गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे… – लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
डॉ. विवेक आणि डॉ. सीमा रेडकर
आजोळ, दिलासा, विसावा…
डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर या दाम्पत्यास आज लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा व त्यांच्या मोठ्या समाजकार्याचा छोटासा आढावा.
आज सानेगुरुजी असते तर त्यांनी लिहिले असते,
करी जतन जो वृद्धांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे.
कारण वृद्ध ही आज एक टाकाऊ चीझ झाली आहे. सिंधुदुर्गचे एक डॉक्टर दाम्पत्य आपला वेळ धन देऊन त्यांच्यासाठी सेवा उभ्या करतात हे समाजाला व डॉक्टर लोकांना दिशादर्शक आहे.
लहान मुलांना कोणीही उचलून घ्यायला तयार असतो. पण वृद्ध मात्र कोणाला नको असतात. सिंधुदुर्ग मधील वृद्ध लोकांची संख्या वाढते आहेत. काही जणांना मुले नाहीत तर ज्यांना मुले आहेत ती बाहेर आहेत. अशा वृद्धांची काळजी घ्यायचे मालवणच्या डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर यांच्या मनात आले. वृद्धाश्रम नाही तर माणूस रिटायर झाल्यावर कसे जगावे अशी संस्था काढायचे त्यांनी ठरवले. ही संकल्पना कै दिलीप लाड यांची व आजोळ हे नाव ठेवले डॉ सीमा रेडकर यांनी.
आजोळ म्हणजे आजी आजोबांचे घर. या प्रकल्पात जे जे नेरुरकर व इतर लोकांचाही मोठा हातभार लागला.
आजोळ नेरूर, ता. कुडाळ इथे 25 मे 2011 ला चालू झाले आणि तेथील उत्तम काळजीमुळे वृद्धांचे आयुष्य वाढू लागले. आयुष्य वाढल्याने त्यांना वृद्धपणातील अनेक आजार होऊ लागले. मग या शारीरिक व मानसिक आजाराची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेचा जन्म झाला व रेडकर रिसर्च संस्थेने दिलासाची स्थापना रेडी इथे केली.
येथील काम पाहून आरवली येथील शेट्ये ट्रस्टने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कक्ष व कॉन्फरन्स हॉल दिला.
येथील वृद्धांची सेवा सुरेशजी झांट्ये व त्यांच्या ट्रस्टने पाहिली. अशा लोकांसाठी प्रशस्त व सर्व सोयीने युक्त हॉस्पिटल असावे ते त्यांचे मत होते. त्यांनी रमाबाई नारायण प्रभू झांट्ये ट्रस्ट मार्फत विसावा नावाची छान वस्तू रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला चालवण्यासाठी सुपूर्द केली.
इथे तीन भाग आहेत. पहिला भाग अल्पकाळाने आजारी असणाऱ्या वृद्ध रुग्णांसाठी. इथे पेशन्ट 8 ते 10 दिवस ठेवून बरे करून घरी पाठवले जातात. मोतीबिंदू, संधिवात, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा आजारांची तपासणी होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होते. पर्यटनाचा आनंद लुटला लुटता ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेह या प्राणघातक आजारांचा चेकअप एकाच वेळी करता येतो, अशी अत्याधुनिक यंत्रणा रेडी या खेड्यात उपलब्ध आहे. त्याला होलटर मॉनिटरिंग, ambulatory ब्लडप्रेशर मॉनिटरिंग व continuous ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतात.
इथे तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला दिसेल की विसावा व दिलासा या रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या शाखा वार्धक्याने थकलेल्या वृद्धांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सक्षम स्टाफ आहे, उत्तम स्वच्छता आहे, मनोरंजन, योगसाधना यांची सोय आहे. शारीरिक परिस्थितीमुळे विकल झालेले वृद्ध खाटेवरून खाली पडू नयेत म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला लावतो तशा पट्ट्या त्यांच्या खाटेला लावल्या आहेत, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दिसतील.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व ना नफा ना तोटा तत्वावर चालू आहे. या ट्रस्टच्या संचालकांना कोणतेही मानधन याबाबत मिळत नाही.
ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना सरकारी दवाखान्यात पाठवायचे नाही पण फाईव्ह स्टार वृद्धाश्रम हॉस्पिटलही परवडणारे नाही, अशा दारिद्रय रेषेजवळ घुटमळणाऱ्या खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीयांसाठी या विसावा व दिलासा यांची गरज आहे.
रेडकर ट्रस्ट तर्फे इथे सरकारमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स घेण्यात येतो. आतापर्यंत रेडी पंचक्रोशीतील 180 हुन अनेक मुली 10 वि, 12 वि होऊन नन्तर इथे सिस्टर झाल्या आहेत व त्यांना जॉब मिळाला आहे.
**
डॉ विवेक रेडकर हे सिंधुदुर्ग मधील पहिले MD मेडिसिन डॉक्टर. त्यांची जडणघडण सामाजिक बांधिलकी असणारे त्यांचे आईवडील यांच्यामुळे झाली. त्यांचे वडिल एकनाथ रेडकर यांनी मिठबाव डी एड कॉलेज, कसाल व वेतोरे हायस्कूल इथे झोकून देऊन योगदान दिले. आई सुशीला रेडकर हिंदी शिक्षिका कन्या शाळा मालवण येथे होत्या.
निवृत्ती नंतर दोघांनी रेडी इथे खाण मालकांविरोधात न्यायाचा लढाही दिला.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च संस्था 14/12/2005 ला स्थापन झाली असून मालवण, रेडी व धारगळ गोवा इथे सेवा देत असून हल्लीच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून असे ते कोकणातील एकमेव केंद्र आहे.
वैद्यकीय संशोधन हे डॉ विवेक रेडकर सरांची पॅशन असून त्यांनी 21 पेक्षा जास्त शोधनिबंध अमेरिका, युरोप अशा चौदा देशात सादर केले आहेत. हत्तीपाय या रोगावर त्यांनी मालवण शहरात राबवलेली मोहीम सर्वश्रुत आहे तसेच हल्लीच केलेले कोविड काळातील मिथिलीन ब्लुवरील संशोधन सुद्धा प्रसिध्द व सर्वमान्य झाले आहे.
हीच संशोधनाची आवड त्यांचा मुलगा डॉ सागर व सून डॉ सुप्रिया यांच्यात उतरली असून कोविडच्या covaxin या लसीवरील संशोधनासाठी देशातील फक्त दहा हॉस्पिटलची निवड केली होती त्यात एक होते धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटल. ती अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संशोधनात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला त्यामुळेच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळायला सोपे झाले.
रेडकर रिसर्च सेंटर लहान मुलांचा मधुमेह तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यावरही मोलाचे काम करत आहे. शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीतुन त्यांनी 170 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील डॉक्टर लोकांच्या सहकार्याने मोफत केल्या आहेत.
सरांच्या दोन्ही बहिणी अलका नारकर व संगीता तोरकर शिक्षिका म्हणून रिटायर होऊन आता सामाजीक कार्याला वाहून घेतले आहे व आपल्या बंधूंना मदत करत आहेत.
**
कुठे गाजावाजा प्रसिद्धी न करता सिंधुदुर्ग मधील एक डॉक्टर दाम्पत्य आयुष्याच्या संध्याकाळी थकलेल्या वृद्ध लोकांची सेवा करत आहे. बरेच जण आपल्या घरातील वृद्धांना धड बघत नाहीत, तर इथे दुसऱ्यांच्या घरातील वृद्धांची सेवा केली जात आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.
आम्ही सिंधुदुर्गचे डॉक्टर या सामाजिक भान बाळगणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला मानवंदना देतो. खूप शुभेच्छा.
लेखक : डॉ सतीश सदाशिव पवार,
कणकवली
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





