श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११५ आणि ११६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ११५ – – –
तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ।
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ।।११५।।
अर्थ : ज्या चर्चेतून काही तत्व किंवा सार हाती लागू शकेल अशाच चर्चेत भाग घ्यावा. आपल्याला आपल्या ज्ञानाचा जो अहंकार झालेला असतो, त्यात विवेकाच्या साहाय्याने बदल घडवून आणावा. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. भक्तिमार्गामुळे आपल्या चित्तात बदल होतो, म्हणून भगवंत प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करावा.
विवेचन : समर्थांनी आधीच्या श्लोकात केलेल्या उपदेशाची पुनरावृत्ती या श्लोकात झालेली आपल्याला आढळते. परंतु त्यांचे महत्त्व पुन्हा आपल्या मनावर ठसावे आणि आपल्या अंतरंगात बदल व्हावा यासाठीच चांगल्या गोष्टींची ही पुनरावृत्ती! आजच्या धकाधकीच्या काळात सर्वसामान्य माणसाचे जीवन ताणतणावाचे झाले आहे. मानसिक शांती मिळावी, आपल्या मनातील प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळावीत म्हणून माणूस विसाव्याची ठिकाणे शोधत असतो. याचाच फायदा घेऊन आजकाल भोंदू बुवा, बाबा यांनी परमार्थाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतो. सर्वसामान्यच काय परंतु शिकलेले लोक देखील त्याला कसे बळी पडतात आणि आपले सर्वस्व कसे गमावतात याची अनेक उदाहरणे वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात.
अशा लोकांसाठी समर्थांनी तळमळीने इशारा देऊन ठेवला आहे की जिथे आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील, शंका निरसन होईल आणि जी काही चर्चा होईल त्यातून साररूपी नवनीत हाती लागेल, अशाच ठिकाणी माणसाने जावे. बुवाबाजी आणि व्यर्थ चर्चांमध्ये अडकू नये.
परिश्रमपूर्वक ज्ञान प्राप्त करणे ही चांगलीच गोष्ट आहे. जेवढे ज्ञान अधिक तेवढा माणूस अधिक नम्र व्हावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात होते उलटेच! माणसांना आपल्या ज्ञानाचा अहंकार व्हायला लागतो. अशा वेळी पुढील प्रगती हळूहळू मंदावते. कारण मला काही जाणून घ्यायचे नाही, मला सगळेच माहिती आहे असा अहंकार माणसाला होतो. अशा माणसांसाठी समर्थ म्हणतात की विवेकाचा आश्रय घ्यावा. विवेक म्हणजे योग्यायोग्य, बरेवाईट यातील फरक करण्याची क्षमता. त्याच्या साहाय्याने हे जाणून घ्यावे की आपला अहंकार हा आपल्या प्रगतीच्या आड येणारा आहे. हे लक्षात आले की त्यावर मात करणे सोपे होते. जगामध्ये अपरंपार ज्ञान आहे आणि आपल्याला अजून खूप शिकायचे आहे. आपल्याला जे काही माहिती आहे ते एखाद्या वाळूच्या कणापेक्षा सुद्धा कमी आहे हे सुद्धा विचार केल्यानंतर लक्षात येते. आईन्स्टाईन सारखा बुद्धिमान शास्त्रज्ञ एकदा म्हणाला होता की मला जे माहिती आहे ते वाळूच्या एखाद्या छोट्याशा कणा पेक्षा सुद्धा कमी आहे.
भगवंत प्राप्तीसाठी केवळ कोरडे ज्ञान उपयोगाचे नसते. त्यामध्ये भक्तीचा ओलावा हवा. परमेश्वराला भक्ती प्रिय आहे. भक्तिमार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. खरी भक्ती माणसाला नम्र बनवते. हनुमंत, समर्थ रामदास हे रामाचे परमभक्त होते पण त्यांची नम्रता केवढी! ते स्वतःला रामाचा दास किंवा सेवक म्हणवून घेतात. संत ज्ञानेश्वर असो की आणखी कोणतेही संत. या सगळ्या संतांमध्ये कमालीचे नम्रता होती आणि आपण जे काही बोलतो आहोत ते आपल्या गुरूंचे कृपेमुळेच बोलतो आहोत असे ते म्हणत. आपण परमेश्वराची जी भक्ती करतो किंवा गुरूंची सेवा करतो त्यातून आपल्या चित्तामध्ये परिवर्तन घडवून आले पाहिजे. खरी भक्ती चित्तात अंतर्बाह्य पालट घडवून आणते. तेव्हा आपणही हा भक्तिमार्गच स्वीकारावा. ‘ मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ ही समर्थांची शिकवण कायम लक्षात ठेवावी.
स्वसंवाद :
१. ताणतणाव आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी खऱ्या ‘सुखसंवादाचा’ आधार घेतो, की भोंदू बुवा-बाबांच्या दांभिक प्रचाराला बळी पडतो?
२. माझ्याकडे असलेल्या ज्ञानामुळे किंवा पदव्यांमुळे मी अधिक नम्र झालो आहे, की “मला सगळेच माहीत आहे” असा अहंकार माझ्या प्रगतीच्या आड येत आहे?
३. माझ्या रोजच्या वाचनात आणि आचरणात केवळ ‘कोरडे ज्ञान’ आहे, की भगवंताला प्रिय असणारा ‘भक्तीचा ओलावा’ (प्रेम) मी आत्मसात केला आहे?
४. हनुमंत आणि समर्थ रामदास यांच्याप्रमाणे, मी स्वतःला नम्रपणे भगवंताचा केवळ ‘दास’ किंवा ‘सेवक’ मानतो का?
=====
श्लोक क्र. ११६ – – –
बहू श्रापिता कष्टला अंबऋषि ।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ।
दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११६।।
अर्थ : अंबरीश राजाला (दुर्वास ऋषींनी) शाप दिल्यामुळे त्याला फार कष्ट झाले. त्याच्यासाठी भगवंताने स्वतः गर्भवास सोसला. उपमन्यू या आपल्या भक्तासाठी त्यांनी त्याला क्षीरसागराचे वरदान दिले. अशा रीतीने देव आपल्या भक्तांची काळजी घेतो. आपल्या भक्तांचा अभिमान असलेला हा भगवंत त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
(श्रापिता – शाप दिल्याने, क्षीरसिंधु – दुधाचा समुद्र, नुपेक्षी – उपेक्षा /दुर्लक्ष करीत नाही)
विवेचन : ११६ ते १२६ या अकरा श्लोकात समर्थ आपल्याला परमेश्वर आपल्या भक्तांची कशी काळजी घेतो आणि त्यांची उपेक्षा कशी होऊ देत नाही हे सांगतात. या श्लोकाचा अर्थ लक्षात येण्यासाठी आपल्याला त्याच्यामागील पौराणिक कथा समजून घ्यावी लागेल. अंबऋषी म्हणजे अंबरीष राजा. त्याची कथा महाभारत आणि भागवतात येते. हा राजा अत्यंत पराक्रमी आणि भगवंताचा परमभक्त होता. तो एकादशीचे व्रत नियमितपणे करीत असे. एकदा त्याने असेच एकादशीचे व्रत केले असता, त्याच्याकडे दुर्वास ऋषी मुक्कामासाठी आले. दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्याने उपवास सोडण्यासाठी राजाने त्यांना आपल्यासोबत भोजनासाठी थांबण्याची विनंती केली. दुर्वासांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी नदीवर स्नानासाठी गेले. तिकडेच ते ध्यानात रमल्यामुळे भोजनासाठी येण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला. राजाने त्यांची वाट पाहून उपवास सोडण्यासाठी भगवंताचे तीर्थ घेऊन आचमन केले. दुर्वास आल्यानंतर त्यांना जेव्हा राजाने एकादशीचा उपवास आपल्याशिवाय सोडला हे कळले तेव्हा ते अतिशय संतापले. ते मुळातच शीघ्रकोपी स्वभावाचे होते. वास्तविक राजाने भोजन केले नव्हते. पण तरीही दुर्वासांनी त्याला मनुष्य आणि प्राण्याचे दहा जन्म प्राप्त होतील असा शाप दिला. शिवाय आपल्या डोक्यावरील एक केस उपटून त्याच्यातून राजाला मारण्यासाठी कृत्या निर्माण केली. (कृत्या म्हणजे काळ्या जादूने किंवा तांत्रिक विधीने दुसऱ्याला मारण्यासाठी निर्माण केलेली विनाशकारी शक्ती)
ही कृत्या जेव्हा अंबरीष राजाला मारण्यासाठी धावली, तेव्हा आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत धावून आले. त्यांनी सुदर्शन चक्राच्या साहाय्याने कृत्याचा नाश केला. पण आता ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. तेव्हा दुर्वासांनी भगवंताचा धावा केला. भगवंताने आपले सुदर्शन मागे घेतले. पण दुर्वासांनी दिलेल्या शापाच्या पूर्ततेसाठी स्वतः भगवंताने गर्भवास सोसून जन्म घेतले अशी ही कथा आहे.
दुसरी कथा उपमन्यूची आहे. उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. त्याच्या घरी अत्यंत गरिबी होती. त्याला लहानपणी पिण्यासाठी गायीचे दूध देखील मिळत नसे. त्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून देई. एकदा त्याला शेजारच्या ऋषींच्या आश्रमात गायीचे धारोष्ण दूध प्यायला मिळाले. खरे दूध कसे असते हे त्याला कळले. आपल्या आईकडे त्याने तशा दुधासाठी हट्ट धरला. आईने त्याला सांगितले की बाळा आपण गरीब आहोत. आपल्याला गायीचे दूध परवडत नाही. मागील जन्मी आपण काहीतरी पाप केले असले पाहिजे म्हणून आपल्याला ही अशी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा लहानगा उपमन्यू भगवंताची उपासना करू लागला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याच्यासाठी क्षीरसागरच निर्माण केला. क्षीरसागर प्रतीकात्मक अर्थानेही घेता येईल. आनंदाचा आणि सर्व सुखांचा सागर या अर्थाने. आपल्या भक्ताला त्यामुळे काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था भगवंताने केली.
अशा रीतीने जो कोणी मनापासून त्याची भक्ती करतो अशा आपल्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा होऊ देत नाही. तो आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आहे. म्हणून आपणही भक्तिमार्गाचा अवलंब करावा असेच समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद :
१. दुर्वास ऋषींसारखा मोठा संताप किंवा कोणतीही विनाशकारी ‘कृत्या’ (संकट) समोर आली, तरी मी अंबरीष राजासारखा शांत राहून भगवंताच्या स्मरणाचा आणि विवेकाचा आश्रय घेतो का?
२. उपमन्यूच्या कथेप्रमाणे, माझ्या आयुष्यात किंवा कुटुंबात एखादी मोठी उणीव अथवा गरिबी आली, तर मी इतरांचा हेवा करत नशिबाला दोष देत बसतो, की माझ्या प्रामाणिक कर्माने व साधनेने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो?
३. “माझा देव भक्ताभिमानी आहे आणि तो माझी कधीही उपेक्षा करणार नाही, ” हा दृढ विश्वास माझ्या मनात सुखाच्या काळाप्रमाणेच संकटाच्या वादळातही अढळ राहतो का?
४. ईश्वराकडे केवळ संसारातील छोट्या-छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करण्याऐवजी, मी कधी उपमन्यूसारखा अनन्यभाव ठेवून साक्षात ‘क्षीरसागर’ (परमानंदाचा सागर) मिळवण्याची इच्छा बाळगतो का?
– क्रमशः श्लोक ११५ आणि ११६
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





