वीणा कुलकर्णी
इंद्रधनुष्य
☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. ५ ☆ वीणा कुलकर्णी ☆
“ पेट्रोल पंपावर काम करणारी भगिनी “
– – २१ व्या शतकातील ‘आजची दुर्गा’:
कामाचे स्वरुप अत्यंत कष्टाचे व पुरुषांचे वर्चस्व समजले जाणारे ठिकाण म्हणजे पेट्रोलपंप.
– – अहोरात्र चालणाऱ्या या कठीण कामाचे ठिकाणी अलिकडे “स्त्री” हिमतीने काम करताना दिसू लागली आहे.
हे काम स्त्रीला न देण्याचे कारणही समर्पक होते ते म्हणजे ऊन असो पाऊस असो सतत उभे राहणे, पेट्रोलचा उग्र वास सहन करणे, वाहनांच्या गर्दीत कोलाहल हे सगळे तिला सहन करणे जमेल का असेच वाटायचे. एक स्त्री म्हणून सार्वजनिक ठिकाणी काम करण्यात असुरक्षित मानत असत. मुलगी असल्याने हे काम करण्यास घरातून मज्जाव असायचा.
आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पुरुषी पेहराव, डोक्यावर टोपी आणि टापटीप राहणीमान असणारी “ती” अनेक पेट्रोल पंपावर सर्रास तुम्हा आम्हास दिसते. हातामध्ये पेट्रोल नोजल गन घेऊन अत्यंत तत्परतेने गाड्यांमध्ये इंधन भरणारी स्मार्ट “ती” आज प्रत्येक शहरात आणि महामार्गावर पहायला मिळते. ही तिने पोटापाण्यासाठी स्वीकारलेली ही केवळ नोकरी नाही तर हा स्त्रियांचा “स्वाभिमान” आणि “आत्मनिर्भरता” आहे.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या बहुतांश भगिनी मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबात वाढलेल्या सुसंस्कारित आहेत. घरच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना रोजची आर्थिक कोंडी होतेय हे तिला जेव्हा समजायला लागले तेव्हा तिला अर्थार्जनाची जाणीव झाली. घरातील आजारपणे, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व उद्याच्या सुरक्षित जगण्यासाठी आज काम करणे किती गरजेचे आहे हे डोक्यात आलेले विचार तिला घरी बसू देईना.
कुटुंबाचा आर्थिक कणा सावरण्यासाठी अशा आगळ्यावेगळ्या कामासाठी घराबाहेर पडलेली ही स्त्री. जरा रुढीबाहेर असणारे हे काम ती आनंदाने स्वीकारते तेव्हा तो विषय चर्चेचा आणि सामाजिक होतो.
पहाटे लवकर उठून घरातला स्वयंपाक उरकून, मुलांची शाळेची पूर्वतयारी करून ही भगिनी आपल्या कामाच्या ठिकाणी पंपावर वेळेमध्ये हजर होते. ऋतू कोणताही असो ऊन असो वा मुसळधार पाऊस कामावर येणे ती चुकवत नाही. सलग आठ तास उभे राहून काम चालू. मीटर चालू बंद, पैशांचे अचूक हिशोब ठेवणे, रोख रक्कम घेणे, डिजिटल पेमेंट सांभाळणे आणि ग्राहकांशी सुसंवाद साधणे हे काम या आपल्या कुशल भगिनीचे. हे काम खरोखर सुरक्षा आणि मानसिकता यांचे आव्हान पेलण्याचे.
२४ तास सुरू राहणाऱ्या या पंपांवर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, वेगवेगळ्या स्वभावाच्या ग्राहकांना हाताळणे आणि सुरक्षेची काळजी घेणे ही मोठी आव्हाने तिच्यापुढे असतात. कमालीच्या संयमाने आणि धैर्याने तिचे काम चालू असते.
अशी सहनशीलता आणि हिंमत दाखवणारी स्वाभिमानी भगिनी.
… “तिच्या” कर्तव्याचा सन्मान करू या.
तिच्यातही एक दुर्गा आहे!
– लेख क्र. ५.
☆
© वीणा कुलकर्णी
संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




