर  उभे ठाकले.  ओवी ज्ञानेशाची,  गाथा तुकोबांची माझे शब्द   पूर्णब्रम्ह,  करणारी असली तरी संत परंपरा,  आणि  प्रबोधन काळ मागे पडला. प्रबोधन  आणि वैचारिक साहित्य पुस्तकात बंदिस्त झाले. नाही म्हणायला संतकवी,  पंतकवी, यांनी संस्कारांचा पारीजात रूजविला. त्याची पाळेमुळे,  अभिजात साहित्याकडे झेपावली.”

“कधी भक्ती, कधी शक्ती, कधी सृजन मातीत

नृत्य, नाट्य, कला, क्रीडा, यातून माझा प्रवास सुरू होता. नवरस,अलंकार,वृत्त छंद,साज हे सारं पुढच्या पिढीत पोहचत नाही ही खंत मनाला जाचत आहे

आजही अय्या,ईश्य,उच्चाराला, अन्य भाषेत तितका प्रभावशाली प्रती शब्द आलेला नाही!”.

“माझ्या लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक, लोककलावंतानी माझा   कला संस्कृती वारसा आजही जोपासला आहे. त्याचा मला अभिमान आहे शाहीरांच्या पोवाड्यात,माझा आरसा दिसतो आहे!”

“मला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी माझे   काही सुपुत्र अत्यंत निष्ठेने प्रयत्न करत आहेत. भाषा हे संवाद माध्यम  असले वैचारिकता, सृजनशीलता आणि संशोधन संक्रमित करण्यात तीचा वाटा नेहमीच महत्त्व पूर्ण राहिला आहे.  भाषा सक्ती पेक्षा भाषेची  आसक्ती निर्माण होईल  असे  उपक्रम,  असे संस्कार लेकरांनो आपण पुढच्या पिढीवर करू शकलात तर मला कोणताच धोका नाही.”

“गौरव दिन हा शब्द समारंभा पुरता असू नये, त्यातील मतितार्थ प्रत्येकाच्या बोलीभाषेत व्यक्त झाला तरी, तुमची मायबोली म्हणून मिरवल्याचे, माझ्या वैभवशाली परंपरेचे सार्थक होईल, असे मला वाटते. लेकरांनो मला कुणाला दोष द्यायचा नाही पण  .. . *तुझी आई फाटकी साडी नसते* हा आरोप विनाकारण सहन करू नका. तुमच्या वैचारिक संपन्नतेत मी आलंकृत आहे.  लेकरांनो स्वतः मोठे होताना  इतरांना मोठे करायला विसरू नका.  बंदिस्त साहित्य नव्या पिढीला वाचायला द्या. माणसाने माणसाला वाचू देत. माणूस माणसाला वाचायला शिकला ना की त्याची मायबोली पण सालंकृत झालीच समजा. !”

“शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, संगणकीय तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी मला तुमची साथ द्यायला आवडेल. कुणी कसा, किती, केव्हा आणि  कधी माझा वापर करायचा हे मात्र लेकरांनो सर्वस्वी तुमच्याच हातात आहे.  *ज्ञानार्जन* *ज्ञानदान* आणि *नव निर्मिती* यात माझे पाऊल कधीही मागे नव्हते, मागे नाही आणि मागे नसेल याची खात्री बाळगा. मी तुमची आहे  आणि तुम्ही माझे  आहात याची जाणीव सदैव  असू देत.”

“अच्छा .. चला निरोप घेते. या निमित्ताने मन मोकळे झाले. जय हिंद. जय महाराष्ट्र !”

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments