श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
इंद्रधनुष्य
☆ “वर्गणी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
मागच्या वर्षीची गोष्ट.
“गुंफा” सोसायटीतल्या गणपतीचं पहिलं वर्ष.
‘सार्थ’ गणपती.
प्रथमेश मोने.
राहणार A- 5, गुंफा सोसायटी, पुणे 29.
‘सार्थ गणपती’ हे नाव सुद्धा त्यानंच सुचवलेलं.
सार्वजनिक गणपतीला, तसा फारसा काही ‘अर्थ’ राहिला नव्हता.
निदान “गुंफा” मधला गणेशोत्सव तरी ‘अर्थ’पूर्ण असावा..
प्रथमेशला असं दिलसे वाटायचं.
म्हणून ‘सार्थ’ गणपती.
प्रथमेश नुकताच नोकरीला लागला होता तेव्हा.
सीओईपीवाला.
कॅम्पसमधनं सिलेक्ट झालेला.
पंधरा लाखाचं पॅकेज.
‘गणपतीबाप्पा’ प्रथमेशचा आवडता बाप्पा.
पहिला पगार झाला.
ठरवून ‘ऊडवला’.
सगळ्यांना वाटण्यातच संपवला.
आबा, आजी, आई, बाबा, दादा, काका, काकू, आत्या, मावशी, शिक्षक, चुलत-आते- मावस भावंड, मैत्रगण..
ईस्त्रीवाला, पेपरवाला, भाजीवाला, वाॅचमनकाका…
प्रथमेश पंधरा दिवस नुसत्या गिफ्ट वाटत होता.
” आपली माणसं “.
प्रथमेशचं मनापासून कौतुक करणारी.
आयुष्यभर प्रथमेशला सतत काहीतरी देणारी.
इटस् युवर टर्न, प्रथमेश…
सगळ्यांना मनापासून गिफ्टस् द्यायच्या.
पाया पडायचं.
आशीर्वाद घ्यायचे.
आनंदाचे डोही आनंद तरंग.
आमचा प्रथमेश दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेला.
दुसर्या महिन्याचा पगार झाला.
घरी त्याच्या पगारावर काहीही अवलंबून नव्हतंच.
दोन तीन महिन्यानंतर, प्रथमेश फ्लॅट बुक करणार होता.
जस्ट ईनव्हेस्टमेंट म्हणून.
मग जरा पगाराला कात्री लागणार होती.
तोवर जियो जी भरके..
पंधरा दिवसांवर गणपती.
‘गुंफा’ सोसायटी तशी नवीनच झालेली.
दहा बिल्डींग्ज.
दोनशे फ्लॅटस्.
लोकांची आपापसात अजून फक्त तोंडओळख.
आमचा प्रथमेश मात्र वल्ली माणूस.
सकाळी आठ ते सहा..
आॅफीस एके आॅफीस.
मान मोडून काम.
मग मात्र क्षणभरही तिथं थांबणार नाही.
घरी आला की खेळायला खाली.
एवढा मोठा झाला तरी..
मस्त क्रिकेट खेळायची सगळी पोरं.
प्रथमेशदादा सगळ्यांचा लाडका.
तो स्वतः स्टेटलेवलपर्यंत खेळलेला.
पोरांना मस्त गाईड करायचा.
असाच खेळ संपलेला.
अंधारायला सुरवात झालेली.
प्रथमेश दादाबरोबर, पोरांच्या गप्पा रंगात आलेल्या.
एकदम दादाची अनाऊन्समेंट…
” आपल्या सोसायटीत गणपती बसवायचाय. “
पोरं खुष.
एका पायावर तयार.
पुढचा आठवडाभर क्रिकेट बंद.
प्रथमेशदादा आॅफीसमधून घरी आला की,
बच्चागँग जमायची.
मिटींगावर मिटींगा.
ठरलं..
कामं वाटून घेतली.
पहिल्यांदा प्रथमेशदादानं ” सार्थ गणपती ” च्या नावानं, बँक अकाऊंट ऊघडलं.
एक पावतीपुस्तक आणलं.
दोन जणांची टीम.
वर्गणी मागायला घरी.
पाचशेचा आकडा ठरवला गेला.
सगळ्यांना सहज परवडणेबल.
आयडिया थोडा चेंज.
दोघं जणं प्रत्येक घराची बेल वाजवायचे.
पाचशे रूपयांची पावती द्यायचे.
घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून बाहेर.
कुणी पैसे द्यायला लागलं तर ‘नाही’ म्हणायचं.
वर्गणी आत्ता नाही..
थेट पुढच्या वर्षी घेणार.
तेही यावर्षीचा गणेशोत्सव आवडला तर…
अरे हे चाललंय काय?
बजेट ठरलेलं.
एक लाख रूपये.
साधारण दिवसाला दहा हजार.
प्रसाद, हारफुलं, पाहुण्यांचे स्वागत, त्यांची ने आण, मानधन, इतर साहित्य, सगळं सगळं त्यात समाविष्ट.
सगळा कॅशलेस व्यवहार.
दीड फुटाची शाडूची मूर्ती.
बुक केली.
परांजपेकाकांची गाडी सध्या नगरला.
त्यांच्या मुलाकडे.
त्यांचं पार्कींग रिकामंच होतं.
तिथं साधासा मंडप.
बाकी कार्यक्रम क्लब हाऊसमधे.
दोनशे घरांचा वाॅटस्सप ग्रुप फाॅर्म केला.
” सार्थ गणपती” नावाचा.
तिथंच दैनंदिन कार्यक्रमाची माहिती दिली जायची.
गो पेपरलेस.
सकाळची आरती सोसायटीतल्या पेन्शनर्स गँगकडे.
आजोबा – आजी गँग आनंदानं तयार झाली.
संध्याकाळच्या आरतीची जबाबदारी बच्चा गँगकडे.
रोज संध्याकाळी सात ते नऊ वेगवेगळे कार्यक्रम.
प्रत्येक दिवशी संध्याकाळी एक पाहुणा.
संध्याकाळची आरती पाहुण्यांच्या हस्ते.
पहिला दिवस ” सुंदर गणेश “
आजचे पाहुणे सजावटकार श्री. लवाटे.
पुष्पसजावट करण्यात एक्सपर्ट.
प्रत्येक घरासाठी फुलं दिली गेलेली.
गुलाब, निशिगंध, जर्बेरा, ग्लॅडीओडस..
प्रत्येक घरातली टीम लवाटेसरांना फाॅलो करत होती.
तासाभरात मस्त कलाकृती तयार.
फुलांची सजावट.
घरच्या गणपतीला.
लवाटे सरांनी केलेली सजावट सार्थ गणपतीला.
‘सुंदर गणेश’ सगळ्यांना आवडलाच.
दुसरा दिवस ” आरोग्यगणेश”
आजचे पाहुणे डाॅ. गंधे.
‘फॅमिली डाॅक्टर’ या विषयावर मस्त गप्पा.
दैनंदिन आहार, व्यायाम, आरोग्यविषयक काळजी, विविध तपासण्या…
डाॅक्टर मस्त बोलले.
नंतर लोकांचे प्रश्न.
शंकानिरसन.
प्रथमेशनं सोसायटीतल्या प्रत्येक व्यक्तीचा ब्लडग्रुप आणि फोन नंबर याची लिस्ट केली.
नोटीसबोर्डवर लावून टाकली.
डाॅक्टर नेत्रदानाविषयी बोलले.
बर्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे नेत्रदानाचे फाॅर्म भरून दिले.
” आरोग्य गणेशा” तुझी कृपा अशीच राहू दे.
तिसरा दिवस ” अर्थ गणेश”
आजचे पाहुणे अर्थ तज्ञ आणि सी. ए. श्री. सुवर्णपाठकी.
गुंतवणूक, करबचत, म्युच्युअल फंड, रिअल ईस्टेटमधली गुंतवणूक, फायनान्शियल पोर्टफोलिओ,
इन्शुरन्स पाॅलीसीज..
सुवर्णपाठकी सर प्रत्येक विषयावर छान बोलले.
अर्थसाक्षरतेत भर पडली.
“अर्थ गणेश ” आवडलाच.
आता ‘उद्या’ची काळजी नाही.
चौथा दिवस ” पर्यटनगणेश “
आजचे पाहुणे श्री. वैकर.
छोटा ब्रेक, देशातली बघायलाच हवीत अशी पर्यटन स्थळे, विदेशातल्या सहली, पासपोर्टविषयक माहिती, ट्रीपला जाताना बॅग कशी भरावी?
प्रत्येक विषयावर वैकर सर छान बोलले.
त्यांच्या टूरकंपनीतर्फे ‘गुंफा’साठी खास डिस्काऊंटेड स्कीम सुद्धा अनाऊन्स केली.
लोकांची दिवाली टूर ठरलीसुद्धा.
” पर्यटन गणेश ” आवडलाच.
पाचव्या दिवशी ” हरित गणेश “
आजचे पाहुणे ऊद्यानतज्ञ श्री. पानतावणे.
कुंडीतली बाग, गच्चीतली बाग याविषयी मस्त गप्पा.
झाडांची काळजी, खते, कीडनाशके, मातीविरहित बाग.
खूपच नवीन माहिती मिळाली.
सहावा दिवस “संगीतगणेश “
आजचे पाहुणे सोसायटीतलेच.
संगीतशिक्षक श्री. देवडीकर.
मस्त मैफल रंगलेली.
फक्त गणपतीची गाणी.
गजानना श्री गणराया…
सातवा दिवस ” साहित्य गणेश “
आजचे पाहुणे प्रकाशक श्री. वाडेकर.
‘काय वाचाल? ‘याविषयी मस्त मार्गदर्शन.
‘मस्ट रीड’ पुस्तकांची यादी.
किंडल, ईबुक, आॅडिओ बुक याची माहिती.
त्यांच्या प्रकाशनातर्फे सवलतीत पुस्तके.
आठवा दिवस ” आकाश गणेश “
आजचे पाहुणे खगोलशास्त्रज्ञ श्री. निरगुडकर.
सगळी सोसायटी गच्चीवर.
त्यांनी आणलेली भलीमोठी दुर्बीण.
आकाशवाचन.
ग्रहतार्यांशी गळाभेट.
झाले मोकळे आकाश.
मजा आ गया.
नववा दिवस ” मानस गणेश “
आजचे पाहुणे मानसशास्त्रज्ञ डाॅ. शेळगीकर.
” मनाचे आरोग्य “.
“आनंद कुठे विकत मिळेल? “
डाॅक्टरांनी सगळ्यांना आनंदात जगायला शिकवलं.
मग शेवटी सगळ्या आजोबा आजींचा रॅम्पवाॅक.
धमाल मजा.
दहावा दिवस.
विविध गुणदर्शन.
दुपारी बच्चा गँगचा प्रोग्रॅम.
आणि मग देशपांडे गुरूजींनी सांगितलेला,
‘अथर्वशीर्षा’ चा अर्थ.
सोसायटीतल्या सोसायटीत काढलेली गोल मिरवणूक.
आजी गँगने म्हणलेल्या आरत्या.
तात्पुरत्या ऊभारलेल्या विसर्जन कुंडात बाप्पांचं विसर्जन.
दुसर्या दिवशी तीच माती सोसायटीतल्या झाडांना अर्पण.
अहाहा…
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनावर सगळे खूष.
सोसायटीचं घट्ट कुटुंब झालेलं.
प्रथमेश हीरो झालेला.
बघता बघता वर्ष होत आलंय.
यावर्षीचे गणपती जवळ आले.
प्रथमेशनं डिटेल्ड रिपोर्ट वाॅटस्सप केला.
पै न पै चा हिशोब.
जमा लाख रूपये?
कुठनं आले?
हा प्रथमेशचा दुसर्या महिन्याचा पगार.
कालच एक मेसेज टाकलाय.
‘गेल्या वर्षी ‘ ची वर्गणी जमा करण्याबद्दल.
पावतीपुस्तक छापलंच नाही.
फक्त ‘सार्थ गणेश’चा अकाऊंट नंबर.
एका दिवसात, सगळ्यांनी पैसे अकाऊंटला जमा केले सुद्धा.
प्रथमेश तयारच नव्हता.
सोसायटीवाल्यांनी त्याचे लाख रूपये परत केले.
परांजपेकाका पोरांशी तावातावाने काल भांडले सुद्धा.
कशासाठी?
यावर्षीची वर्गणी घेतली नाही म्हणून.
कशी घेणार?
या वर्षीची वर्गणी भरली गेलीय.
अॅडव्हान्समधे.
आमचा टेन्याही गेल्याच महिन्यात नोकरीला लागलाय.
समजलं ना?
बाप्पांची कृपा.
आमच्या ‘गुंफा’त काय म्हणतात माहित्येय?
वर्गणी कधीच मागायची नसते.
मनापासून द्यायची असते.
परवडणेबल तेवढीच.
तरच बाप्पा प्रसन्न होतो.
गणपती बाप्पा मोरया.
© श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





