प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – गोदावरी परुळेकर – लेख क्र. १९ ☆ प्रा.भारती जोगी ☆
गोदावरी परुळेकर
पुराणात पंचकन्या प्रात:स्मरणीय मानल्या जातात. पु. लं नी मात्र आधुनिक काळात प्रात:स्मरणीय असाव्यात अशा पांच जणींमध्ये ज्यांना स्थान दिले ती आहे… ९० ते १०० वर्षांपूर्वीची एक मुलगी जिनं एक आव्हान स्विकारलं. ऐन तारुण्यात वारली या आदिवासी जमातीच्या, समाज जागृतीचं काम हाती घेतलं आणि तडीस नेलं. वारली समाजाची वाली ठरलेली ही होती… गोदावरी परुळेकर!!
पुण्यातील एका सधन, प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या गोदावरीचे वडील लक्ष्मणराव गोखले एक प्रसिद्ध वकील. आपल्या या प्रतिभावंत लेकीला त्यांनी वैचारिक स्वातंत्र्य दिले. कृती करण्याचे पाठबळ ही दिले. गोदावरी बी ए एल एल बी झाली. आणि ‘पहिली स्त्री कायदेतज्ज्ञ ‘ म्हणून नावारूपाला आली. कामगार चळवळीत सामील झाली, याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी विवाह झाला. या विवाहामुळे कामगारांच्या प्रश्नांच्या विविध पैलूं शी परिचय झाला. अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला गोदावरीला. आणि मग हळूहळू गोदावरी ताई सभेच्या कामकाजानिमित्त शेतक-यांशी जोडल्या गेल्या.
अशाच एकदा… सभेच्या कामानिमित्त ठाणे जिल्ह्यातील तलासरी गावात फिरत असतांना, तिथल्या आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून गोदावरी ताईंनी खूणगाठ च बांधली मनाशी, तिथं च राहून, त्यांच्यातलीच एक होऊन, त्यांच्या सारखंच राहून, त्यांच्या साठी झटायचं.
मग त्यांनी “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे”… हे लक्षात घेऊन…
वारली जमातीतल्या लोकांचा विश्वास ; भाषणं देऊन नाही, तर, आपल्या वागणुकीने, मायेने जिंकला. एका मोठ्या वकिलाची मुलगी ते… आदिवासींची माऊली… हा जीवन प्रवास सोपा नव्हताच!!
आदिवासींसाठी च्या लढ्याकडे आणि समाज कार्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून गोदावरी आणि शामराव या दांपत्याने मोठ्या उदात्त भावनेने… मूल न होऊ देण्याचा अत्यंत धाडसी आणि कठीण निर्णय घेतला. आदिवासींची माऊली होण्याचा हा निर्णय समर्पणाचं एक अद्वितीय असं उदाहरण म्हणावं लागेल.
आता एकदा संपूर्ण समर्पित व्हायचं ठरलं आणि ही माऊली… वारली आदिवासींच्या झोपडीत जाऊन राहिली. नाचणीची भाकरी, अंबाडीची भाजी त्यांच्या सोबत बसून खाऊ लागल्या. त्या महिलांची सुख-दु:खे ऐकून घेणे, आजारपणात धावून जाणे, त्यांच्या मुलांची आई सारखी काळजी घेणे त्यांनी सुरू केले.
जेव्हा त्यांना समजले, पटले… गोदावरी च्या अद्वैत साधणा-या वृत्तीतून की, ही शहरातील बाई स्वतः चं घरदार सोडून, आराम सोडून, फक्त आपल्याला हक्क मिळावेत म्हणून जमिनदारांशी, पोलिसांशी भांडते आहे, तेव्हा एक वृद्ध वारली महिला गोदूताईंना जवळ घेत म्हणाली, ” तू आम्हाला वाटलेली *बाई*( शहरी बाई) नाहीस. तू तर आमची माई (आई) आहेस! ” हा माई शब्द संपूर्ण जंगलात वा-यासारखा पसरला… रूजला!!!
वारली संस्कृतीत माई हे केवळ एक संवादाचे माध्यम नव्हते, तर तो सर्वोच्च आदराचा, विश्वासाचा शब्द होता. वर्षानुवर्षे विक्षिप्त जमीनदारांचा छळ सोसणा-या, पितृसत्ताक दबावाखाली घुसमट सोसणा-या, शोषणाच्या आणि अंधश्रद्धेच्या बळी ठरणा-या, एका दुष्टचक्रात अडकलेल्या… आदिवासी महिलांना गोदूमाईंच्या रूपात… एक सावली… एक ढाल मिळाली.
एका सधन कुटुंबात जन्माला आलेली स्त्री, जंगलात राहून, उपाशी पोटी, केवळ गरिबांच्या चेह-यावरील आनंद पाहून आपली भूक विसरत होती, या संवेदनशील मनासाठीच, तिच्या एका हाकेवर लढा द्यायला तयार असत ते आदिवासी!!
वारली जमातीच्या महिलांच्या जीवनात सुधारणांची पहाट आणणारी ही कणखर स्त्री!! अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांना मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झटली. आदिवासींच्या दारात ही गोदावरी शिक्षणाची गंगा होऊन पोहोचली. अंधश्रद्धेच्या मुळाशी असलेलं, अज्ञान आणि अशिक्षितता… हे दोन्ही मुळासकट उपटून काढण्यासाठी सतत बळ लावत राहिली आणि बळ देत राहिली त्या आदिवासींना! आदिवासींनी ही तितकीच मनापासून साथ दिली आणि म्हणूनच तिच्या आणि त्यांच्या… दोघांच्या ही मनगटाला सत्व लाभले!!!
आणि… आदिवासींच्या जीवनातील… भूक, पिळवणूक, कष्ट, अवहेलना, अत्याचार, निरक्षरता आणि वेठबिगारी… या सगळ्यांनी गच्च दाटून आणि भरून राहिलेला काळोख दूर झाला. वारली समाजातील स्त्री-पुरूषांना वेठीला धरून, वस्तू सारखा वापर करणं… गोदूताईंच्या… मना-मनांवर बिंबवलेल्या एकाच वाक्याने थांबलं… ते म्हणजे…
” आता वेठ करायची नाही “!! … आता तर… सातबा-यावरही त्यांचं नाव आलं.
गोदूताईंनी आदिवासींच्या जीवनावर, आपल्या स्वानुभवावर आधारित आणि ” जे जे देखिले डोळां “… ते सगळं इत्थंभूत वर्णन करणारे एक पुस्तक लिहिले…
जेव्हा माणूस जागा होतो
एका मानुषी ने… आदिवासी माणसांच्या मनांतला माणूस जागा होत जाण्याच्या प्रयत्नांचा, हा माणूसपण जागा करण्याचा तपशील…
एका तपस्विनी च्या खडतर तपश्चर्यैचं हे फळ!!!
साहित्य अकादमी चा पुरस्कार प्राप्त झाला या पुस्तकाला!
हे पुस्तक म्हणजे…
आदिवासींच्या शतकानुशतकांच्या अज्ञानाविरूद्ध च्या, छळवणुकी विरुद्ध च्या संघटित जागृत लढ्याचे महाभारत आहे.
आणि… आदिवासी आणि गोदामाई यांच्या परस्परांविषयी च्या अथांग, आंतरिक प्रेमाचं रामायण ही आहे.
गोदावरी परुळेकर म्हणजे एका व्यक्तीची गाथा नसून, जागत्या समाजाची चळवळ आहे. जिथं अन्यायाविरुद्ध धैर्य उभं राहतं, आणि माणूस खरोखरच जागा होतो.
वारली च्या अहिंसक उठावापासून, सहकाराच्या शिखरापर्यंत चा हा एक जाज्वल्य प्रवास आहे, एका समिधेचा!!!
गोदूताईंच्या नावाने आज तलासरीत एक महाविद्यालय आणि सोलापुरात विडी कामगारांचं घर संकुल आहे.
एकेकाळी आपल्या लखलखीत प्रकाशाने पूर्ण कामगार, शोषित वर्गाचं आयुष्य उजळवून टाकणारी ही शलाका! आपलं संपूर्ण आयुष्य शोषितांना न्याय मिळावा म्हणून एखाद्या समिधे सारखं, निस्वार्थ, निरपेक्ष, निष्काम असं समर्पण करणारी ही समिधा! हीच स्मरण सतत होत राहो.
“तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो “!!!
– लेख क्र. १९ .
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




