मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… दुकोरी / दुकडीबाला – लेख क्र. ५ ☆ मंजिरी येडूरकर ☆

दुकोरी / दुकडीबाला – – 

हिचा जन्म १८८७ मध्ये पश्चिम बंगाल मध्ये झाऊपाडा या गावी झाला. वडील नीलमणी चटोपाध्याय अतिशय गरीब होते. तरीही जोखीम पत्करून क्रांतिकारकांना मदत करत होते. लहानपणीच दुकडीबालाचे लग्न फनी भूषण चक्रवर्ती यांच्याशी झाले. तिचा, सामान्य स्त्री सारखा संसार सुरू झाला.

त्या काळात बंगाल हे विध्वंसक कारवायांचे केंद्र झाले होते. त्यामुळे बंगाली लोकांची राजकीय शक्ती कमकुवत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. १६ ऑक्टोबर १९०५ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या फाळणीची औपचारिक घोषणा केली. बंगाली लोकांनी तत्काळ त्याचा निषेध केला. कट्टर राष्ट्रवादी व संघटन आंदोलनांना फाळणीमुळे चालना मिळाली. ‘निबारनचंद्र घटक’ हा क्रांतिकारक गटाचा सदस्य होता. तो दुकडीबालाचा नातेवाईक होता. जवळच्याच गावात तो राहत असल्याने वरचेवर दुकडीबालाकडे यायचा. क्रांतीकारक गटाच्या संकल्पना, त्यांचे विचार यांनी दुकडीबालाला प्रभावित केले होते.

२६ ऑगस्ट १९१४ या दिवशी बंगाली क्रांतिकारी संघटना ‘अनुशीलन’ समितीच्या ‘युगांतर’ गटाच्या सदस्यांनी कलकत्त्यातील बंदुकांचे व्यापारी मेसर्स रोडा अँड कंपनी यांच्याकडे पिस्तूल व दारुगोळा नेणारी गाडी कस्टम हाऊस मधून कंपनीच्या गोदामाकडे जात असताना अडविली गेली व त्यातील शस्त्रे घेऊन क्रांतिकारी पसार झाले. दिवसाढवळ्या झालेला हा सर्वात मोठा दरोडा होता. निबारणचंद्र व त्याचे साथीदार यात सामील होते. या सर्वांना मग गुप्तपणे राहावे लागले. त्यावेळी या भूमिपुत्रांना दुकडीबाला ने फार जवळून पाहिले. तिलाही आपण मातृभूमीसाठी काहीतरी करावे असे वाटत होते, पण निबारणचंद्र तिला या धोकादायक कारवायात सामील करून घेण्यास तयार नव्हता. पण ती मात्र आपल्या मतावर ठाम होती त्यामुळे लवकरच दुकडीबालाचे घर गनिमी कारवायांचे केंद्र बनले.

तिने भूमिपुत्रांकडून पिस्तूल व इतर हत्यारे चालविण्याचे शिक्षण घेतले. निबारणचंद्र वेगवेगळ्या ठिकाणी पेट्या पोहोचवण्याचे काम करीत होता. काही पिस्तुले व काडतुसे दुकडीबालाच्या घरी ठेवली होती. त्यावेळी दुकडीबालाचे बाळ दूध पिते होते. पोलिसांचे काम जोरात चालले होते. अखेर ८ जानेवारी १९१७ ला पोलीस दुकडीबालाच्या घरी आले. तिच्या घराचे दार बंद होते

दारावर टकटक आवाज करून पोलिसांनी तिला दार उघडण्यास सांगितले. तिने आतूनच सांगितले, बाळ दूध पिते आहे मी दार उघडू शकत नाही्. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. आम्हाला दार तोडून आत यावे लागेल असा त्यांनी धमकीवजा इशारा दिला. दरम्यानच्या काळात दुकडीबाला ने काडतुसे व पिस्तुले काढून दुपट्यात गुंडाळली. व बाळ दुपट्यात घेऊन दार उघडण्यासाठी गेली. व पोलिसांना म्हणाली एकटी बाई घरात असताना तुम्ही आत येऊ शकत नाही. थांबा, मी शेजाऱ्यांना बोलावून आणते. असे म्हणून ती शेजारी गेली. हळूच सगळा माल शेजारी ठेवून आली. तोपर्यंत पोलिसांनी सगळे घर पालथे घातले होते. पण त्यांना काहीही मिळाले नाही. निराश होऊन ते बाहेर पडले. तेवढ्यात कोणीतरी फितूर निघालाच आणि त्याने चोरी चव्हाट्यावर आणली आणि दुकडीबाला पकडली गेली.

तान्ह्या बाळाला घरात सोडून तिला पोलिसांबरोबर जावे लागले. तिला अटक झाली. तुरुंगात तिचा प्रचंड छळ केला गेला. तिने क्रांतिकारकांची नावे सांगावीत, ठाव ठिकाणा सांगावा, म्हणून तिच्यावर दबाव आणला गेला. पण तिने तोंड उघडले नाही. शेवटी तिला दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. रोज करावे लागणारे प्रचंड श्रम अंग पिळवटून टाकत होते. तरीही रोज वडिलांना, मी चांगली आहे असं सांगून बाळाची काळजी घेण्याची विनंती करत होती.

शस्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन कारावास भोगावा लागणारी दुकडीबाला ही पहिली महिला क्रांतिकारक होती.

स्वतंत्र भारतात १९७० साली तिचे निधन झाले. तरीही तिच्या कार्याचा उल्लेख फार कोठे सापडत नाही की तिची स्मृती कुठे जतन केली गेली नाही हे आपले दुर्दैव!!

– क्रमशः भाग ५  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted