प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १८ ☆ प्रा.भारती जोगी ☆
लोहकन्या ‘मणिबेन!!
“बेटी, तू अशा व्यक्तीची मुलगी आहेस, जी भारताची गृहमंत्री आहे, ज्याच्या एका इशा-यावर देशातील कोट्यवधी रुपये इकडून तिकडे होऊ शकतात. मग तू ही अशी ठिगळ लावलेली साडी कां नेसतेस? “
– – हे शब्द आहेत; ज्येष्ठ कॉंग्रेस नेते महावीर त्यागी यांचे!
सरदार पटेलांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले असता, त्यांना जे दिसले ते बघून त्यांच्या तोंडून निघालेले हे आश्चर्योद्गार!!
… यावर ती उत्तर देती झाली… एक सच्ची स्वाभिमानी, तेजस्विनी…
” आम्ही जी खादी वापरतो ती सूतकताई करतांना उरलेल्या धाग्यापासून किंवा खराब झालेल्या कापडापासून बनते. कापड फाटले तर ते फेकून देणे, नवीन खरेदी करणे हा देशाच्या संपत्तीचा अपव्यय आहे. “
ही बाणेदार, स्वाभिमानी, सच्ची देशभक्त होती…
एका लोहपुरूषाची लोहकन्या ‘मणिबेन‘!!
मणिबेन ६/७ वर्षाच्या असतांनाच त्यांच्या आईचे अगदी कमी वयात निधन झाले. अशा कठीण प्रसंगी ‘ छोटी ‘ मणिबेन, तिच्याही नकळत ‘मोठी ‘ झाली. तिने आपल्या भावाचं आणि पित्याचं… दोघांचही मातृत्व स्विकारलं. आई झाली ती!
वल्लभभाईंची कन्या, आणि.. सरदारांची आई झाली.
आपल्या मायेच्या पदरात पित्याचं मातृत्व पेललं ही आणि शेवटपर्यंत जपल ही.. अगदी सुरक्षित!!
सरदार पटेलांची ही सुपुत्री मग नंतर आयुष्यभर पटेलांची व्यक्तिगत सचिव आणि सावली बनून राहिली. अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला तिनं! अविवाहित राहून… आपल्या पित्याच्या आरोग्याची काळजी आई बनून, परिचारिका बनून घेतली. सार्वजनिक जीवनात त्यांची ‘ढाल ‘ बनून उभी राहिली. त्यांचं आरोग्य, पत्रव्यवहार आणि दैनंदिन कामे यांची व्यवस्था बघू लागली.
अविवाहित राहून पित्याच्या सेवेत, त्याची ‘ सहधर्मी ‘ आणि ‘सहकर्मी’ होऊन राहिली. याविषयी ले. विष्णू प्रभाकर यांनी फारच सुंदर असे गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या मते… असे मौन संप्रेषण आणि मूक समन्वयाचे उदाहरण इतिहासात विरळाच!!!
या पिता-पुत्रीत शब्देविण संवादु असं मौन संप्रेषण असायचं. सरदारांना काय हवे हे केवळ त्यांच्या डोळ्यातील भाव आणि देहबोलीतून ओळखायच्या मणिबेन! दोघांत संवाद होता तो शब्दांचा नसून कर्तव्य, निष्ठा, आणि अथांग अशा वात्सल्याचा, प्रेमाचा होता.
मणिबेन च्या या संपूर्ण समर्पणाच्या बळावरच सरदार पटेल देश कार्यात समर्पित होऊ शकले.
“जे देशासाठी जगतात, त्यांच्यासाठी जगणारं कुणीतरी असल्याशिवाय ते देशासाठी नाही च जगू शकत.”!!!
सरदार देशासाठी जगत राहिले, आणि मणिबेन त्याच्या साठी! एका समर्पणामागे जेव्हा दुसरं एक समर्पण उभं असतं ना दृढ, खंबीरपणे, तेव्हा समर्पण असीम होतं… याचं ज्वलंत उदाहरण आहेत… हे पिता आणि पुत्री!!
मणिबेन च्या मातृव भावनेचा लाभ सरदारांना तर झालाच, पण अमूल ब्रॅंड च्या उभारणीत, वर्गीस कुरियन यांच्या सहकार चळवळीला पाठिंबा देत, शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्वार्थाने सहकार्य करत असतांना दुसरीकडे.. मणिबेन वर्गीस कुरियन यांच्या पत्नी च्या… मॉली च्या पाठीशी खंबीरपणे, आई सारख्या उभ्या राहिल्या. केरळ मधून, गुजरात सारख्या नवख्या प्रदेशात आलेल्या आणि ‘धवल क्रांती ‘ साठी रात्रंदिवस झटणाऱ्या पतीच्या अनुपस्थितीत, गोंधळून गेलेल्या मॉली ला मणिबेन अगदी आई सारख्या समजावत, ” तू वर्गीस यांची दुसरी पत्नी आहेस. त्यांची पहिली पत्नी त्यांची डेअरी आणि त्यांचं काम. त्यात तू कधीही अडथळा आणू नकोस.”
अविवाहित राहूनही मातृत्वाचा एक सुरक्षिततेची आणि प्रेमाची सावली देणारा पदर झाल्या मणिबेन!
मणिबेन एक दृढ इच्छा शक्ती असलेली, पित्याच्या खांद्याला खांदा लावून, पाठीशी खंबीरपणे उभी राहून… सत्याग्रह, आंदोलन, तुरूंगवास या सगळ्यांत एक समिधा बनून समर्पित होत राहिली. आयुष्याचा क्षण न् क्षण, क्षणांचा कण न् कण… समर्पणाची साक्ष देतोयं तिच्या!!
स्वतंत्र भारतात तब्बल ३ वेळा लोकसभा आणि १ वेळा राज्यसभा खासदार राहिल्या. पण कधीही स्वतः चे वाहन नाही. रिक्षा/ पायी प्रवास. सुख-सुविधायुक्त जीवनशैली पासून खूपच दूर होत्या त्या!
म. गांधीजींच्या साबरमती आश्रमात राहून मणिबेन नी, चरखा आणि सूतकताई चा वसा घेतला आणि वारसा म्हणून जपला शेवटपर्यंत… सूती वस्त्रं परिधान करून. महात्मा गांधींच्या विचारांना प्रत्यक्ष जगणारी, एक निष्ठावान साधिका, तपस्विनी म्हणून, एक निष्ठावान देशसेविका बनून जगतच समर्पित होत राहिली. एक मौन, मूक समर्पण… एक मौन, दृढनिश्चयी, निष्ठावान कर्मयोगीनी!!
वल्लभभाईंच्या निधनानंतर, पित्याच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे, मणिबेन… एका छोट्या पिशवीत पक्षाच्या निधीचे ३५ लाख रुपये आणि हिशेबाची डायरी, नेहरूंकडे सुपूर्द करून आल्या. एका पै ला ही स्पर्श नाही केला.
देशाला एकत्र बांधणा-या अखंड भारताच्या निर्मात्याची मुलगी… पण… नंतर तिच्या वाट्याला आले अत्यंत खडतर, हालाखीचे, अत्यंत कष्टप्रद आणि विपन्नावस्थेतलं, दुर्लक्षित आणि उपेक्षित जीवन!! सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही ‘अलिप्त ‘ आणि ‘ कर्तव्य निष्ठेचं ‘ एक दुर्मिळ उदाहरण, एक आदर्श…
शेवटी २६ मार्च १९९० रोजी या ‘लोह कन्येने ‘ अखेरचा श्वास घेतला. एक समिधा समर्पित झाली… पित्याच्या आणि मातेसमान देशाच्या सेवा यज्ञात!!
“सिमट जाती है यादें जिनमें…
ऐसी तसवीर, कुछ ना कहते हुए भी बहुत कुछ कहती है! “
– क्रमशः भाग १८.
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





