श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणींच्या पोतडीतून☆ श्री जगदीश काबरे ☆

अवैज्ञानिक मते लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी १९४२ हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्यूदिन.

हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरे तर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नातील फरक असा की जनसामान्य आयुष्याच्या रेटय़ात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात. तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो. पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.

अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. *‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आणि विश्वाचे संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे, ’’* असे हॉकिंग म्हणत.

याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण व तर्क. या दोघांच्या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे, ’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments