श्री सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ अहं ब्रह्मास्मि – लेखक : अज्ञात – संकलक : श्री यशवंत गोखले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आयुष्याच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण स्वतःला घडवत असतो…
दुसऱ्या इनिंगमध्ये संसार, नाती, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये निभावत असतो…
आणि तिसरी इनिंग सुरू झाली की मात्र एक प्रश्न हळूच मनाच्या दारावर येऊन उभा राहतो?
आता माझ्यासाठी मी काय?
आता माझे काय अस्तित्व?
मुलं मोठी होतात. आपापल्या संसारात रमून जातात. काही नाती काळाच्या पडद्याआड जातात. काही माणसं कायमची दूर होतात. घर तेच असतं, पण घरातले आवाज कमी झालेले असतात. पूर्वी ज्यांच्यासाठी दिवस धावत जायचा, त्यांच्यापासून थोडेसे अलिप्त होऊन आपण स्वतःकडे पाहू लागतो…
कधी एकटेपण जाणवतं.
कधी जुन्या आठवणी डोळ्यांत पाणी आणतात.
कधी वाटतं, आपली गरज आता कोणाला आहे?
– – पण कदाचित हाच तो क्षण असतो, जेव्हा आयुष्य आपल्याला बाहेरून आत घेऊन जात असते.
आणि तेव्हाच अहं ब्रह्मास्मि या शब्दांचा खरा अर्थ उमजू लागतो
मी म्हणजे फक्त कोणाची आई, बाबा कोणाची पत्नी, पती कोणाची आजी, आजोबा किंवा कोणाची मित्र, मैत्रीण नाही. या भूमिका अत्यंत सुंदर आहेत!
– – पण त्या माझ्या अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ नाहीत.
माझ्या आत एक, अशी जागा आहे, जिथे माझ्या नात्यांची ओळख नाही, वयाची मर्यादा नाही, भूतकाळाची खंत नाही आणि भविष्याची चिंता नाही.
– – तेथे फक्त मी आहे… माझे चैतन्य आहे… आणि त्या चैतन्यात परमेश्वराचा अंश आहे…
म्हणूनच तिसरी इनिंग म्हणजे आयुष्याचा उतार नव्हे?
… ती स्वतःकडे परतण्याची वेळ आहे.
आता दुसऱ्यांनी आपल्याला काय समजावे यापेक्षा, आपण स्वतःला काय समजतो हे महत्त्वाचे आहे.
कोणी फोन केला नाही म्हणून आपण कमी होत नाही!
कोणी कौतुक केले नाही म्हणून आपली किंमत कमी होत नाही!
कोणी आपल्याला विसरले म्हणून, परमेश्वराने आपल्याला विसरले असे होत नाही!
… उलट, या शांततेत आपण स्वतःचा हात स्वतःच्या हातात घ्यायला शिकतो.
पूर्वी आपण सगळ्यांसाठी जगलो.?
आता स्वतःच्या मनासाठी थोडे जगू या!
पूर्वी इतरांच्या इच्छा जपल्या.
आता स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू या!
पूर्वी घर कुटुंब सांभाळले.
आता मनाला सांभाळू या.
राग, अपेक्षा, दुःख, उपेक्षा, जुन्या आठवणी,
एकेक करून त्यांना प्रेमाने निरोप देऊ या…
कारण
अहं ब्रह्मास्मि म्हणजे मी सर्वांपेक्षा मोठा आहे असे नाही; तर माझ्यातही तोच परमात्मा आहे, जो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, ही जाणीव आहे.
मग कुणाबद्दल द्वेष कसा राहील?
ज्याने दुखावले त्यांच्यासाठीही मनातून क्षमा वाटू लागते…
जो सोडून गेला, त्याच्याबद्दलची तक्रार कमी होते…
त्याचे जाणे स्वीकारलेले असते…
तो एक सहजीवनाच्या प्रवासाचा आजवरचा सोबती होता…
त्याचा प्रवास लवकर संपला… आपला प्रवास अजून कुठपर्यंत आहे?
माहीत नाही…
जे मिळाले नाही त्याची खंत कमी होते…
आणि जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता वाढते…
आयुष्याची तिसरी इनिंग मग एकटेपणाची न राहता आत्मशोधाची होते…
संध्याकाळच्या शांत वेळी खिडकीत बसून आकाशाकडे पाहताना मन म्हणते…
खूप धावलों …
खूप जपले…
खूप गमावले…
खूप रडलों …
पण आता स्वतःला हरवायचे नाही.
… कारण शेवटी सगळ्या भूमिका संपतात, सगळे आवाज शांत होतात, सगळी नाती आपापल्या मार्गाने जातात…
… उरते ते फक्त एक चैतन्य रुप.
आणि त्या चैतन्याची ओळख म्हणजे?
अहं ब्रह्मास्मि!
ही तिसरी इनिंग म्हणून मिळालेली आयुष्याची सुंदर संधी आहे…
जगापासून दूर जाण्याची नव्हे, तर?
… स्वतःच्या अधिक जवळ जाण्याची.
… स्वतःच्या अंतरंगात उतरण्याची.
खरं आहे ना?
लेखक : अज्ञात
संकलक : यशवंत गोखले
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






